चेतना तरंग  :  स्वतःला दोष देऊ नका 

ravishankar
ravishankar

सुख-दु:ख आपल्या मनात येत असते आणि जात असते. म्हणून थोडा वेळ शांत बसून ध्यान करा, प्राणायाम करा, भजने म्हणा, प्रार्थना करा, असे केल्याने मनावर साठलेली धूळ साफ होते, मन स्वच्छ धुऊन निघते. हे करण्यासाठी दु:ख किंवा अडीअडचणी येण्याची वाट बघत बसू नका. तुम्ही याचा रोज नियमित सराव करायला लागलात की, तुमच्या सगळ्या समस्या, अडीअडचणी तुमच्यापासून लांब जायला लागतील. त्यातून एखादा प्रश्‍न निर्माण झाला तर ‘अरेरे असे कसे झाले, असे व्हायला नको होते,’ असले विचार मनात आणून काळजी करत बसू नका. उलट तुमचे मन स्वच्छ आहे का? तुमचा स्वभाव सरळ साधा आहे का? तुमचे हेतू शुद्ध आहेत का? याचा मागोवा घ्या. 

अनेकदा आपल्या मनात अपराधीपणाची भावना असते. त्यामुळे आपले खच्चीकरण होऊन साधना व्यवस्थित होत नाही. अपराधीपणाच्या भावनेमुळे आपण रागीट बनतो. संतापामुळे इतर अशुद्ध भावना मनाचा ताबा घेतात. अपराधीपणाच्या भावनेतून मुक्त होण्यासाठी आपल्यातल्या पवित्रतेचा आणि शुद्धतेचा मागोवा घ्यायला हवा. ही जाणीव तुमच्या अंतर्मनातून उमटायला हवी आणि त्यासाठी तुम्हाला तुमची ‘प्राणाक्ती’ किंवा ‘जैविक ऊर्जा’ वाढवायला हवी. सुदर्शन क्रिया, ध्यान धारणा, भजन, प्राणायाम या सगळ्या गोष्टींमुळे प्राणाक्ती वाढते. मन शुद्ध आणि हलके बनते. 

मन हे एखाद्या पारदर्शक लोलकासारखे असते. त्या लोलकाच्या मागे ठेवलेला रंग तो लोलक परावर्तित करतो. त्याचप्रमाणे वातावरणात मिसळलेल्या भावभावनांचे पडसाद मनावर उमटतात. संताप, दुस्वास, द्वेषी वृत्ती, इच्छा-आकांक्षा या सर्व भावभावनांचे परिणाम मनावर प्रतिबिंबित होत असतात. ‘अरेरे, हे माझ्याच बाबतीत असे का घडले? मीच याला जबाबदार आहे.’ वगैरे म्हणून स्वत:लाच दोष देत बसू नका आणि कुढत राहू नका. तो मूर्खपणा ठरेल. त्याउलट ‘मी शुद्ध आहे, मी पवित्र आहे,’ ही जाणीव मनात सतत जागृत ठेवा. तिचा विसर पडू देऊ नका. यालाच विवेक म्हणतात! चांगले काय वाईट काय हे पारखण्याची सवय अंगी बाळगा. 

आपली चेतना ही ज्ञानमय आहे. तुम्हीच स्वत: ज्ञान आहात. ज्ञान मिळविण्यासाठी इकडे तिकडे जायची तुम्हाला खरी गरजच नसते. तुमचे मन शुद्ध नाही असे तुम्हाला वाटत असेल तर ते शुद्ध करण्यासाठी तुम्ही तपश्‍चर्या करणे आवश्यक आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

तप म्हणजे काय? तप म्हणजे ठरावीक कालावधीत केलेली एखादी क्रिया. मन गढूळ होते तेव्हा झेपेल त्याप्रमाणे नुसते पाणी पिऊन किंवा फलाहार करून पाच, सात दिवस उपवास करावा. एक ते दोन दिवस केला तरी चालेल. असे केल्याने तप होते. यावर दुसरा उपाय म्हणजे ईश्वराचे नामस्मरण, देवाची भजने गायल्यामुळे किंवा सत्संगात ती ऐकल्यामुळे तप साधले जाते. त्यामुळे मन स्वच्छ आणि साफ होते. मन साफ असणे हाच आपला मूळ स्थायिभाव असतो. मन गढूळ झाल्यावर तुम्ही अस्वस्थ होता, त्यामुळे ते आणखीन गढूळ बनते, तुम्ही स्वत:लाच दोष द्यायला लागता, ‘माझ्यातच कसलीतरी कमतरता आहे,’ असा विचार करायला लागता. हा अपराधी भाव पक्का होत जातो. स्वत:ला कधी दोष देऊ नका. किंवा कसलाही अपराधभाव मनात बाळगू नका. ‘माझा स्वभाव स्वच्छ आहे, शुद्ध आहे,’ हा भाव मनात ठामपणे बाळगा. रोज ध्यानधारणा करा. तप करा, म्हणजे यात नक्कीच फरक पडेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com