नांदेड जिल्ह्यात पावसाळ्यातील चार महिन्यात नऊ जणांचा मृत्यू 

अभय कुळकजाईकर
Wednesday, 30 September 2020

यंदाच्या वर्षी नांदेड जिल्ह्यात ता. एक जून पासून सष्टेंबरपर्यंत पावसाळ्यातील चार महिन्यात नऊ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात लहान, मोठी अशी एकूण ११५ जनावरे दगावली आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यातील एकूण ७३० कच्चा घरांची पडझड झाली आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील जवळपास ६८५ गावांना त्याचा फटका बसला आहे. जिल्ह्यात एक लाख ६० हजार हेक्टरवरील पिके बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

नांदेड - ता. एक जून ते ता. २९ सप्टेंबर या चार महिन्यात जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमध्ये नऊ व्यक्तींसह ११५ लहान, मोठ्या जनावरांना प्राण गमवावा लागला आहे. यात पुरात वाहून चार तर वीज पडून पाच जणांना प्राणांना मुकावे लागले. यासोबतच जिल्ह्यातील ७३० कच्चा घरांची झाली पडझड आहे. या नैसर्गिक आपत्तीत बाधीत कुटुंबांना शासनाकडून तातडीने मिळणारी मदत मिळावी, अशी मागणी होत आहे. 

जिल्ह्यात दरवर्षी जून महिन्यात पावसाळा सुरू झाला की नैसर्गिक आपत्ती येते. अतिवृष्टी, नद्यांना पूर येणे, वीजा पडणे यासह इतर नैसर्गिक आपत्तीमध्ये अनेकांना प्राण गमवावा लागतो. यामध्ये शेतामध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांसह शेतमजूर पुरुष व महिलांचाही समावेश असतो. 

हेही वाचा - नांदेड जिल्ह्यातील बाभळी प्रकल्पात पाणी अडविण्यासाठी प्रयत्न सुरू

वीज पडून पाच जणांचा मृत्यू
यंदाच्या वर्षी वीज पडून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये अर्चना हनुमंत गिरी हरबळ (ता. कंधार), सुभाष दिगंबर गुंडेकर (रा. सरसम बुद्रुक, ता. हिमायतनगर), सुरेश जंगु कनाके (रा. मांडवा, ता. किनवट), उद्धव पांडुरंग तेलंग (रा. गौळ, ता. कंधार) व सुर्यकांत सुदाम डोइफोडे (ता. किनवट) यांचा समावेश आहे. 

पुरात वाहून गेल्याने चौघांचा मृत्यू
या सोबतच पुरात वाहून गेल्यामुळे चौघांचा मृत्यू झाला आहे. यात संतोष मारोतराव कदम (रा. धानोरा, ता. हदगाव), हनुमंत गोविंद गोरे (रा. हाणेगाव, ता. देगलूर), भागाजी परसराम जाधव (रा. वडगाव, ता. हिमायतनगर) व रामदास मलगाडा मलागर (रा. टाकळी, ता. देगलूर) या चौघांचा समावेश आहे. या सोबतच नैसर्गिक आपत्तीमध्ये ११५ लहान - मोठ्या जनावरांचा मृत्यू झाला आहे. अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील ७३० कच्च्या घरांची पडझड झाली आहे. 

हेही वाचलेच पाहिजे - नांदेड जिल्ह्यात प्रवाशांच्या जिवाशी खेळणाऱ्या एस.टी.बसेस 

जिल्ह्यातील ६८५ गावे बाधित 
जिल्ह्यात सष्टेंबर महिन्यात मुसळधार पावसासह काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. त्यामुळे जवळपास ६८५ गावांना त्याचा फटका बसला आहे. जिल्ह्यात एक लाख ६० हजार हेक्टरवरील पिके बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सोयाबीन, कापूस, ज्वारी, मुग आदी पिकांना फटका बसला आहे. तसेच ऊसासह फळबागांचेही नुकसान झाले आहे. नांदेड, बिलोली, धर्माबाद, अर्धापूर, देगलूर, मुखेड, हदगाव, मुदखेड, लोहा, हिमायतनगर, उमरी, कंधार, भोकर आणि नायगाव या चौदा तालुक्यातील गावे बाधित झाली आहेत. खरिपातील पिकांचे नुकसान झाल्यामुळे शासनाने बाधीतांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nine killed in four months of rains in Nanded district, Nanded news