शेतकऱ्यांसाठीची अपघात विमा योजना ठरतेय मृगजळ

farmer.jpg
farmer.jpg


धर्माबाद, (जि. नांदेड) ः गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना योजनेअंतर्गत धर्माबाद तालुक्यात गेल्या चार वर्षात २० प्रस्ताव दाखल करण्यात आले होते. त्यापैकी केवळ ८ प्रस्ताव मंजूर झाले आहेत. या योजनेत किचकट अटी समाविष्ट करण्यात आल्या असून मंजुरीची प्रक्रिया ही दिरंगाईची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठीची ही अपघात विमा योजना केवळ मृगजळ ठरत आहे. 

शासनाच्या वतीने शेतकरी कुटुंबाला आधार देण्यासाठी २००५ - ०६ पासून शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू अथवा अपंगत्व आल्यास शेतकरी अपघात विमा योजना सुरू करण्यात आली आहे. दरम्यान या योजनेचे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना असे नामकरण करण्यात आले. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कृषी विभागाकडे प्रस्ताव दाखल करावा लागतो. मात्र योजनेसाठी ढीगभर कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागते. तसेच विमा कंपनीकडून सातत्याने त्रुटी काढण्यात येत असल्याने अनेक प्रस्ताव प्रलंबित राहत आहेत.

किचकट प्रणालीमुळे या योजनेचा लाभ मिळत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अनेक कुटुंब या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढे येत नसल्याचे दिसून येते. २०१६ - १७ मध्ये एकूण ४ प्रस्तावापैकी १ मंजूर तर ३ नामंजूर झाले. २०१७ - १८ मध्ये एकूण ६ पैकी ४ मंजूर तर २ प्रलंबित आहेत. २०१८ - १९ मध्ये एकूण ७ पैकी ३ मंजूर झाले तर ४ प्रस्ताव प्रलंबित आहेत. २०१९ - २० मध्ये एकूण ३ प्रस्ताव दाखल झाले असून ३ प्रलंबितच आहेत. अशी माहिती कृषी पर्यवेक्षक दिपक कोळीकर यांनी दिली आहे. 


अशी मिळते मदत
गोपीनाथ मुंडे शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्याचा अपघात मृत्यू झाल्यास अथवा दोन डोळे अथवा दोन हात अथवा दोन पाय अथवा एकाच वेळी एक हात, एक पाय, एक डोळा निकामी झालेल्या शेतकऱ्यांना २ लाखाची मदत देण्यात येते. तसेच एक डोळा, एक हात अथवा एक पाय निकामी झाल्यास १ लाख रुपये मदत दिली जाते. अशी माहिती कृषी मंडळ अधिकारी माधुरी उदावंत यांनी दिली आहे. 

धर्माबाद तालुक्यात या योजनेअंतर्गत चार वर्षात २० प्रस्ताव दाखल करण्यात आले होते. त्यापैकी केवळ ८ प्रस्ताव मंजूर झाले आहेत. ३ प्रस्ताव नामंजूर तर ९ प्रस्ताव प्रलंबित आहेत. 
- एस. एच. पवार तालुका कृषी अधिकारी धर्माबाद. 

संपादन - स्वप्निल गायकवाड
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com