नांदेड महापालिकेच्या स्थायी समितीत २५ कोटींच्या विकासकामांना मान्यता 

अभय कुळकजाईकर
Tuesday, 27 October 2020

नांदेड वाघाळा महापालिकेत स्थायी समितीचे सभापती अमितसिंह तेहरा यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता. २६ आॅक्टोंबर) स्थायी समिती सभागृहात सभा घेण्यात आली. त्यात १५ विषयांना मंजूरी देण्यासोबतच शहरातील विविध भागातील २५ कोटी रुपयांच्या विकासकामांनाही मान्यता देण्यात आली.

नांदेड - नांदेड वाघाळा महापालिकेच्या स्थायी समितीच्या सोमवारी (ता. २६) सकाळी अकरा वाजता झालेल्या सभेत १५ विषयांना मान्यता देण्यात आली. त्याचबरोबर २५ कोटी रुपयांची शहरातील विविध विकासकामांना मान्यता दिली असून सदरील कामे जलदगतीने पूर्णत्वास नेण्याचा मानस स्थायी समितीचे सभापती अमितसिंह तेहरा यांनी बोलून दाखवला.
 
महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभागृहात सभापती तेहरा यांच्या अध्यक्षतेखाली आॅनलाइन सभा झाली. यावेळी प्रभारी नगरसचिव अजितपालसिंघ संधू, उपायुक्त श्री. बिक्कड, शुभम क्यातमवार आदींसह समिती सदस्यांनी आॅनलाइन सहभाग घेतला. विषयपत्रिकेवर १५ विषय होते. यामध्ये आरोग्य विभागाने कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने खरेदी केलेल्या व्हीटीएम किट व पीपीई किटच्या खर्चाची नोंद घेणे, पाणीपुरवठा विभागाच्या पंप दुरूस्ती व ट्रान्सफॉर्मर दुरूस्तीच्या खर्चाची नोंद घेणे तसेच एका कर्मचाऱ्याच्या अपिलाची नोंद घेणे आदी विषय होते. 

हेही वाचा - कोरोना व ओल्या दुष्काळाचा सामना करण्याची शक्ती दे, श्री रेणुका मातेला साकडे

२५ कोटींच्या विकासकामांना मान्यता
सध्या सर्वात महत्वाचा असलेल्या आण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेतंर्गत शहरातील २५ कोटींच्या विकासकामांना मान्यता देण्याचा विषय होता. त्यास सर्वानुमते चर्चेअंती मान्यता देण्यात आली. कोरोना महामारीच्या काळात केवळ कोरोनावर लक्ष केंद्रीत केल्याने शहरातील आरोग्यसेवा व अत्यावश्यक सेवांवरच महापालिकेने भर दिला होता. परंतू त्यासोबतच स्थायी समितीने आता २५ कोटी रुपयांच्या विकासकामांना मान्यता देऊन शहरातील विकासकामांना पुन्हा नव्याने सुरवात केली आहे. मान्यता दिलेली ही कामे जलगगतीने पूर्णत्वास नेण्याचा मानस असल्याचे सभापती अमितसिंह तेहरा यांनी सांगितले. 

हेही वाचलेच पाहिजे - बाप रे बाप ! कोविड सेंटरमध्ये घुसला साप- डॉक्टर, कर्मचाऱ्यासह रुग्णांचीही तारांबळ

इतर प्रस्तावही झाले मंजूर
पाणीपुरवठा विभागातंर्गत ट्रान्सफॉर्मरची दुरूस्ती करणे, श्री गुरूगोविंदसिंघजी स्टेडीयम परिसरात एक्सप्रेस फीडर बसविणे, स्वच्छ महाराष्ट्र अभियातंर्गत जयभीमनगर येथील मोकळ्या जागेत सामुदायिक स्वच्छतागृह उभारणे, अग्निशमन विभागाच्या इमारतीचे बांधकाम करणे, साहित्यरत्न आण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेतंर्गत पक्कीचाळ भागात सिमेंट रस्ता करणे, लालवाडी भागात रस्ता करणे, आंबेडकर नगर ते गणेशनगर रस्ता करणे, पंचशील नगर ते तरोडा नाका रस्ता व नाली करणे, आंबेडकर नगर, जयभीमनगर, नागसेननगर, राजनगर, पुष्पनगर रस्ता व नाली करणे, सिद्धार्थनगर, लक्ष्मीनगर, पंचशीलनगर (ब्रह्मपुरी) या भागात रस्ता व पादचारी मार्ग करणे, रमामाता सोसासटी ते महात्मा फुले मार्केट रस्ता करणे या व इतर विषयांना चर्चा करून मंजुरी देण्यात आली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 25 crore development works approved in Nanded Municipal Corporation Standing Committee, Nanded news