लाइफस्टाइल कोच : प्रतिकारशक्ती आणि आतड्याचे आरोग्य

डॉ. मनीषा बंदिष्टी
Tuesday, 19 May 2020

प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी ती पहिल्यांदा मुळातून समजून घ्यायला हवी. आपली प्रतिकारशक्ती हा वैशिष्टयपूर्ण पेशी, प्रथिने आणि रसायनांचा संग्रह आहे. त्यांच्यात गुंतागुंतीची आंतरक्रिया होते. त्याच्या सविस्तर खोलात जाण्याची गरज नाही. मात्र, आपण हे समजून घ्यायला हवे की, इतर कोणत्याही जैविक यंत्रणेप्रमाणे प्रतिकारयंत्रणेवरही तुमचा आहार, विचार करण्याची पद्धत आदी घटकांचा परिणाम होत असतो. गेल्यावेळी आपण प्रतिकारशक्तीचे खालील पाच स्तंभ पाहिले.

  • आतड्यांचे आरोग्य
  • संतुलित आहार
  • व्यायाम
  • ताणतणाव नियोजन
  • झोप 

आता यातील आतड्यांचे आरोग्य या पहिल्या स्तंभाबद्दल जाणून घेऊयात. आपल्या आतड्याच्या अस्तरामध्ये किंवा पचनसंस्थेत मोठ्या प्रमाणावर जीवाणू असतात. त्यापैकी बहुतेक जीवाणू आपल्या अस्तित्वासाठी महत्त्वाचे असतात. ते आपल्या आतड्यामध्ये असतात. आतड्यामधील जीवाणूंच्या या समूहाला ‘मायक्रोबायोम’ म्हणतात. ते पोषक घटक शोषण्यात मदत करतात. त्याचप्रमाणे, एखादा रोगजंतूने बाहेरून पचनसंस्थेत प्रवेश केल्यानंतर तुमच्या पोटातील प्रतिकारशक्तीलाही ते उत्तेजित करतात. आपले मित्र असलेले हे शरीरातील जीवाणू पोटामध्ये शिरलेल्या परकीय विषाणू, रोगजंतूला ओळखून प्रतिकारयंत्रणेला सावध करतात. त्यामुळेच, या चांगल्या जीवाणूंना आरोग्यदायी ठेवणे महत्त्वाचे ठरते. त्यासाठी काय करायचे, हे पाहूयात.

पुरेसे पाणी -
दररोज तीन ते चार लिटर पाणी पिणे महत्त्वाचे असते. तुमच्या डॉक्टरांनी पाणी कमी पिण्याचा सल्ला दिला नसल्यास ते कमी पिवू नका. पाण्याव्यतिरिक्त तुम्ही आवळा सरबत, लिंबू सरबत, ग्रीन टी, नारळपाणी, जीरा, ओवा सरबतही प्या. त्यामुळे प्रतिकारशक्ती आणखी मजबूत होण्यात मदत होते.

1) प्रिबायोटिक : यामध्ये फायबरयुक्त पदार्थांचा समावेश होतो. ओट्‌स, केळी ही याची चांगली उदाहरणे आहेत.

2) प्रोबायोटिक : दही, आंबवलेल्या पदार्थांचा दैनंदिन आहारात समावेश करण्याचा प्रयत्न करा. 

3) जंत काढणे (डीवॉर्मिंग) : दर सहा महिन्यांतील डॉक्टरांच्या सल्ल्याने करावे. 

आपणच आपल्या या उपयुक्त जीवाणूंचा नाश करतो. मानवी प्रतिकारशक्तीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेले हे जीवाणू म्हणजे निसर्गाची एक प्रकारची भेटच होय. आपण त्यांचे योग्य संतुलन राखले पाहिजे. प्रतिकारशक्तीच्या आहार, झोप आणि व्यायाम या इतर स्तंभाबद्दल आपण येत्या काही भागांमध्ये जाणून घेऊयात. यापैकी दुसऱ्या स्तंभाबद्दल पुढच्या भागात.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article dr manisha bandishti on Immunity and intestinal health