
माहूर तालुका महसूल प्रशासनाच्या वतीने गौण खनिज तस्करीला आळा घालण्यासाठीची मोहीम जोरात सुरु केली आहे.
माहूर (नांदेड) : माहूर तालुक्यातील बेकायदेशीर वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या वाळू चोरांवर कारवाई करण्यासाठी माहूर महसूल विभागाने कंबर कसली आहे. बुधवारी (ता.२४) च्या सायंकाळी गोपिनीय माहितीवरून कोळी सायफळ शिवारातील पैनगंगा नदीच्या पात्रात पथक प्रमुख परिविक्षाधीन तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या नैतृत्वात करण्यात आलेल्या धडक कारवाईत नदीपात्रातील पाण्यातून तीन ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहे.
नांदेडमधील बातम्यांसाठी येथे क्लिक करा
माहूर तालुका महसूल प्रशासनाच्या वतीने गौण खनिज तस्करीला आळा घालण्यासाठीची मोहीम जोरात सुरु केली असून या मोहिमेअंतर्गत परिविक्षाधीन तहसीलदार यांच्या नैतृत्वात महसूल विभागाच्या पथकाने (ता.२४) बुधवारी सायंकाळी ६ ते ७ वाजताच्या दरम्यान सायफळ व मदनापुरला लागून असलेल्या कोळी (बे.) शिवारात तीन सोनालीका ट्रॅक्टर त्याच्यातील दोन ट्रॅक्टर विना नंबरचे व एक एम.एच.२९.ए.के.२७८२ क्रमांकाचा ट्रॅक्टर जप्त केल्याची माहिती पथकाकडून देण्यात आली.
अर्धापूरकरांनो सावधान; पांगरीत आढळले नव्याने कोरोनाचे दोन रूग्ण
रेती तस्करी करणाऱ्यांना पकडण्यासाठी परिविक्षाधीन तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या नेतृत्वात मंडळ अधिकारी सुगावे, पदकोंडे, तलाठी विश्वास फड, भानुदास काळे, राजुरवार, तलाठी कांबळे, संदिप जाधव, कोठारे, तलाठी महिला तलाठी कुडमेथे यांच्या टीमने बेकायदेशीर वाळू वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर जप्त करण्याची कारवाई करून सायफळ येथील पोलिस पाटील हेमंत गावंडे यांना ताब्यात दिले.
पाण्यात पोहून केले ट्रॅक्टर जप्त !
महसूल पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पैनगंगा नदी पात्रात धाड घातली असता वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पाण्याच्या आत टाकून वाळू भरणे सुरु होते. पथक नदीपात्रात आल्याचे पाहून ट्रॅक्टर चालक पळ काढण्याच्या बेतात होते. तेवढ्यात तलाठी विश्वास फड व कांबळे यांनी पाण्यात उड्या मारून ट्रॅक्टर चालकांना पकडण्यासाठी पोहून ट्रॅक्टरजवळ पोहचले पण तोपर्यंत ट्रॅक्टर चालक नदीपात्रातून पोहून रस्त्याच्या बाहेर निघाल्याने ट्रॅक्टर सोडून फरार होण्यात यशस्वी झाले होते. तलाठी यांनी ट्रॅक्टर सुरु करून पाण्याच्या बाहेर थडीला आणून टेकवले. एक ट्रॅक्टर खराब झाल्याने तिथेच, सोडून चाबी जप्त करण्यात आली. ट्रॅक्टर मालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महसूल प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
नूतन तहसीलदार, तलाठ्यांचे कौतुक !
माहूर तहसील कार्यालयातील कर्तव्यनिष्ठ तलाठ्यांच्या मदतीने परिविक्षाधीन तहसीलदार राकेश गिड्डे यांनी केलेल्या धडाकेबाज कारवाईची चर्चा संपूर्ण माहूर किनवट तालुक्यात चर्चिली जात होती. तर दुसरीकडे बेकायदेशीर वाळू चोरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या कारवाईच्या निमित्ताने एक गोष्ट अधोरेखित झाली ते म्हणजे अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर टिप्पर चालक-मालक सातत्याने महसूल विभाग आमच्या खिशात असल्याचा आव आणत होते. त्या गोष्टीला कुठेतरी या कारवाईच्या निमित्ताने पूर्णविराम मिळाले असून या धडाकेबाज कारवाईसाठी नूतन तहसीलदारांसह तलाठ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.