योग ‘ऊर्जा’ : योगासाठी आदर्श वातावरण आणि जागा 

devayani-yoga
devayani-yoga

वेदांमध्ये हजारो वर्षांपूर्वी बीज रूपाने उगम पावलेला ‘योग’ पुढे उपनिषदे, भगवतगीता, पातंजल योगशास्त्र आणि मग हठयोग असा प्रवास करत आज आपल्यापर्यंत येऊन पोचला आहे. हे जुने शास्त्र कधीही कालबाह्य होणार नाही. काळानुरूप व आपल्या जीवनशैलीनुसार त्यांना आपल्या आयुष्यात समाविष्ट करण्याचा दृष्टिकोन बदलेल. मात्र तत्त्व तीच राहतील. 

आपण आज हठयोगातील असेच एक तत्त्व समजून घेऊ. त्याचा आज विचार करणे महत्त्वाचे आहे. विशेषतः कोरोनाच्या प्रसारामुळे आपला घरीच राहून योगाभ्यास सुरू आहे. योगाच्या क्लासमध्ये वातावरणनिर्मिती केलेली असतेच, घरी पूरक वातावरण तयार करणे ही पूर्णतः आपली जबाबदारी आहे. योगी स्वात्माराम हठप्रदीपिकेत योग साधण्यासाठी आदर्श वातावरण आणि जागा कशी असावी ते सांगतात. 

१. सुराज्ये 
राजा-प्रजा अशी आज परिस्थिती नाही. परंतु आपल्या घरातील वातावरण योगाभ्यासाला पूरक असावे. प्रामाणिकपणा, सदाचरण, प्रसन्नता या तत्त्वांवर संपूर्ण कुटुंब जगत असल्यास त्या प्रकारच्या भावना, विचार आणि वागण्यामुळे योगाभ्यासात बाधा निर्माण होत नाही. 

२ धार्मिके देशे 
अनेकजण योग हे धर्माचे अंग समजतात. योग भारतात जन्मला असला, तरी तो संपूर्ण मानवतेचा आहे. धार्मिक वृत्ती म्हणजे श्रद्धा, भक्ती, पावित्र्य असे वर्तन असलेला मनुष्य जो स्वधर्म आणि स्वकर्तव्याप्रती एकनिष्ठ आहे. योगासाठी कोरडेपणा उपयोगाचा नाही. योगशास्त्रावर, गुरूंवर विश्वास व श्रद्धा असणे महत्त्वाचे, तरच प्रगती योग्य दिशेने होईल. 

३. सुभिक्षे 
आपण आज भिक्षा मागून उदरनिर्वाह करत नाही. इथे सुभिक्षेचा अर्थ योग्य आहार असणे. शरीराचे हाल करून किंवा शरीरास अति गोंजारून ठेवू नये. भिक्षा म्हणजे जीवनावश्यक अन्न, ताव मारून पोट टम्म भरेपर्यंत खाणे नव्हे. 

४. निरूपद्रवे 
साधना काळात उपद्रव होणाऱ्या सर्व गोष्टी, उपकरणे, माणसे, प्राणी आणि विचार दूर ठेवावेत. उगाचच करायचा म्हणून सराव करू नये. खरीखुरी सूक्ष्मात जाण्याची ओढ असेल (मग कितीही वेळ लागो.) असे वातावरण निर्माण करावे. प्रयत्न, विश्‍वास, प्रामाणिकपणा आणि योग्य मार्गदर्शनाने ध्येय नक्कीच जवळ दिसेल. 

५. अग्नि-जल वर्जिते 
आजच्या काळाप्रमाणे यांचा विचार करता, योगाची जागा अति गरम किंवा थंड नसावी. जोरात पंखा, एसी लावून सराव करू नये. बंदिस्त जागा नसावी. हवा खेळती असावी. 

६. एकान्ते 
आपल्या सर्वांनाच माहीत आहे की, एकांत, शांत वातावरण योगासाठीची प्राथमिक गरज आहे. साधनेवेळी घरात किंवा आजूबाजूला शांतता असावी. दुसऱ्या खोलीत टीव्ही सुरू आहे, मुलांचा दंगा, भांड्यांचा, बोलण्याचा आवाज वगैरे नसल्यास योगाला योग्य न्याय देऊ शकाल. अशाने संपूर्ण घराला एक शिस्त लागायला मदतच होईल. 

७. मठिकामध्ये 
आपण मठ किंवा कुटीत राहत नसलो, तरी वेगळी खोली योगासाठी राखून ठेवल्यास उत्तम. घरे लहान असल्याने हे बहुतांशवेळा शक्य होत नाही. अशावेळी बाह्यगोष्टींचा कमीत कमी त्रास होण्याची काळजी घ्यावी. प्रसन्न, सकारात्मक कंपने असणारी, ज्यात योग्यासारखे आयुष्य खऱ्या अर्थाने जगता येईल, अशी घरे आणि माणसे मी स्वतः पाहिली आहेत. बाहेरील बाधक व नकारात्मक तत्त्वांनी आपली ऊर्जा न खेचल्यास आपण ती आत वळवून सूक्ष्मावर केंद्रित करू शकू. 

८. नि:शेष जन्तु उज्झितम् 
आपल्या आजूबाजूला स्वच्छता ठेवली, स्वच्छ खोलीत साधना केली तर मनही प्रसन्न राहील. बाहेरील जंतू साफ करण्याबरोबरच आतील स्वच्छताही असावी, म्हणजे पोट साफ झालेले असावे. अष्टांग योगाच्या लेखमालिकेत ‘शौच’ हा नियम आपण सविस्तर पाहिला आहे, त्याला पुन्हा एकदा उजाळा द्या. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

चौदाव्या शतकातील ही तत्त्वे आज २०२०मध्ये आणि पुढेही मार्गदर्शक ठरतील. हठयोगाभ्यासी साधकांनी साधनेत जास्तीत जास्त अनुकूल वातावरण आणि परिस्थिती कशी निर्माण करावी, त्यांची गरज काय आहे, त्याचे वर्णन आपण पाहिले. आजकाल नुसते ‘वर्क फ्रॉम होम’ नाही, तर ‘एवरीथिंग फ्रॉम होम’ सुरू असताना घर साधे, आनंदी, शांत आणि पवित्र ठेवणे सर्वस्वी आपल्या हाती आहे. 

(Edited by : Kalyan Bhalerao)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com