Video ; नांदेड जिल्ह्यात पेरणीपूर्व मशागतीला वेग     

राजन मंगरुळकर 
मंगळवार, 19 मे 2020

नांदेड जिल्ह्यात कोरोनाच्या महामारीतही शेतकरी शेतामध्ये कष्ट करत आहेत. संकटावर संकटे येत असताना आशेवर जगणारा शेतकरी सात जूनपासून मृग नक्षत्राला सुरुवात होत असल्याने शेतीच्या मशागतीमध्ये गुंतला आहे. बैल जोडी, ट्रॅक्टरने नांगरणी करण्यासोबतच धसकटे वेचण्यात महिलाही व्यस्त असल्याचे चित्र पासदगाव, कामठा, नांदुसा परिसरात दिसत आहे.  

नांदेड : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाउनमुळे लोकांची गर्दी होणारे सर्व व्यवहार बंद आहेत. यातच सात जूनपासून मृग नक्षत्राला सुरुवात होत असल्याने शेतीच्या मशागतीमध्ये शेतकरी गुंतला आहे. बैल बाजारही बंद असल्यामुळे पेरणी तोंडावर लहान शेतकरी अडचणीत आले आहेत. बैलांअभावी शेतकऱ्यांना ट्रॅक्टरच्या माध्यमातून पेरणीपूर्व मशागतीचे कामे करावी लागत आहेत.

दहा लाख ३३ हजार शंभर हेक्टर क्षेत्र असलेल्या नांदेड जिल्ह्यात खरिपात जवळपास आठ लाख हेक्टर पेरणीलायक क्षेत्र आहेत. तर रब्बीत दोन लाख ७५ हजार हेक्टर क्षेत्र आहे. जिल्ह्यात सात लाख ९६ हजार सहाशे शेतकरी आहेत. यात अल्पभूधारक शेतकरी तीन लाख आठ हजार १७३, अत्यल्प शेतकरी तीन हजार ४५ हजार ९०२, तर बहुभूधारक शेतकरी ८९ हजार ५१५ शेतकरी आहेत.

हेही वाचा - दोन दिवसांनंतर नांदेडला पुन्हा धक्का, एका पॉझिटिव्ह रुग्णाची भर, संख्या गेली ९८ वर

शेतकऱ्यांना बैल मिळेनासे झाले
पेरणीच्या पूर्वी दरवर्षी शेतकरी थकलेले तसेच कामाला चांगले नसलेल्या बैलांची बदलाबदल करतात. या वेळी पैशाची जळवाजुवळ अथवा शेतीमाल विक्रीवर पैसे दिले जातात. परंतु, यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाने मार्चच्या २३ तारखेपासून लॉकडाउन जाहीर केला आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्वच लहान - मोठे जनावरांचे बाजार बंद आहेत. यात नायगाव, मुखेड, जांब, हळी-हंडरगुळी, अर्धापूर, उमरी, बिलोली, किनवट, माहूर, धर्माबाद आदी ठिकाणचे बैल बाजार बंद आहेत. यामुळे शेतकऱ्यांना बैल मिळेनासे झाले आहेत.

हेही वाचा - वादग्रस्त प्रस्तावीत नांदेड शहर विकास आराखडा रद्द करा- आरक्षण संघर्ष समिती

अल्पभूधारकांची संख्या तीन लाख आठ हजार
जिल्ह्यात अत्यल्पभूधारकांची संख्या सर्वाधिक आहे. तीन लाख ४५ हजार शेतकरी एक हेक्टरपेक्षा कमी शेती असलेले शेतकरी आहेत. अल्पभूधारकांची संख्याही तीन लाख आठ हजार आहे. यामुळे या शेतकऱ्यांना यंत्रांच्या सहाय्याने शेती करणे परवडत नाही. अनेक छोटे शेतकरी एका बैलावरच शेती करतात. आपला एक बैल व दुसऱ्या एकाचा बैल अशी शेती करून मशागतीसह पेरणीची कामे करून घेतात. परंतु, यंदा बैल बाजार बंद असल्यामुळे याचा सर्वाधिक फटका कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना बसला आहे.

यांत्रिकीकरणाद्वारे शेती मशागतीचे दर
(दर प्रति एकरप्रमाणे आहेत)
कामाचा प्रकार...............दर
वखरणी..............७०० ते १,०००
पंजी..................७०० ते १,०००
पलटी नांगर.......२,००० ते २,२००
तिरी..................७०० ते १,०००
पेरणी..............१,००० ते १,२००
मोगडा.............१,००० ते १,२००
रोटावेटर...........१,८०० ते २,०००
लेवलिंग............प्रति तास चारशे रुपये

चाळीस हजार मेट्रिक टन उपलब्ध
आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना लागणाऱ्या विविध खताची मागणी मंजूर आंवटनानुसार जिल्ह्याला आतापर्यंत ४१ हजार मेट्रिक टन झाल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली. खरिपासाठी जिल्ह्यात रासायनिक खताचा मुबलक साठा असल्याचे काळजी करण्याची गरज नसल्याचे यावेळी प्रशासनाने सांगितले.

येथे क्लिक कराच कोरोना ईफेक्ट; ‘स्वारातीम’चे कामकाज ३१ मेपर्यंत बंद

३१ हजार २३२ मेट्रिक टन खताचा पुरवठा
जिल्ह्यासाठी आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना लागणाऱ्या रासायनिक खताची मागणी कृषी विभागाने राज्याच्या कृषी आयुक्तालयाकडे केली होती. त्यानुसार दोन लाख २७ हजार ९८० मेट्रिक टन खताचे आंवटन मंजूर झाले आहे. कृषी विभागाच्या मागणीनुसार एप्रिल महिन्यामध्ये एकूण ३१ हजार २३२ मेट्रिक टन खताचा पुरवठा झाला आहे. हे खत मुख्य वितरकाच्या माध्यमातून किरकोळ विक्रेत्यांना वितरित करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाने दिली. यासोबतच मे महिन्यामध्ये आजपर्यंत दहा हजार ७५० मेट्रिक टन खताचा पुरवठा झाला आहे.

तक्रारी असल्यास संपर्क करा... 
जिल्ह्यात शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा संबंधित तक्रारी असल्यास त्यांनी तालुका तक्रार निवारण समितीकडे व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे संपर्क करावा. तसेच जिल्हा स्तरावर तक्रारींसाठी राज्य शासनाचे कृषी विभाग तसेच जिल्हा परिषद स्तरावर संपर्क करावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. शेतकऱ्यांनी उत्पादन खर्च कमी करण्यासाठी सोयाबीन, मूग, उडीद व तूर या पिकांचे घरचे बियाणे वापरण्यास प्राधान्य द्यावे. तसेच सोयाबीनची उगवण क्षमता तपासून पेरणी करण्याचे आवाहन केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accelerated Pre-Sowing Cultivation in Nanded district, nanded news