नेटका सडपातळू...! 

देवयानी एम 
Tuesday, 18 August 2020

ज्या मनात व घरात अशांतता, आळशीपणा, कलह, कोलाहल आहे तिथे त्याच प्रकारचे संस्कार होतात. जे मन व घर प्रसन्न, सर्जनशील, प्रेरणादायक व निरोगी आहे ते अतिरिक्त स्थूलतेकडे कधीही झुकणार नाहीत.

स्थूलपणा (ओबेसिटी) म्हणजे शरीरात अतिरिक्त चरबी असणे. स्थूलपणा हा फक्त सौंदर्य किंवा प्रसाधनाचा विषय नसून वैद्यकीय समस्या आहे. शरीरात चरबी जमा होण्याने अनेक विकारांचा शिरकाव होऊ लागतो. आपल्या शरीरातील विविध इंद्रियांवर ताण येऊ लागतो जसे हृदय, श्वसन संस्था, पचनसंस्था, सांधे इत्यादी. मधुमेह, हृदयविकार, उच्च रक्तदाब, आर्थराइटिस, काही प्रकारचे कॅन्सर यांसारखे त्रास होण्याची शक्यता कित्येक पटीने वाढते. एकंदरीतच चैतन्य, उमेद, मानसिक ऊर्जा, आत्मविश्वास, इच्छाशक्ती कमी होत, मंदपणा, कंटाळा वाढत जातो. 

स्थूलपणाची कारणे - 
१. अति खाणे, दिवसातून खूप वेळा खाणे. 
२. चुकीचे अन्न खाणे. 
३. तेलकट, स्टार्चयुक्त, जंक फूड खाणे. 
४. साखरेचे प्रमाण अधिक असणे, सॉफ्ट ड्रिंकचे अतिसेवन. 
५. हॉर्मोन्सचे असंतुलन. 
६. एका जागी दीर्घकाळ बसणे. 
७. व्यायाम न करणे. 

हेही वाचा : पचनक्रियेतील विकार : बद्धकोष्ठता

अति खाण्याचे दोन प्रकार आहेत 
रजोगुणात्मक खाणे - 

रजोगुणी, अतिक्रियाशील, स्पर्धात्मकवृत्ती असणारे जास्त व भरभर खातात. मानसिक उत्तेजनामुळे काहीजण खाण्यातून आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतात. भूक नसताना खाल्लं जाणे, अकारण चाळा म्हणून खाणे अशा सवयी नकळत लागून जातात. अपूर्ण राहिलेल्या इच्छा-आकांक्षा हे खाण्यामार्गे बाहेर पडू नयेत 

तमोगुणात्मक खाणे - 
तमोगुण, आळस, जडत्व ज्यांच्यात अधिक आहे ते लोकही अति खाण्याकडे झुकतात. रिकामपणा खाण्याने भरून काढण्याचा प्रयत्न करतात. एका जागी दीर्घकाळ बसणे, कमी हालचाल आणि अति आहार ही वजन वाढण्याची रेसिपी आहे. अशाने वजन वाढलं, की आणखी जडत्व येऊ लागतं. स्वतःवरचं प्रेम कमी होत जाऊन जीवनातील आनंद कमी होऊ लागतो. आणि तेच नैराश्य पुन्हा खाण्याने भरून काढण्याचा प्रयत्न होऊ लागतो व हे चक्र सुरूच राहते. 

हेही वाचा : 'योग' पचनसंस्थेच्या आरोग्याचा 

स्थूलतेवर उपाय - 
१. मिताहार (moderate eating). घरचे व साधेअन्न खावे 
२. अन्नाकडे जीवनावश्यक गरज म्हणून पहावे व आदरपूर्वक खाल्ले जावे, आनंद मिळण्याचा मार्ग म्हणून उपभोगात्मक दृष्टीने नव्हे 
३. योगासने : आसनांनी मन पुनरुज्जीवित होते, मज्जासंस्था व अंत:स्त्रावी प्रणालीला चालना मिळते. 
४. सूर्यनमस्कार : वजन व चरबी कमी करण्यासाठी उत्तम व्यायाम 
५. प्राणायाम : शरीर व मनाला चेतना मिळणे, स्ट्रेस कमी करणे, चयापचय सुधारणे, अतिरिक्त चरबी कमी करणे असे अनेक फायदे आहेत 
६. शुद्धिक्रिया : पचनसंस्थेतील अडकलेला मल बाहेर काढून, पचनशक्तीला पुनरुज्जीवित करून जठर, लहान-मोठे आतडे, यकृत व स्वादुपिंड यांचे आरोग्य सुधारते 
७. शिथिलीकरण : शवासन, योगनिद्रा, ध्यान यामुळे शारीरिक-मानसिक ताण कमी होतो. सर्व आंतर इंद्रिये शांत होतात व पचनसंस्थेला ही आराम मिळतो. हळूहळू अति खाणे नियंत्रणात येऊ लागते कारण जागरूकता वाढते. 

ज्या मनात व घरात अशांतता, आळशीपणा, कलह, कोलाहल आहे तिथे त्याच प्रकारचे संस्कार होतात. जे मन व घर प्रसन्न, सर्जनशील, प्रेरणादायक व निरोगी आहे ते अतिरिक्त स्थूलतेकडे कधीही झुकणार नाहीत. नेटका सडपातळू हनुमंताचा आदर्श समोर ठेऊया!! 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Devyani M Writes article about Obesity