esakal | चेतना तरंग : ईश्वर सर्वदा उत्सवस्वरूप!
sakal

बोलून बातमी शोधा

चेतना तरंग : ईश्वर सर्वदा उत्सवस्वरूप!

चेतना तरंग : ईश्वर सर्वदा उत्सवस्वरूप!

sakal_logo
By
श्री श्री रविशंकर, प्रणेते आर्ट ऑफ लिव्हिंग

गरीब माणूस नव्या वर्षाचा सोहळा वर्षातून एकदा साजरा करतो. श्रीमंत माणसाच्या घरी असा आनंद उत्सव रोज असतो, पण खरा श्रीमंत माणूस प्रत्येक क्षणाला आनंद उत्सव साजरा करतो.

तुम्ही किती श्रीमंत आहात? तुमचा आनंदोत्सव वर्षातून एकदा असतो? की महिन्यात एकदा?... की रोजच असतो?... तुम्ही आयुष्यातील प्रत्येक क्षणात आनंद उत्सव साजरा करीत असाल, तर मग तुम्ही या विश्वाचे सम्राट आहात!

नव वर्ष साजरे करताना गेल्या वर्षाचा आढावा घ्या. हाच गृहपाठ आहे तुमच्यासाठी. काय केले तुम्ही गेल्या वर्षात? तुम्ही गेल्या वर्षात काय मिळवले आणि कोणकोणत्या कार्यात यशस्वी झालात? या गेल्या वर्षात तुम्ही किती जणांची कितपत मदत करू शकलात? एक तासभर बसा आणि गेल्या वर्षातील प्रत्येक आठवड्याचा आढावा घ्या. प्रत्येक आठवड्याचा विचार एका मिनिटात करा. म्हणजे तासाभरात तुम्हाला गेल्या पूर्ण वर्षातील प्रगतीची जाणीव होईल. मग नववर्ष दिनी हे गेलं पूर्ण वर्ष एका फुलासह ईश्वरचरणी अर्पण करा.

सुगंध दरवळला सर्व दिशांना

सत्संगाच्या समयी छान वेष्टनात गुंडाळलेली एक भेट वस्तू गुरुजींनी उघडली. आत मोगऱ्याचा सुगंध असलेल्या अत्तराची छोटीशी बाटली होती. बाटलीचे बूच

फिरवून त्यांनी त्या मोहक अत्तराचा वास घेतला. मग एका कागदावर थोडे अत्तर ओतून तो हवेत उंचावून चोहीकडे शिंपडले. तो सुगंध खोलीत चारी कोपऱ्यांपर्यंत पोचला. तिथल्या प्रत्येकाला त्या सुगंधाचा आनंद घेता आला. गुरुजी म्हणाले, ‘‘आपल्याकडे सुगंधाचा साठा असून पुरेसे नाही. तो सुगंध चोहीकडे कसा पसरावा हे माहीत असले पाहिजे. फुलांमध्ये सुगंध असतो. पण तो वाऱ्यामुळे सगळीकडे पसरतो. याचप्रमाणे इथे आपण सगळे अंतःकरणातून अद्‌भुत आहोत, सुंदर आहोत, प्रेमळ आणि तरल आहोत. आपल्यात प्रेमाचा सुगंध निश्चित आहे. सत्संग हा आपल्यातील सुगंध पसरवण्यासाठीचा वारा आहे!’’

loading image
go to top