Nanded : एसटीचे नांदेड विभागात १० कोटींचे नुकसान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

st bus

एसटीचे नांदेड विभागात १० कोटींचे नुकसान

नांदेड : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी ता.२९ आॅक्टोबरपासून विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला आहे. दिवाळीच्या हंगामातही संप सुरुच होता. आतापर्यंत १७ दिवसात नांदेड विभागातील नऊ आगाराचे सुमारे १० कोटीचे नुकसान झाले असून, संप काळात विभागातील ६२ कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्यात आल्याचे नांदेड विभागाचे डिटीओ संजय वाळवे यांनी सांगितले.

राज्यात एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी ता.२९ आॅक्टोबरपासून विविध मागण्यांसाठी बेमुदत संप सुरु केला आहे. शासन दरबारी अद्याप कोणताही ठोस निर्णय न झाल्यामुळे कर्मचारी संपावर ठाम आहेत. दिवाळीच्या सनात अनेक गोरगरिबांना आर्थिक भुर्दंड लागून प्रवासात व्यत्यय आला. खासगी वलाहन धारकांनी मनमानी करून हजारो रुपये आगाऊ भाडे आकारल्याने सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

शासनाने एसटी महामंडळाच्या कर्मचारी संघटनेसोबत चर्चा करून मार्ग लवकरात लवकर काढावा अशी मागणी आता प्रवाशांमधून होत आहे. नांदेड विभागातील नांदेड, माहूर, भोकर, किनवट, मुखेड, देगलूर, कंधार, हदगाव आणि बिलोली या नऊ आगारातून प्रत्येकदिवशी ५२ ते ५४ लाख रुपये उत्पन्न मिळत होते. दिवाळीच्या काळात ६० ते ६५ लाख रुपये दर दिवशी उत्पन्न यापूर्वी मिळालेले आहे. त्यानुषंगाने दिवाळीच्या हंगामात गेल्या १७ दिवसात नांदेड विभागाचे १० कोटीचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. शासनाने त्वरीत उपाययोजना केली नाहीतर एसटी महामंडळ आणखी मोठ्या तोट्यात जाण्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांसह सामान्य नागरिकांना एसटी महामंडळामुळे प्रवासी वाहतुक सुखर होती. खासगी वाहतुकदारांनी एसटीच्या संपाजा गैरफायदा घेऊन मनमानी तिकीट भाडे आकारले जात आहे. जवळपास दुप्पट तिकिटाचा दर वाढवल्यामुळे सर्व सामान्यांना आर्थिक फटका बसत आहे.

loading image
go to top