esakal | इनर इंजिनिअरिंग : योग - परमोच्च सर्वसमावेशकता
sakal

बोलून बातमी शोधा

 इनर इंजिनिअरिंग : भव्य भारताचे निर्माण

इनर इंजिनिअरिंग : योग - परमोच्च सर्वसमावेशकता

sakal_logo
By
सद्‌गुरू, ईशा फाउंडेशन

एकेकाळी, अगदी आतासुद्धा देशाच्या काही भागांमध्ये २०० - ३०० लोक एकत्र राहायचे एका मोठ्या घरात. कारण नवरा, बायको, मुले, आजोबा, आजी, काका, काकू, चुलत आजोबा, चुलत आजी, चुलत भावंडे, सर्वजण एकच परिवार म्हणून नांदायचे. आपण सुशिक्षित होत गेलो, आपण काका, काकू, चुलत भावंडांना काढून टाकलं आणि फक्त नवरा, बायको, मुले आणि आई-वडील फक्त यांनाच आपले कुटुंब मानू लागलो. काही काळानंतर आपण आपल्या पालकांनासुद्धा काढून टाकले. आपल्याला वाटू लागले, की नवरा बायको आणि मुले म्हणजेच कुटुंब, आता मुलं असं विचार करू लागली आहेत, की ते तसंही नाही.

आता परिस्थिती अशी बनली आहे, की नवरा-बायको सुद्धा एकत्र राहू शकत नाहीत. कधीतरी थोड्यावेळासाठी भेटल्यास ते छान असतात. फक्त वीकेंड विवाहित आयुष्य त्यांना चालतं, पण आठवड्याचे इतर दिवस एकत्र राहणं अशक्य होतं. हे असं घडतंय, कारण तुम्ही अधिकाधिक सर्वसमावेशक होण्याऐवजी खूपच स्वकेंद्रीत होत आहात. आजचा आधुनिक समाज स्वकेंद्रित होण्यास प्रोत्साहित करत आहे. पूर्वी कधीही माणसाने एवढ्या सुखसोई आणि सुविधा अनुभवल्या नव्हत्या. पूर्वी कधीही माणसांनी अशा प्रकारचं अन्न आणि आरोग्य उपभोगलं नव्हतं. असं असूनही पूर्वी कधीही लोक आजच्या लोकांप्रमाणं निराश आणि तणावग्रस्त जीवन जगले नव्हते. कारण आज लोक एकमेकांबरोबर राहू शकत नाहीत, ते खूपच स्वकेंद्रित बनले आहेत. सर्वसमावेशक असाल तरच नातेसंबंध जोडू शकता, स्वकेंद्रितपणा स्वाभाविकपणे नैराश्यात ढकलतो.

योग म्हणजे परमोच्च सर्वसमावेशकता, ‘योग’ शब्दाचा शब्दशः अर्थ आहे ऐक्य. तुम्ही सृष्टीतील, एकूणएक सर्वांशी ऐक्य साधता, हाच योग आहे. योग म्हणजे फक्त तुमचे शरीर वेडेवाकडे पिळणे नव्हे किंवा पायांची गाठ मारून बसणे नव्हे. योग म्हणजे तुमच्या अनुभवात एकूणएक गोष्टींशी तुम्ही एक झाला आहात. आता सर्वकाही कसे काय एक होऊ शकते? तुम्ही हे तुम्ही आहात, मी हा मी आहे, नाही का? तर हे दोन्ही एक होण्याचा प्रश्न येतोच कुठं?

तुम्हाला हे माहीत आहे का, आधुनिक विज्ञान असे सांगत आहे की संपूर्ण अस्तित्व ही एकच ऊर्जा आहे, जी स्वत:ला लाखो वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त होत आहे, हे एक वैज्ञानिक तथ्य आहे. हे आणि ते दोन्ही एकच ऊर्जा आहेत. कदाचित अजून ते तुमच्या आकलनात नाहीये. पण ही वस्तुस्थिती आहे. हेच विज्ञान सुद्धा सांगत आहे. आणि जगातले सर्व धर्म सुद्धा प्रदीर्घ काळापासून हेच सांगत आहेत, की देव सर्वत्र आहे. देव सर्वत्र आहे म्हणा किंवा सर्वकाही एकच ऊर्जा आहे म्हणा, शेवटी दोन्ही एकच वास्तव आहेत.

देव सर्वत्र आहे, सर्वकाही एकच ऊर्जा आहे – हे एकच वास्तव आहे जे वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त केलं जातं. एका वैज्ञानिकाने हे सत्य अनुभवले नाहीये, पण कसेतरी करून गणितीय अनुमान लावून समजण्याचा प्रयत्न केला आहे. एका धार्मिक माणसानंही ते अनुभवलं नाहीये, पण त्याचा तसा विश्वास असतो की सर्वकाही देव आहे. तर आता एक योगी, म्हणजे अशी व्यक्ती जो कोणतंही अनुमान किंवा श्रद्धेवर समाधान मानण्यासाठी तयार नाहीये, त्याला ते स्वतः अनुभवायचं आणि जाणून घ्यायचं आहे. तुम्हाला अशी ओढ लागली आहे, की तुम्हाला ते जाणून घ्यायचं आहे आणि तुम्ही इतर लोकांचे अनुमान आणि विश्वास व श्रद्धा मानण्यास तयार नाही, तर मग तुम्हाला योग मार्गावर वाटचाल करावी लागेल.

loading image
go to top