मठाधिपतीच्या हत्याकांडाने हादरलं नांदेड, १० तासात आरोपीला अटक

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 24 May 2020

नागठाणा येथे पालघर येथील घटनेची पुनरावृत्ती रविवारी (ता.२४ मे) पहाटे दीड ते दोन वाजेच्या घडली. मठातील एका शिष्यासह महाराजांची हत्या करून कपाटातील रोख रक्कम, सोने, चांदी आदी ऐवज आरोपीने लंपास केला.

नांदेड : नागठाणा बु.(ता. उमरी) येथील बाल तपस्वी निर्वाण रुद्र पशुपतीनाथ महाराज आणि शिष्य भगवान शिंदे यांची मध्यरात्री दीड वाजताच्या दरम्यान हत्या करण्यात आली. आरोपी साईनाथ लिंगाडे (वय ३२) याला अवघ्या १० तासामध्ये तन्नूर येथे तेलंगणा पोलिसांनी ताब्यात घेतले. दुपारी तीन वाजता आरोपीला पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांच्या स्वाधीन केले.   

या घटनेची दखल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली होती. पोलिसांना आरोपीला तत्काळ अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सकाळीच पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर, अतिरिक्त पोलिस अधिक्षक विजय पवार, धर्माबादचे उपविभागीय पोलिस अधिकारी विजय पाटील, उमरीचे पोलिस निरीक्षक अशोक अनंत्रे, स्थानिक गुन्हे शाखेचे द्वारकादास चिखलीकर यांनी घटनास्थळाला भेट दिली. त्यानंतर श्री. मगर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीच्या शोधात पथके रवाना केली. तोपर्यंत तेलंगणा पोलिसांना आरोपीला ताब्यात घेतले होते.

हेही वाचा - कंटेनरखाली बाळाला फेकणाऱ्या निर्दयी मातेला पोलिस कोठडी

नागठाणा येथे राज्य मठाधिपती बाल तपस्वी निर्वाण रुद्र पशुपतीनाथ महाराज रहात होते. या मठामध्ये शिष्यगणही मोठ्या प्रमाणावर राहतात. कोरोनामुळे संपूर्ण जग संकटात आहे. त्यामुळे प्रत्येकजणच स्वतःची काळजी घेत घरामध्येच रहात आहे. या संधीचा फायदा घेत अनेक खून, दरोड्याच्या घटना घडत आहेत. नागठाणा येथेही पालघर येथील घटनेची पुनरावृत्ती रविवारी (ता.२४ मे) पहाटे दीड ते दोन वाजेच्या घडली. मठातील एका शिष्यासह महाराजांची हत्या करून कपाटातील रोख रक्कम, सोने, चांदी आदी ऐवज आरोपीने लंपास केला.

येथे क्लिक कराच -    Video - रमजान ईद काही तासांवर, तरीही ग्राहकांची प्रतिक्षाच

हद्द म्हणजे आरोपी साईनाथ लिंगाडे याने महाराजांची हत्या करून त्यांच्याच गाडीमध्ये मृतदेह टाकून गाडी पळवून नेण्याच्या बेतात होता. मात्र, शेजारील नागरिक तसेच मठाच्या गच्चीवर झोपलेले शिष्यगण जागे झाल्याने आरोपीने गाडी सोडून पळ काढला. परिणामी, नागरिकांना गाडीमध्ये महाराजांचा मृतदेह दिसल्याने एकच खळबळ उडाली. मठाची पाहणी करत असतानाच जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात एका शिष्याचाही मृतदेह दिसून आल्याने नागरिकांमध्ये अधिकच खळबळ उडाली. सध्या महाराजांचा मृतदेह उमरीच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये ठेवण्यात आला आहे.  

शिष्याचाही खून
ज्या मठात शिवाचार्य निर्वाणरुद्र पशुपतीनाथ महाराजांचा खून करण्यात आला, त्याच मठा शेजारील जिल्हा परिषद हायस्कूलच्या बाथरूममध्ये आणखी एका व्यक्तीचा मृतदेह सापडला. भगवान शिंदे (रा. चिंचाळा ता. उमरी) असे मयत शिष्याचे नाव आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून सकाळीच उमरी पोलिसांनी नागठाणा गाठून तपासाला सुरुवात केली होती. पालघरमध्ये दोन साधूंची जमावाकडून हत्या झाल्यानंतर नांदेड जिल्ह्यात माथेफिरूकडून बाल तपस्वींची हत्या झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

असे घडले हत्याकांड
मध्यरात्री दीड ते दोनच्या सुमारास नागठाणा येथे हत्याकांड झाले. सर्वप्रथम आरोपीने शिवाचार्य निर्वाणरुद्र पशुपतीनाथ महाराजांच्या शिष्याची हत्या केली. त्यानंतर मठाच्या भिंतीवरून उडी मारून आरोपीने मठात प्रवेश केला. सर्व शिष्यगण मठाच्या गच्चीवर झोपलेले होते. महाराज एकटेच मठाच्या खोलीत झोपले होते. आरोपीने दार तोडून प्रवेश केला आणि महाराजाची हत्या केली. त्यानंतर कपाटातील ऐवज घेऊन आरोपी साईनाथ याने महाराजांचा मृतदेह महाराजांच्या गाडीमध्ये ठेवला. मात्र, गाडी काढत असताना मठाच्या गेटमध्ये गाडी अडकली. त्या आवाजाने गावकरी, शिष्यगण जागे झाले. दरम्यान ऐवज गाडीमध्येच टाकून आरोपी दुचाकीवरून फरार झाला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accused Arrested In 10 Hours Nanded Crime News