अग्निशमन दल येण्यापूर्वीच तरुणांनी आग आणली आटोक्यात

दिनेश गोगी
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

घरावर वाळलेले जंगली गवत, लाकडे, बॅनर आणि सभोवताली वीज-वायफायच्या वायरी. त्यात कडक उन्हात शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्यावर आणि आगीने उग्ररूप धारण केले.

उल्हासनगर : घरावर वाळलेले जंगली गवत, लाकडे, बॅनर आणि सभोवताली वीज-वायफायच्या वायरी. त्यात कडक उन्हात शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्यावर आणि आगीने उग्ररूप धारण केले. त्यानंतर दोन तरुणांनी अग्निशमन दलाची प्रतीक्षा न करता बाजूलाच असलेल्या महावितरणच्या पोलला आगीचा स्पर्श होण्यापूर्वीच आग आटोक्यात आणली. ही घटना उल्हासनगरातील सुभाष टेकडी परिसरात नुकतीच घडली.

भारिपचे शहराध्यक्ष सुधीर बागुल, नगरसेविका कविता बागुल या दांपत्याच्या घराजवळ आनंद सोनवणे यांच्या घराच्या छतावर वाळलेले गवत, लाकडे, वीज, केबल, टेलिफोन तसेच वायफायच्या वायरींचे जाळे पसरलेले आहे. उन्हामुळे झालेल्या घर्षणाने किंबहुना शॉर्टसर्किटमुळे आग लागली. बाजूलाच विद्युत पुरवठा करणारा विजेचा पोल आहे. त्यामुळे मोठ्या दुर्घटनेचा धोका वाढला. नागरिकांनी आरडाओरड सुरू केली.

सिद्धार्थ स्नेह मंडळाच्या मैदानात सामाजिक कार्यकर्ते महेंद्र अहिरे उर्फ माही यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेली बॅडमिंटनची स्पर्धा सुरू होती. सर्व स्पर्धकांनी तिकडे धाव घेतली. सुधीर बागुल यांनी अग्निशमन दलाला तर संदीप उबाळे यांनी दलातील बंड्या गुजर यांना फोन केला. अशात इलेक्ट्रिकची माहिती असणारे सुनील इंगळे यांना सुरेश खैरे यांनी फोन करून आगीचा प्रकार सांगताच सुनील यांनी त्यांचा मित्र प्रमोद इंगळे सोबत क्षणाचीही वाट न पाहता सोनवणे यांच्या घराकडे धाव घेतली.

घरावर चढून प्रथम आगीतून वायरी बाहेर काढून डिस्कनेक्ट केल्या. शेजाऱ्यांनी आणलेल्या पाण्याने आग पूर्णतः आटोक्यात आली. पाच मिनिटानंतर अग्निशमन दलाची गाडी महावितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत सायरन वाजवत आली. मात्र, तत्पूर्वीच सुनील इंगळे, प्रमोद इंगळे यांनी काम फत्ते करून उपस्थितांची वाहवा मिळवली होती. महेंद्र (माही) अहिरे यांनी ही 'आँखों देखी' कहाणी सोशल मीडियावर शेअर केल्याने सुनील इंगळे, प्रमोद इंगळे 'हिरो' ठरले आहेत.

Web Title: the youth control on fire before firefighters came in Ulhasnagar