इनर इंजिनिअरिंग : ...आणि आता योग

Sadguru
Sadguru

पतंजली ऋषींना आधुनिक योग विज्ञानाचे जनक मानतात. त्यांनी काही योगाचा शोध लावला नाही, पण त्यांनी योगाला एका सुसंगत प्रणालीत सूत्रबद्ध केले. योग त्यांच्या आधीपासूनच विविध स्वरूपात अस्तित्वात होता. त्यांनी त्याला एकसंध केले ज्याला ‘सूत्र’ म्हणतात. तर ही योगसूत्रे दोनशेहून अधिक आहेत. हे जीवनाबद्दलचे अगदी अभूतपूर्व लिखाण आहे. हे अतिशय अविश्वसनीय वाटते की, केवळ एक व्यक्ती जीवनाबद्दलचे एवढे प्रचंड ज्ञान आत्मसात करू शकली. त्यांच्या जाणीवेचा विस्तार खरोखर अविश्वसनीय आहे. आजचे विद्वान म्हणतात की, हे एका मनुष्याने केलेले कार्य वाटत नाही. अनेक लोकांनी ते केले असणार. हे ज्ञान इतके प्रचंड आहे की, ते एका माणसाच्या बुद्धिमत्तेत सामावणे शक्य नाही, पण हे फक्त एका मनुष्याचे कार्य आहे. पतंजली ऋषी या पृथ्वीतलावरील अभूतपूर्व बुद्धीवंत महापुरुषांपैकी एक होते.

पतंजलींचे ‘योगसूत्र’ हे जीवनावरील बहुदा सर्वांत महान आणि त्याचवेळी एक अगदी निरस लिखाण आहे. त्यांनी जाणूनबुजून हे असे लिहिले कारण, हे जीवनाचा उलगडा करणारे सूत्र आहे. त्यांना हे एक तत्वज्ञान व्हायला नको होते. त्यांचे भाषेवरील प्रभुत्व एवढे  प्रचंड होते की, त्यांनी ते सूत्राच्या रुपात लिहिले, जेणेकरून कुणा विद्वानाला यात कधीच रस निर्माण होणार नाही.

ते अगदी निरस आहे, पण एक सूत्र जरी तुम्ही पूर्णतः आत्मसात केले आणि ते  तुमच्यात सत्य म्हणून प्रगट झाल्यास ते तुम्हाला अनुभूतीच्या एका आगळ्यावेगळ्या आयामात घेऊन जाईल. एक सूत्र  तुम्ही तुमच्या जीवनात उतरवलेत, की पुरे. मग तुम्ही राहिलेली २०० सूत्रे वाचायची गरजच उरणार नाही. पतंजली या सूत्रांची सुरुवात विचित्र पद्धतीने करतात. पहिलं सूत्र एवढच आहे... ‘...आणि आता योग.’ हे अर्धे वाक्य एक पूर्ण अध्याय आहे योगसूत्राचा! हा एक विचित्र मार्ग आहे, अशा अभूतपूर्व आयामाच्या पुस्तकाची सुरुवात करण्याचा. बौद्धिकदृष्ट्या याचा काहीच अर्थ लागत नाही, पण अनुभवाच्या दृष्टीने ते असे म्हणत आहे, ‘स्वतःचं असे नवे घर बांधून किंवा नवीन बायको किंवा नवरा शोधून किंवा मुलीचं लग्न करून जीवनाचा उलगडा होईल, तर तुमची योग करण्याची वेळ अजून आली नाहीये. पण तुम्ही सत्ता, धन-दौलत, संपत्ती आणि सुखोपभोग पाहिले असतील, आयुष्यात अशा सर्वांची चव चाखली असेल.

त्यानंतर, तुम्हाला हे कळलेय की, खऱ्या अर्थाने ह्या गोष्टी कधीच तुम्हाला संपूर्ण समाधान आणि सार्थकता देऊ शकणार नाहीत, तर मग तुमची योग करण्याची वेळ आलीये. 
आज संपूर्ण जग काही गोष्टींच्या मागे धावत आहे, पतंजली ऋषींनी ते फक्त अर्ध्या वाक्यात निष्फळ करून टाकले. म्हणूनच त्याचे पहिलं सूत्र आहे ‘...आणि आता योग.’ म्हणजे याचा अर्थ, तुम्हाला आता कळलेय की तुम्ही काहीही केले तरी व्यर्थच आहे, कारण तुम्हाला याची तिळमात्र जाणीव नाहीये, ‘काय आहे हा सगळा पसारा?’, अज्ञानाचे दुःख तुम्हाला आता असह्य होत आहे, म्हणून ... आता योग. म्हणजे आता जाणण्याचा मार्ग खुला झालेला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com