फरारी झाकीर नाईक याचिका कशी दाखल करतो? 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 एप्रिल 2018

मुंबई - दहशतवादी संघटनांना निधी पुरवल्याचा आरोप असलेला वादग्रस्त धर्मगुरू डॉ. झाकीर नाईक देशाबाहेर पळून गेलेला असताना तो दोषमुक्ततेसाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका कशी काय दाखल करतो, अशा शब्दांत मंगळवारी न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. 

मुंबई - दहशतवादी संघटनांना निधी पुरवल्याचा आरोप असलेला वादग्रस्त धर्मगुरू डॉ. झाकीर नाईक देशाबाहेर पळून गेलेला असताना तो दोषमुक्ततेसाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका कशी काय दाखल करतो, अशा शब्दांत मंगळवारी न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. 

इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनचा संस्थापक असलेल्या नाईकने उच्च न्यायालयात दोषमुक्ततेसाठी याचिका केली आहे. दहशतवाद्यांना आश्रय देणे, त्यांच्या संघटनांना निधी पुरवणे आदी गंभीर आरोप त्याच्यावर आहेत. दहशतवादी कारवायांना साह्य करणे, चिथावणीखोर भाषणे करून तरुण पिढीची दिशाभूल करणे आदी आरोपांप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) त्याच्याविरोधात बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्याचे कलम 10, 13 आणि 18, भादंविच्या विविध कलमांनुसार सुमारे चार हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे; मात्र आरोपी हजर नसताना त्याच्याविरोधात आरोपपत्र दाखल कसे केले जाऊ शकते, असा दावा त्याच्या वकिलांनी केला आहे. त्या याचिकेवर न्या. आर. एम. सावंत आणि न्या. सारंग कोतवाल यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. आरोपी देशाबाहेर असताना तो अशा प्रकारची याचिका कशी काय करू शकतो, अशी विचारणा करत याचिका नामंजूर करण्याचे संकेत न्यायालयाने दिले. राज्य सरकारनेही या याचिकेला विरोध केला आहे. या याचिकेवर पुढील सुनावणी 23 एप्रिलला होणार आहे. एनआयएने नाईकची संकेतस्थळे बंद केली आहेत, तर ईडीनेही त्याची मालमत्ता ताब्यात घेण्याची कारवाई सुरू केली आहे. 

Web Title: Zakir Naik file petitions