esakal | हसण्यासाठी जगा : मनाचा दरवाजा, जगण्याचा श्रीगणेशा!
sakal

बोलून बातमी शोधा

हसण्यासाठी जगा : मनाचा दरवाजा, जगण्याचा श्रीगणेशा!

हसण्यासाठी जगा : मनाचा दरवाजा, जगण्याचा श्रीगणेशा!

sakal_logo
By
मकरंद टिल्लू

आयुष्यात प्रत्येकाला सुरक्षितता  हवी असते.  यासाठी आपण दरवाजे केले आहेत. घराला, गृहसंकुलाला, बागेला, क्रीडांगणाला, खिडक्यांना, कपाटांना, फ्रिजला दरवाजे आहेत... तसेच एकप्रकारे मनालाही दरवाजे असतात. कोणतीही गोष्ट आत-बाहेर करायची असेल, तर दरवाजा उघडावा लागतो. मनामध्ये ही प्रक्रिया सतत सुरू असते. काही वेळा दरवाजे गरजेचे असतात, तर काही वेळा ते जगण्याचे अडसर बनतात.

 • घराची बेल वाजते. आपण दरवाज्याच्या ‘आय होल’मधून कोण आलं आहे ते पाहातो. काही वेळा दरवाजा किलकिला करून कोण आलं आहे, ते पाहतो. परिचित असेल, तरच दरवाजा उघडतो. तसंच मनाच्या दरवाज्यावर देखील असा एक पहारेकरी बसवणं गरजेचं आहे. दिवसभरात आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचे, बातम्यांचे प्रतिसाद मनात तयार होतात. कोणत्या सकारात्मक विचारांना मनाचा दरवाजा उघडून आत घ्यायचं आणि कोणत्या नकारात्मक विचारांना बाहेर ठेवायचं, यावर आपल्याला ताबा निर्माण करावा लागतो.

 • असुरक्षिततेची भावना वाढली, की दरवाज्याला कड्या, कुलपं, बाहेरचा लोखंडी दरवाजा असं वाढत जातं. मनाला असुरक्षित वाटल्यावर असंच घडतं. यातून माणसं एकलकोंडी होतात.

 • दरवाजा बाहेर उघडला जातो किंवा आत उघडला जातो. बाहेरच्या जगात यशस्वी होण्यासाठी अंतर्मनाचा दरवाजा उघडता येणं महत्त्वाचं असतं.

 • दरवाजाला कडी घातली, की तो कुणाला उघडता येत नाही. मनाला अढी घातली की ती कोणालाही उघडता येत नाही.

 • काही दरवाजे दोन भागात उघडतात. काही वेळा मनाचे

 • दरवाजेदेखील दुभंगतात.

 • दरवाजा फुगला तर गच्च बसतो. मनाचा दरवाजा फुगaला तर समोरच्या व्यक्तीबद्दल कोणतीच गोष्ट आपण स्वीकारायला तयार होत नाही.

 • दरवाज्याच्या बिजागऱ्या कुरकुरायला लागल्या, तर वंगण वापरावं लागतं. मन कुरकुरायला लागलं, तर सकारात्मकतेचं, उत्तम विचारांचं, हास्याचं वंगण वापरावं लागतं.

 • वस्तूंची संख्या वाढायला लागली, की घरात कपाटांची संख्या वाढते. अनुभवांची संख्या वाढायला लागल्यावर मनातल्या कपाटांची संख्या वाढते.

 • कपाटाचे दरवाजे उघडून पाहिल्यास त्यात अनेक अनावश्यक वस्तू दिसतात. ज्या त्या काळात त्या त्या वस्तू महत्त्वाच्या असतात. पण काळानुरूप त्या अनावश्यक होतात. आपण त्या फेकून दिल्या, तर नवीन जागा तयार होते. मनामधील अनावश्यक अनुभव, राग, द्वेष, मत्सर इत्यादी विकार  दरवाजा उघडून फेकून देणं गरजेचं आहे.

 • कागदपत्रांचे ढिगारे कमी करण्यासाठी सध्याच्या काळात लोकं कागदपत्र ‘स्कॅन’ करतात. अनुभवांचा मथितार्थ ‘स्कॅन’ करून ठेवला, तर मनातील जागा, अनावश्यकपणे भरून रहात नाही.

 • ज्यांच्याकडं दरवाजाची किल्ली असते ते आपल्यासाठी बाहेरचे नाही, तर जवळचे असतात. म्हणूनच आपुलकीच्या माणसांना आपल्याला समजावण्याचे अधिकार द्यावे लागतात.

 • दरवाजे नसलेल्या बागेत, क्रीडांगणावर लोकं सहजतेनं जातात. त्याचा आनंद घेतात. लहान मुलांच्या मनाची अवस्था म्हणजे दरवाजा नसलेल्या फुलबागा असतात. ती अवस्था मिळाली की जगणं फुलतं.

loading image
go to top