नांदेड जिल्ह्यात पिकविमा कंपनीकडे ४५ हजार अर्ज 

अभय कुळकजाईकर
Thursday, 1 October 2020

नांदेड जिल्ह्यात जोरदार पाऊस तर काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळे तसेच पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या नुकसानीसंदर्भात पिक विमा कंपनीकडे जवळपास ४५ हजार अर्ज प्राप्त झाले आहे. त्याचबरोबर जिल्हा प्रशासनाने पिक विमा कंपन्यांना दिलेल्या सूचनेनुसार पंचनामे सुरु करण्यात आले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात नुकसानीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे

नांदेड - गेल्या काही दिवसात जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पुराच्या तडाख्यामुळे नुकसान झालेल्या ४५ हजार शेतकऱ्यांनी पिकविमा कंपनीकडे अर्ज दाखल केले आहेत. प्राप्त अर्जानुसार शेतकऱ्यांच्या शेतात जावून ॲपच्या माध्यमातून पंचनामे सुरु असल्याची माहिती प्रशासनासह विमा कंपनीच्या सुत्राने दिली. दरम्यान, नुकसानीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
 
नांदेड जिल्ह्यात जोरदार पाऊस तर काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळे तसेच पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या नुकसानीसंदर्भात पिक विमा कंपनीकडे जवळपास ४५ हजार अर्ज प्राप्त झाले आहे. त्याचबरोबर जिल्हा प्रशासनाने पिक विमा कंपन्यांना दिलेल्या सूचनेनुसार पंचनामे सुरु करण्यात आले आहेत. 

हेही वाचा - नांदेड जिल्ह्यात पावसाळ्यातील चार महिन्यात नऊ जणांचा मृत्यू 

नुकसानीबाबत माहिती देण्याच्या सूचना
जिल्ह्यात ता. १५ ते ता. १९ सप्टेंबर दरम्‍यान तसेच ता. २६ आणि ता. २७ सप्टेंबरला काही मंडळात अतिवृष्‍टी झाली आहे. काही ठिकाणी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. शासन निर्णय ता. २९ जून २०२० नुसार ज्‍या शेतकऱ्यांनी पिकाचा विमा भरलेला आहे, अशा शेतकऱ्यांनी अतिवृष्टी किंवा पूर परिस्थितीमुळे झालेल्‍या पिकाच्या नुकसानीबाबत विमा कंपनीला ७२ तासाच्‍या आत माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डाॕ. विपीन यांनी केले होते. 

शेतकऱ्यांनी केले ४५ हजार अर्ज
दरम्यान, आजपर्यंत जिल्ह्यातील ४५ हजार शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे अर्ज केल्याची माहिती सुत्राने दिली. ज्या शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत, अशा शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त शिवाराची पाहणी करुन पंचनामे करण्याची तीनशेच्यावर कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. हे कर्मचारी विमा कंपनीच्या ॲपवर पिकांची नोंदणी करतात. यानंतर नुकसानीची माहिती कंपनीकडे पाठविली जाते. दरम्यान, मुखेड, देगलूर, बिलोली आदी तालुक्यात नदीकाठच्या भागात तसेच सखल भागात पाणी साचल्यामुळे पंचनामे करण्यास अडचणी येत असल्याची माहिती मिळाली आहे. 

हेही वाचलेच पाहिजे - नांदेडला कोविड - नॉन कोविड रुग्‍णांसाठी एचआरसीटी चाचणीचे दर निश्चित

 क्रॉप इन्शुरन्‍स अॅपद्वारे करा अर्ज 
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अशाप्रकारे अतिवृष्टी किंवा पूर परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान होत असेल तर पुढीलप्रमाणे विमा कंपनीकडे अर्ज द्यावेत. यासाठी शेतकऱ्यांना १८००१०३५४९० या टोल फ्री नंबरवर अर्ज करता येईल. कंपनीच्‍या ई - मेल आयडी suportagri@iffcotokio.co.in वरही अर्ज करता येईल. क्रॉप इन्शुरन्‍स अॅपद्वारे तसेच संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी अर्ज देता येईल. याबाबत शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डाॕ. विपीन यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 45,000 applications to crop insurance company in Nanded district, Nanded news