अभिलाषा आणि इच्छा

Sri-Sri-ravishankar
Sri-Sri-ravishankar

चेतना तरंग
आकांक्षेची पूर्तता होते, तेव्हा तिच्याबद्दलचे आकर्षण किंवा तिचे महत्त्व असीम कृतज्ञतेच्या भावनेत विलीन होऊन जाते. इच्छा तातडीने पूर्ण झाल्या नाहीत, तर बहुतकरून लोक स्वतःला भाग्यहीन समजू लागतात. तीव्र आकांक्षेमुळे तुम्ही निराश बनता किंवा प्रार्थनाशीलही बनू शकता. प्रार्थनाशीलतेत भक्ती आणि कृतज्ञता असते. कोणतीही सखोल किंवा तीव्र अनुभूती तुम्हाला संपूर्णता देते. दिव्यत्वाची प्राप्ती ही तीव्र उत्कट इच्छेवर अवलंबून असते. काळ आणि पात्रतेवर नाही. भारतातील ग्रामवासियांत अशी म्हण आहे, ‘पुष्प खुडण्यास थोडातरी वेळ लागेल, पण तेवढाही परमेश्वरप्राप्तीसाठी लागत नाही.’ तुमची कुवत किंवा पात्रता हा निकष नव्हे, तर तुमच्या उत्कट इच्छेची तीव्रता हा आहे. या क्षणी तुमची दिव्यत्वाची ओढ तीव्र करा. तुम्ही काहीच नाही आणि तुम्हास काही नको आहे हे समजते, तेव्हाच असे घडते. ‘आपण कुणीच नाही, आपल्याला काहीही नको,’ ही भावना आपलेपणा आणते आणि आपलेपणा आत्म्याची ओढ तीव्र करतो. अभिलाषा आणि उत्कट इच्छा यांत फरक काय? अभिलाषा ही डोक्याचा ताप आहे. उत्कट इच्छा ही हृदयाची हाक आहे.

संघटना आणि भक्ती 
ऐहिक गोष्टींशी संबंधित असल्यामुळे संघटनेत बारीक-सारीक गोष्ट आणि वास्तवता याकडे लक्ष द्यावे लागते. भक्ती म्हणजे स्वतःला हरवून जाणे, जग विसरणे, परमानंदात राहणे. या अगदी विरुद्ध गोष्टी आहेत. या एकमेकांबरोबर राहू शकत नाहीत, तसेच एकमेकांशिवाय पूर्ण असू शकत नाहीत. एकाचे दुसऱ्यावाचून काही अस्तित्व नाही. भक्तीशिवाय कुठलीही संघटना उभी राहू शकत नाही. तुमच्याकडे भक्ती असते, तेव्हा तुम्हाला संघटना उभारावीशी वाटते. भक्तीमुळे श्रद्धा, करुणा आणि जबाबदारी येते. तसेच ज्ञान, बुद्धी आणि प्रेम इतरांत वाटण्याची इच्छा निर्माण होते. नंतर संघटन घडते. संघटनेचे अस्तित्व भक्तीमुळे असते. तुम्ही भक्त असाल, तर नुसते बसून राहणार नाही. भक्तीचा स्वभाव देण्याचा आहे. तुम्हाला वाटत असेल की तुम्ही भक्त आहात आणि तुम्हाला जगाची पर्वा नसेल, तर तुम्ही निव्वळ स्वार्थी आहात. खरी भक्ती म्हणजे ईश्वराशी एकरूप होणे आणि ईश्वर जगाची काळजी वाहतो. नेहमी संघटन करताना भक्ती हरवते आणि तुम्ही भक्तीच्या नावाखाली गोंधळ निर्माण करता किंवा संघटनेकडे दुर्लक्ष करता. तुम्हाला भक्तीत आणि संघटनेत राहण्यासाठी संतच व्हावे लागते.

संस्था समजून घ्या
संपूर्ण सृष्टी ही एक प्रचंड मोठी संस्था आहे. सर्व काही अणूपासून बनले आहे. हे संपूर्ण जग म्हणजे दुसरे काही नसून एक संस्था आहे, अणूंनी विशिष्ट रचनेत स्वतःची नीट योजना करून त्यापासून एखादी वस्तू तयार करण्याचे ठरविले आहे आणि त्या विशिष्ट रचना त्यांच्यात विशिष्ट गुणधर्म निर्माण करतात. अणूंना विशिष्ट रचनेचा कंटाळा येतो आणि ते स्वतःची पुनर्रचना करण्याचे ठरवतात तेव्हा मृत्यू, नाश आणि परिवर्तन होते. उदाहरणार्थ सफरचंदातील अणू म्हणतात, ‘‘आता सफरचंद असणे पुरे झाले.’’ त्या वेळी ते सडायला सुरुवात होते. एका योजनाबद्ध स्थितीतून दुसऱ्यात प्रवेश करताना होणारे चलनवलनही योजनाबद्ध असते. ही एक सतत बदलणारी संस्था आहे, ज्याला आपण गोंधळ म्हणतो. या संस्थेला प्रेरकाची गरज असू शकते. ज्ञान हे असेच प्रेरक आहे. म्हणून तुमची संस्थेपासून सुटका नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com