माहूर तालुक्यात १५ हजार पाळीव प्राण्यांची आधार नोंदणी पूर्ण

साजीद खान
Sunday, 1 November 2020

गटविकास अधिकारी माहूर यांच्या अध्यक्षतेखाली (ता. २९) रोजी पार पडलेल्या या आढावा बैठकीत जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी आणि पशू विकास अधिकारी तांत्रिक जिल्हा परिषद यांच्यासह तालुक्यातील पशुधन विकास अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

वाई बाजार, माहूर (जि. नांदेड) : माहूर तालुक्यातील वाई बाजार व वानोळा गटात तब्बल १५ हजार पाळीव प्राण्यांची आधार नोंदणी शिवाय तोंडखुरी व पायखुरी लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती पंचायत समिती सभागृहात आयोजित आढावा बैठकीत देण्यात आली आहे. गटविकास अधिकारी माहूर यांच्या अध्यक्षतेखाली (ता. २९) रोजी पार पडलेल्या या आढावा बैठकीत जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी आणि पशू विकास अधिकारी तांत्रिक जिल्हा परिषद यांच्यासह तालुक्यातील पशुधन विकास अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

लंपी स्किन आजारावर यशस्वी मात केल्यानंतर माहूर शहरासह तालुक्यातील वाई बाजार व वानोळा गटातील संपूर्ण गावात पाळीव प्राण्यांची आधार नोंदणी करण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. ही नोंदणी केल्यानंतरच जनावरांना तोंडखुरी व पायखुरीचे लसीकरण करण्याचा कार्यक्रम जिल्हा परिषद पशुधन विकास विभागाने हाती घेतला होता. यात आतापर्यंत सुमारे पंधरा हजार पशूंची आधार नोंदणी करण्यात आली असून त्यांना तोंडखुरी व पायखुरी आजाराचे प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण करण्यात आल्याची माहिती आढावा बैठकीत देण्यात आली आहे.

हेही वाचाचोरट्यांचे पोलिसांना आव्हान : भाऊराव चव्हाण कारखान्याच्या कार्यालयासह एकाच रात्रीत सहा दुकाने फोडली -

यांची होती उपस्थिती 

गटविकास अधिकारी वाय. आर. मेहेत्रे यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या बैठकीत जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. भूपेंद्र बोधनकर, पशु विकास अधिकारी तांत्रिक जिल्हा परिषद डॉ. अरविंद गायकवाड, तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ. उमेश धोंड, वाई बाजारचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संतोष दांडेगावकर यांची उपस्थिती होती. तर बैठकीचे नियोजन सहाय्यक पशुधन विकास अधिकारी श्री. मिरगे यांनी केले होते. यावेळी तोंडखुरी व पायखुरी लसीकरणाचे दिलेले लक्षांक उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्याची ग्वाही माहूर तालुक्यातील पशुधन व कर्मचारी यांनी दिली.

जनावरांच्या आजाराशी निगडीत आवश्यक ते संपूर्ण उपाय योजना करण्यासाठी आम्ही तत्पर असून जनावरांना तोंडखुरी व पायखुरीचे लसीकरण करण्यासाठी पशुपालकांनी जवळील पशुधन दवाखान्यात पशूंची आधार नोंदणी व लसीकरण करावे असे अहवान यानिमित्ताने करण्यात येत आहे.
- डॉ. संतोष दांडेगावकर, पशुधन विकास अधिकारी, वाई बाजार.

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aadhar registration of 15,000 pets completed in Mahur taluka nanded news