
Nagpur : ब्लू लिफ बारमध्ये सापडली अल्पवयीन मुले हुक्का पिताना ११ जण ताब्यात
नागपूर : अंबाझरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शंकरनगर चौकात ब्लु लिफ बॉर अँड रेस्टॉरेंटमध्ये अल्पवयीन मुले मद्यधुंद अवस्थेत हुक्का पिताना आढळून आली. ही घटना शुक्रवारी (ता. ३१) साडेदहा वाजताच्या सुमारास घडली.
ब्लु लिफ बॉर अँड रेस्टारेंटमध्ये शुक्रवारी (ता.३१) एक पार्टी होती. तिथे काही अल्पवयीन मुला-मुलींचा समावेश असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे सहायक पोलिस आयुक्त निलेश पालवे, बजाजनगर पोलिस पथक आणि धंतोली पोलिस पथकाने संयुक्तरित्या शंकरनगर येथे असलेल्या बारमध्ये छापा टाकला.
यावेळी येथे ११ अल्पवयीन मुले मद्यधुंद अवस्थेत आढळून आले. विशेष म्हणजे, येथे सिगारेट, हुक्काही पिण्यासाठी उपलब्ध करून दिल्याची बाब समोर आली. त्यामुळे तिन्ही पथकाने अकरा जणांना ताब्यात घेत, त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी बारमधील गौरंग शिक्षार्थी (वय ४०, रा. खरे टाउन सिताबर्डी), नितीन शुक्ला व साथीदारांवर अंबाझरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
दारुच्या नशेत एसीपीला शिविगाळ
बारवर कारवाई करीत असताना तिथे आलेले बारमालक गौरंग शिक्षार्थी (वय ४०, रा. खरे टाउन सिताबर्डी), नितीन शुक्ला आणि त्याचा मित्र अमित पोद्दार याने दारूच्या नशेत सहायक पोलिस आयुक्त निलेश पालवे आणि पोलिस अधिकाऱ्यांना शिविगाळ करण्यास सुरुवात केली. गृहमंत्र्यांशी चांगली ओळख असल्याने जे करायचे असेल ते करा अशी धमकी देत,
तुम्ही काहीही कारवाई करा, काहीही होणार नसल्याचे सांगितले. निलेश पालवे यांच्या अंगावर धावूनही गेला. ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याला कळताच, घटनास्थळी पोलिस उपायुक्त आणि इतर अधिकारी दाखल झाले. अंबाझरी पोलिस ठाण्यात तिघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला.