गुणकारी दुधी भोपळा, आरोग्यदायी, उच्च रक्तदाबावरही नियंत्रण ठेवण्यास करतो मदत

मनोज साखरे
Monday, 28 September 2020

आहारात दुधी भोपळा असणे हे आरोग्यास लाभकारक असते. त्यामुळे सर्वांनी त्याचा आहारात समावेश करावा.

औरंगाबाद : संभाव्य व्याधींपासून दूर ठेवणाऱ्या दुधी भोपळ्याला गुणकारी ही उपमा दिली गेली, ती उगाचच नव्हे. त्याच्या आरोग्यवर्धक गुणांमुळेच. हल्ली कोविड-१९ रुग्णांसाठी रक्तदाबाचा त्रास हा धोका ठरत आहे; पण दुधी भोपळ्याचा आहारात समावेश केल्यास उच्चरक्तदाबही नियंत्रणात ठेवण्यास मदत होते व संभाव्य धोक्यापासून आपण दूर राहू शकतो.

दुधी भोपळ्याचा रस थंडीच्या दिवसात अधिक लाभदायक असतो. दुधी भोपळ्यात विषनाशक गुण असतात. यात १२ टक्के पाण्याचे प्रमाण असून याची चव इतर भाज्यांपेक्षा निराळी असते. नियमित व्यायाम, शारीरिक श्रमानंतर रोज १०० ग्राम दुधी भोपळ्याचा रस प्या, त्यामुळे पोट भरल्यासारखे राहते व भूक लागत नाही परिणामी वजन नियंत्रित राहते. दुधी भोपळ्यात मोठ्या प्रमाणात लोह, कॅल्शियम, फॉस्फरस प्रथिने असतात.

वजन कमी करण्यास सायंकाळी दुधी भोपळ्याचे सुप पिल्याने फायदा होतो. उष्णतेचा त्रास होत असल्यास दुधी भोपळ्याच्या रसात खडीसाखर टाकून पिल्याने त्रास कमी होतो. ताप आल्यानंतर दुधी भोपळ्याचे सूप पिणे गुणकारी ठरते. ताप वाढत असल्यास दुधी भोपळ्याचा कीस कपाळी लावल्यास फायदा होतो. शांत झोपेसाठीही दुधी भोपळ्याचे तेल डोके व तळव्यांना लावल्यास आराम मिळतो.

भोपळा पित्तनाशक असून डोके दुखत असल्यास दुधी भोपळ्याच्या रसात मध घालून प्यायला हवा. गर्भवती महिलांनी आहारात दुधी भोपळ्याचा समावेश केल्याने आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. लहान मुलांसाठीही दुधी भोपळा आरोग्यदायी असून विस्मरणावर परिणामकारक आहे. बुद्धी तल्लख होते; पण दुधी भोपळा उकडून व चांगला शिजवून खायला हवा.

टोमॅटो, शेवगा खातोय भाव !

भोपळा उच्चरक्तदाब नियंत्रित ठेवतो
जर आपण नियमितपणे एक ग्लास दुधी भोपळ्याचे रस पीत असाल तर आपली उच्चरक्तदाबाची समस्या अधिक प्रमाणात नियंत्रित राहील. हा रस दररोज २०० ग्राम प्यायल्याने रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यास मदत होते.

असा हा गुणकारी भोपळा
-भोपळ्याच्या रसात अधिक मात्रेत पाणी असते, ते शरीर थंड ठेवते.
-लघवीत जळजळ होत असेल तर दररोज सकाळी दुधी भोपळ्याचा रस सेवन करावा.
-दुधी भोपळा केसांवरही गुणकारी आहे.
-केस पांढरे होणे व गळणे या समस्येसाठी दुधी भोपळ्याचा रस प्यावा.
-या रसात तिळाच्या तेलाचे मिश्रण करून केसांच्या मुळाशी लावल्याने केस गळती कमी होते.
- रोज सकाळी दुधी भोपळ्याचा रस पिल्यास पचनक्षमता वाढण्यास मदत होते.
-पोटाचे आजार कमी करण्यास मदत होते.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dudhi Bhopla Useful For Healthy Body