esakal | टंचाईची झळ नसतानाही नळ योजनेसाठी ९१ लाखांचे टेंडर !
sakal

बोलून बातमी शोधा

degloo

देगलूर शहराची तहान भागवणाऱ्या करडखेड मध्यम प्रकल्पात सध्या ७२ टक्के पाणीसाठा असून यासाठी यातूनच १९० हेक्टर क्षेत्र सिंचनाखालीही आहे. परिसरातील नागरिक या प्रकल्पात कपडे धुण्याचे काम करत असल्यामुळे पाणी दूषित होत असल्याची तक्रार अनेकांनी केली आहे. याकडे प्रशासनाने गांभीर्याने बघण्याची गरज आहे.

टंचाईची झळ नसतानाही नळ योजनेसाठी ९१ लाखांचे टेंडर !

sakal_logo
By
अनिल कदम

देगलूर ः तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान नऊशे मिलिमीटर इतके आहे. या वर्षात खानापूर, शहापूर, माळेगाव, देगलूर या मंडळांत पर्जन्यमान सरासरीपेक्षाही जास्त झाले. तर हाणेगाव, मरखेल या मंडळांत ८५ टक्के इतका पाऊस झाला. त्यामुळे मे महिन्याचा उत्तरार्ध सुरू होत असतानाही तालुक्यातून एकाही टँकरची मागणी गावकऱ्यांकडून झाली नाही. जिथे कुठे पाणीटंचाई जाणवत असेल तर ती असमन्वयाअभावीच.

अनेक गावांतील हातपंप बंद असले तरी १४ व्या वित्त आयोगातून ही कामे ग्रामपंचायतींनी मार्गी लावणे आवश्यक होते. तसे होत नसेल तर त्यांच्या निधीला चाप लावण्याचे काम प्रशासनाने करणे आवश्यक आहे. मात्र, हे करण्याचे धारिष्ट्य प्रशासन दाखवील काय? हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच राहणार आहे. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून प्रशासन कोरोनाच्या लढाईत गुंतलेले आहे. तरीही संभाव्य काळातील पाणीटंचाई लक्षात घेता प्रशासनाने पाणीटंचाईचा कृती आराखडा तयार केला असून त्यातील काही कामांना प्रशासनाने तत्काळ मंजुरीही दिली आहे.

बारा गावांतील नळ योजनेच्या दुरुस्तीसाठी ८० लाख
तालुक्यातील खानापूर (दहा लाख ८४ हजार), लख्खा कोटेकल्लूर (६.१२), वझरगा (३.७३), हनुमान हिपरगा (१०.०३), शहापूर (५.३०), आलूर (३.७८), शेवाळा (६.०५), शिवणी (९.६१), पेडपल्ली ( ४.९१), बेबंरातांडा (६.३५), हाळी (४.८९) या गावातील नळ योजनेच्या दुरुस्तीसाठी प्रशासनाने ८० लाख रुपये मंजूर केले आहेत. त्याचे टेंडरही निघालेले आहे. आता गावांतील लोकप्रतिनिधींनी ही कामे कशी दर्जेदार करून घेतील त्यावर या गावातील नळ योजनेचे भवितव्य ठरणार आहे.

सोमूरच्या पूरक नळ योजनेसाठी साडेअकरा लाख!
टंचाई निवारणार्थ सोमूरच्या पूरक नळ योजनेसाठी ११ लाख ५७ हजार खर्चाच्या कामाला मान्यता दिली गेली असून या कामाचेही टेंडर निघाले आहे. त्यामुळे भविष्यात सोमूरच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्नही कायमचा निकाली निघण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - नांदेडची शतकाकडे वाटचाल : आज पुन्हा १३ पॉझिटिव्ह


दुसऱ्या टप्प्यात या गावची होणार कामे
इब्राहीमपूर (४.२०), तडखेल (४.२०), मेदन कल्लूर (५:००), मेदन कल्लूर पुनर्वसन (३:००), शेखापूर (२.९९), दरेगाव (३.९९), ढाेसणी (३.५८), बल्लूर (४.२१), कुंडली (४.७९) या गावांतील नळ योजनेच्या दुरुस्तीच्या कामाचा प्रस्तावही प्रशासनाने पाठविला असून त्याला प्रतीक्षा आहे आता मंजुरीची.

हेही वाचा - पुन्हा गावात आलास तर...ग्रामसेवकास दिली धमकी

करडखेड प्रकल्पात ७२ टक्के पाणीसाठा
देगलूर शहरवासीयांची तहान भागविणाऱ्या करडखेड मध्यम प्रकल्पात सध्या ७२ टक्के पाणीसाठा आहे. या प्रकल्पांतर्गत उन्हाळी हंगामासाठी १९० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली असून शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाप्रमाणे पाणी देण्याचीही मुभा देण्यात येत आहे. शहराला वार्षिक सरासरी ३० टक्के पाणीसाठा लागतो, उन्हाळ्याचे येणारे दिवस लक्षात घेता बाष्पिभवनामुळे पाच टक्केच पाणीसाठा कमी होऊ शकतो. शहरात सध्या तीन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे या वर्षी प्रकल्प क्षेत्रात पाऊस लांबला तरी दिवाळीपर्यंत पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही, एवढे मात्र निश्चित. 

loading image