पनवेल: गाढी नदी पात्रात अडकलेल्या तरुणाची सुटका

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 जुलै 2017

अजयसिंग असे बावीस वर्षीय तरुणाचे नाव आहे. सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे गाढी नदीच्या पात्रातील पाण्याच्या प्रवाहात शनिवारी सायंकाळी अचानक वाढ झाल्याने हा तरुण नदी पात्रात अडकला होता.

पनवेल : पनवेल तालुक्यातील उमरोली गावातील नागरिकांना पावसाळ्यात गावात जाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागतो. नदी पार करूनच घरी पोहोचावे लागते. जीवावर उदार होऊन येथील ग्रामस्थांना नदीवर असलेल्या फरशीवरून (छोटासा पूल) जावे लागते. याच पुलावरून शनिवारी दुपारी एक इसम जात असताना त्याचा पाय घसरला व तो थेट पाण्यात पडला. व पुढे जाऊन कातळावर जाऊन थांबला. सुदैवाने अग्निशामक दल व तालुका पोलिसांनी ग्रामस्थांच्या अथक परिश्रमाने त्याचा जीव वाचविला.

यासंबंधीचे आणखी व्हिडिओ पाहा सकाळ फेसबुक पेजवर. जवळपास हजारो लोकवस्ती असलेले उमरोली गाव गाढी नदीच्या किनारी वसलेले आहे. गावात जाण्यासाठी नागरिकांना नदीवर बांधलेल्या छोट्याशा फरशीवरून जावे लागते. पावसाळ्यात मात्र या फरशी वरून जाताना नागरिकांची तारांबळ उडते. येथून जाताना पाय घसरून पडल्याने कित्येक जण जखमी झाले आहेत तर काहीना आपला जीव गमवावा लागला आहे. पावसाळ्यात पुलावरून पाणी जात असल्याने कित्येकांना कामावार देखील जाता येत नाही. शनिवारी दुपारी ३ च्या सुमारास झारखंड येथे राहणारा २२ वर्षीय युवक अजयसिंग हा हरीग्राम येथील इमारीवरील काम आटोपून उमरोली गावात चालला होता.

नदीला आलेला पूर पाहून आजूबाजूच्या नागरिकांनी त्याला नदीतून न जाण्याचा सल्ला दिला मात्र त्याने त्यांचे न एकता फरशीवरून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. नदीतून जात असताना त्याचा पाय घसरला व तो पाण्यात पडला व वाहून जाऊ लागला. सुदैवाने जवळपास १०० फुटावर पुढे असलेल्या कातळावर तो नदीच्या मध्यभागी अडकला व तेथेच थांबला. आजूबाजूच्या नागरिकांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी ताबडतोब अग्निशामक दलाला कळविले व सिडको व महापालिकेची अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी पोचली. अग्निशामक दलाचे अनिल जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक शालिग्राम, शैलेश ठाकूर यांच्या मदतीने अग्निशामक दलाच्या जवानांनी दोरीच्या सहाय्याने मोठ्या प्रयत्नाने दोरीच्या सहाय्याने एक ते दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर अजय सिंग याचा जीव वाचविला. यावेळी बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

Web Title: young man stuck in the river was released safely in Panvel