
चालत्या एक्सप्रेसमध्ये चढणाऱ्या तरुणाचा गेला तोल; आरपीएफ जवानांनी वाचविले प्राण
डोंबिवली - चालत्या गोदाम एक्सप्रेसमध्ये चढणारा 33 वर्षीय तरुण अचानक तोल गेल्याने गाडीच्या खाली जाणार तोच कार्यावर तत्पर असलेल्या आरपीएफ जवानांनी त्याला बाहेर खेचून त्याचे प्राण वाचविले. प्लॅट फॉर्म आणि गाडीच्या मध्ये सापडलेल्या त्या तरुणाला खेचण्यात क्षणाचाही विलंब झाला असता तर त्याचे प्राण वाचले नसते. ही घटना कल्याण रेल्वे स्थानकात सोमवारी घडली असून पवन उपाध्याय (वय 33) असे तरुणाचे नाव आहे. या घटनेत त्याला किरकोळ जखमा झाल्या असून प्राथमिक उपचारा नंतर त्याला सोडून देण्यात आले आहे.
ही घटना सीसीटिव्ही मध्ये कैद झाली आहे. कल्याण रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर कसारा येथून आलेली गोदाम एक्सप्रेस पास होत होती. यावेळी एक्सप्रेसचा वेग काहीसा कमी झाला होता. मूळचा उत्तर प्रदेशचा असणाऱ्या पवन गावी जाण्यासाठी कल्याण स्थानकात आला होता. गोदाम एक्सप्रेस स्थानकातून पास होत असतानाच पवनने या चालत्या एक्सप्रेसमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा तोल गेल्याने तो दाराला लटकत घसरत प्लॅटफॉर्म वरुन जात होता. ही बाब प्लॅटफॉर्म वर कर्तव्यावर असलेले आरपीएफचे राखी व रोशन जाधव यांच्या लक्षात आली.
त्यांनी त्वरीत धाव घेत तरुणाला बाहेर खेचले. याचवेळी गाडीचा वेग काहीसा वाढल्याने गाडी व प्लॅटफॉर्मच्या मध्ये तरुण आला. परंतु जवानांनी त्याला क्षणाधार्त बाहेर खेचल्याने त्याचे प्राण वाचले. यामध्ये त्याला किरकोळ जखमा झाल्या. त्याच्यावर प्राथमिक उपचार करुन नंतर त्याला मेडिकल विषयी विचारणा करण्यात आली. मात्र आपण ठिक असून मेडिकल नको असे त्या तरुणाने सांगितले. त्यानंतर त्याला सोडण्यात आल्याची माहिती कल्याण आरपीएफचे बादल सिंग यांनी दिली. ही घटना सीसीटिव्ही मध्ये कैद झाली असून या तरुणाचे प्राण वाचविणाऱ्या आरपीएफ जवानांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Web Title: Young Man Fell While Catching The Railway Express Rpf Police Save Lives Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..