esakal | योगा लाइफस्टाइल : योगा आणि स्व-प्रेम
sakal

बोलून बातमी शोधा

योगा लाइफस्टाइल : योगा आणि स्व-प्रेम

योगा लाइफस्टाइल : योगा आणि स्व-प्रेम

sakal_logo
By
वसुंधरा तलवारे

तुमच्यापैकी किती जणांना स्व-प्रेम स्वार्थी वाटते? तुमच्यापैकी किती जणांच्या मनात स्वतःवर प्रेम करणे किंवा स्वतःची काळजी घेण्याबद्दल अपराधीपणाची भावना आहे? आपल्या भारतीय संस्कृतीत, विशेषतः महिलांमध्ये स्वतःला अग्रभागी मानण्यात कमालीची नाराजी असते. मात्र, योगातील स्वधर्म सांगतो, इतरांपेक्षा स्वतःकडे पाहणे आपले कर्तव्यच आहे आणि त्यानंतर तुमचे कुटुंब, मित्र, समाज आणि संपूर्ण जग येते. थोडक्यात, तुम्ही आरोग्यदायी असाल, परंतु मनात प्रेम नसल्यास तुम्ही प्रियजनांबरोबर प्रेम फारकाळ शेअर करू शकणार नाही.

कल्पना करा, काही कौटुंबिक अडचणींमुळे किंवा कामाच्या मर्यादांमुळे तुम्ही आठवडाभर झोपू शकला नाही. तुम्ही एक महिना किंवा वर्षभर असे राहू शकाल? आपल्या मोटारची नियमितपणे निगा राखणे आवश्यक असते, त्याचप्रमाणे स्वतःवर प्रेम करणेही आवश्यक आहे. माझ्यासाठी योगा म्हणजे मी आणि आत्मा तादाम्य पावणे होय. आत्म्याशी नाते निर्माण करणे होय. स्व-प्रेमाचा तो उत्कट क्षण आहे. आपण कोण आहोत, याचा शोध घेण्याचा तो आंतरिक प्रवास आहे. हा शोध घेत असताना स्वतःतील चांगल्या गुणांकडे आपण लक्ष देत नाही, तसेच त्यावर कामही करत नसल्याने ते विकसित होत नाहीत.

योगाच्या अष्टांगांनी मला या गोष्टी शिकविल्या...

  • यम : हे नैतिक शिस्तीचे अंग आहे. स्व-प्रेम म्हणजे शरीररूपी देवळात दररोज मिळणारी मनःशांती. त्यामुळे आपल्या शरीराकडे विशिष्ट पद्धतीने पाहण्याबरोबरच मनात असलेल्या न्यूनगंडाच्या भावनांवर परिणाम होत नाही. काही गोष्टी बदलता येतच नाही, ही वस्तुस्थिती त्यातून स्वीकारली जाते. त्या गोष्टींवर प्रेम, मृदुता आणि संयमाने काम करणे आवश्यक आहे, याची जाणीव निर्माण होते. तुम्हाला ‘नाही’ म्हणायचे असताना ‘होय’ म्हणता, त्या वेळी स्वतःसाठीची ती मोठी हिंसा होय. ही अवघड, पण मोकळेपणाने सांगण्याची बाब आहे.

  • नियम : हे सकारात्मक पालनाचे अंग आहे. आपल्याकडे आहे, त्यात आनंदी असणे आणि त्याच भावनेतून आत्म्याची जाणीव निर्माण करत उत्तम व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करणे म्हणजे स्व-प्रेम. कायम तुलना, स्पर्धा, टीका करणे स्व-प्रेमाच्या विरुद्ध आहे. स्वतःविषयी कनवाळूपणा ठेवा. दिवसभरात स्वतःसाठी वेळ काढा.

  • आसन : शारीरिक हालचाली, आपल्यातील कोंडलेली ऊर्जा बाहेर काढणे म्हणजे स्व-प्रेम. एका आसनात स्थिर राहणे आणि चिंतन करणे ही स्वतःसाठी केलेली सेवा आहे. ती आपण इतरांनाही देऊ शकतो. यातून तुम्ही जाल तिथे आनंद पसरवता, त्याचा इतरांनाही फायदा होतो.

  • प्राणायाम : हा जीवनाचा श्वासच आहे. श्वासावर नियंत्रण ठेवत शरीररूपी यंत्रणेला सतेज करणे, मनाला शांत आणि चिंतनशील बनविणे, यासाठी मिळालेली ती उत्तम भेट आहे.

  • प्रत्याहार : आपल्या इंद्रियांवर नियंत्रण असणे म्हणजे स्व-प्रेम. जगात खूप वैविध्य आहे, ते आपल्यासाठीच आहे असे अनेकांना असते. तुम्हाला लोक असा विचार का करतात, असा प्रश्न पडेल. प्रमाणाबाहेर खाणे, उशिरापर्यंत जागरण, अतिप्रमाणात मालिका, चित्रपट पाहणे, गॉसिप ऐकणे, कपड्यांचा अतिरिक्त विचार शरीरासाठी हानिकारक, विषसमान आहे.

  • धारणा : आपण हातातील कार्याबरोबरच अध्यात्मावरही श्रद्धा असणे, त्यावर लक्ष केंद्रित करणे म्हणजेही स्व-प्रेमच. सिंहही त्याच्या शिकारीवर लक्ष केंद्रित करतो करत असतो, पण त्यातून त्याच विकास होत नाही. परंतु मन शांत करणे, प्रेमाला शरण जाणे ही देणगी केवळ मनुष्य प्राण्याला मिळाली आहे!

  • ध्यान : मन शांत करणे आणि स्वतःशी एकरूप होणे म्हणजे स्व-प्रेम. भीती, असुरक्षितता, चिंता, निर्णय सोडून देत स्वतःला वर्तमानात ठेवणे म्हणजे स्व-प्रेम.

  • समाधी : ही आनंदाची शुद्ध अवस्था आहे. या अवस्थेत आत्म्याशी खोलवर संपर्कात राहता. मनात कोणतीच इच्छा नसल्याने ताण येण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. समाधी ही उच्च अवस्था असून, सामान्यांसाठी ती अवघड असते. मात्र, कमीत कमी इच्छा बाळगणे आपल्या हातात आहे. इतरांनी काय निवडले आहे, त्यामागे धावण्यापेक्षा आपल्यासाठी खरोखरच काय महत्त्वाचे आहे, त्याची निवड करा.

loading image
go to top