चेतना तरंग :  ईश्वराचे ‘स्व’रूप पाहा...

श्री श्री रविशंकर, प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

ईश्वर म्हणजे पित्यासमान, स्वर्गात असलेला, असाच विचार तुम्ही नेहमी केलाय. पण, तुम्ही ईश्वर बालकाच्या स्वरूपात बघू शकता का? तुम्ही देवाला पित्यासमान मानता, तेव्हा त्याच्याकडून काहीतरी मागण्याची, घेण्याची इच्छा होईल.

ईश्वर म्हणजे पित्यासमान, स्वर्गात असलेला, असाच विचार तुम्ही नेहमी केलाय. पण, तुम्ही ईश्वर बालकाच्या स्वरूपात बघू शकता का? तुम्ही देवाला पित्यासमान मानता, तेव्हा त्याच्याकडून काहीतरी मागण्याची, घेण्याची इच्छा होईल. पण, तुम्ही ईश्वर बालकस्वरूपात बघता, तेव्हा तुमच्या काही मागण्या नसतील. ईश्वर हा तुमच्या अस्तित्वाचा साक्षात गाभा आहे. तुमच्याच गर्भात देव आहे. तुम्हाला तुमच्या गर्भारपणाची काळजी घ्यावी लागेल आणि प्रसूत होऊन या बालकाला जगात आणावे लागेल. बहुतांश लोक प्रसूतच होत नाहीत. जो कोणी प्रसूत होतो, त्याचीच इच्छापूर्ती होते. ईश्वर हे तुमचे मूल आहे. एखाद्या बाळाप्रमाणे ते तुम्हाला बिलगून असते. तुम्ही म्हातारे होऊन मरेपर्यंत हे मूल भक्ताला बिलगून पोषणासाठी टाहो फोडत असते. साधना, सत्संग आणि सेवा हे त्याचे पोषण आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ईश्वराचे वैविध्य जाणून घ्या 
देव फक्त एकच आहे, असे तुम्हाला का वाटावे? देवही अनेक का असू शकत नाहीत? देवाने त्याच्या स्वःतच्या प्रतिमेतून माणूस बनवला असेल, तर त्याची स्वतःची प्रतिमा काय आहे? आफ्रिकन, मंगोलियन, कॉकेशियन, जपानी, फिलिपिनो? मनुष्याचे इतके प्रकार का आहेत आणि वस्तूंची इतकी विविधता का आहे? झाडाचा फक्त एकच प्रकार नाही, तसेच एकाच प्रकारचे साप, ढग, डास किंवा भाजी नाहीत. कुठलीच गोष्ट एकाच प्रकारची नाही. मग देव का एकच असावा? हे चैतन्य, ज्यामुळे संपूर्ण सृष्टीची  निर्मिती आविष्कृत झाली आणि ज्याला वैविध्याची आवड आहे, ते चैतन्य एकसुरी कसे असू शकते? देवाला विविधता आवडते, त्यामुळे तो स्वतः असंख्य स्वरूपात असलाच पाहिजे. देव विविध नावांनी, आकारांनी आणि विविध प्रकाराने प्रकट होतो. काही संप्रदाय देवाला त्याच्या विविध स्वरूपात प्रकट होण्याचे स्वातंत्र्य देत नाहीत. त्यांना तो एकाच रूपात हवा असतो. प्रसंगानुरूप  तुम्ही तुमचे सादरीकरण बदलता. अशी वस्तुस्थिती असेल, तर आत्मा विविध स्वरूपात नाही, असे तुम्हाला कसे वाटते? प्राचीन लोकांना हे माहीत होते म्हणूनच त्यांना दिव्यत्व हे अनंत गुणांत आणि स्वरूपात आहे, याचे ज्ञान होते. आत्मा रटाळ आणि कंटाळवाणा नाही. आत्मा या सृष्टीच्या निर्मितीचा मूळ पाया आहे. तो जोशपूर्ण आहे आणि परिवर्तनशील आहे. देव एक नाही, परंतु अनेक आहेत! दिव्यत्वाची विविधता तुम्ही मान्य करता त्या वेळी तुम्ही स्वतःला धर्मवेडे किंवा मूलतत्त्ववादी होण्यापासून  रोखू शकता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sri sri ravi shankar article about ishwar