कोरोनाचा धैर्याने सामना करण्याचे रेल्वे अधिकारी व कर्मचाऱ्यांना सल्ला- डीआरएम उपिंदरसिंघ 

प्रल्हाद कांबळे
Sunday, 16 August 2020

नांदेड विभागीय रेल्वे कार्यालयात ७४ वा स्वतंत्रता दिवस उत्साहात साजरा

नांदेड : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागीय कार्यालयात शनिवारी (ता. १५) रोजी ७४ वा स्वातंत्रदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपिंदरसिंघ यांनी राष्ट्रध्वज फडकवला. त्यांनी नांदेड विभाग तसेच दक्षिण मध्य रेल्वेने या वर्षी केलेल्या विविध कार्याचा गौरव केला. तसेच रेल्वे कर्मचाऱ्यांना सतत कार्यतत्पर राहण्यास सांगितले.

कोविड-१९ मुळे जे संकट उभे राहिले आहे त्याचा ध्येर्याने सामना करण्याचे सर्व रेल्वे अधिकारी आणि कर्मचारी यांना आवाहन केले. कोविड -१९ मध्ये आत्तापर्यंत ज्या रेल्वे अधिकारी आणि कर्मचारी यांनी उत्कृष्ठ कार्य केले आहे त्यांचा विशेष सन्मान केला. रेल्वे डॉक्टर, कार्मिक विभागाचे अधिकारी- कर्मचारी तसेच सुरक्षा विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी इतर रेल्वे कर्मचाऱ्याकरिता मास्क, सॅनिटायजर्स, सोप यांची व्यवस्था केली, तसेच रेल्वे अधिकारी आणि कर्मचारी यांनी रेल्वे स्थानकावर कार्यरत असलेल्या रोजंदारी कर्मचारी यांना या कोरोनाच्या संकट काळात अन्न- धान्याचे वेळो- वेळी वाटप करून सहकार्य केल्या बद्दलही श्री सिंघ यांनी त्यांचे अभिनंदन केले.

हेही वाचा -  आपण सारे एकमेकांचे बळ होऊयात ! कोण म्हणाले ते वाचा...

विविध मार्गाचे विद्युतीकरणाची कंत्राट प्रक्रिया अंतिम टप्यात
  
नांदेड रेल्वे विभागात सुरु असलेल्या आणि या वर्षी पूर्ण झालेल्या कार्याची माहिती दिली. यात प्रामुख्याने मुदखेड-परभणी या मार्गाचे दुहेरीकरण पूर्ण झाले. अकोला- अकोट या मार्गाचे ब्रॉडगेज परिवर्तन पूर्ण झाले आहे. या मार्गावर लवकरच गाडी सुरु करण्यात येईल. नांदेड विभागाचे विद्युतीकरणाचे कार्य हाती घेण्यात आले आहे. यातील पिंपळकुट्टी ते मुदखेड आणि अकोला ते पूर्णा आणि परळी ते परभणी या मार्गाचे विद्युतीकरणाचे कार्य प्रगती पथावर आहे. मुदखेड ते मनमाड या मार्गाचे विद्युतीकरणाची कंत्राट प्रक्रिया अंतिम टप्यात आहे. कोरोना काळात रेल्वे प्रवासी सेवा बंद असल्यामुळे नांदेड रेल्वे विभागाचे आर्थिक नुकसान झाले आहे, हे भरून काढण्याकरिता माल वाहतूक वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. यात काही अंशी सफलता प्राप्त झाली आहे. आणखी माल वाहतूक वाढी करीता रेल्वे विभाग विविध सवलती देत आहे. या कामी बिजिनेस डेव्हलोपमेंट युनिट ची स्थापना करण्यात आली आहे. संकट काळातही रेल्वे सेवा अविरत सुरु असल्याचे नमूद करून याचे पूर्ण श्रेय रेल्वे अधिकारी आणि कर्मचारी यांना जात असल्याचे ते म्हणाले.  

महिला कल्याण संगठनकडन कोरोना काळातही उत्कृष्ट कार्य 

दक्षिण मध्य रेल्वे महिला कल्याण संगठन हे कोरोना काळातही उत्कृष्ट कार्य करत आहे. फक्त रेल्वे कर्मचारीच नाही तर त्यांचे कुटुंबीय सुद्धा आपआपल्या परीने या संकट काळात मदत करत आहेत. यात दक्षिण मध्य रेल्वे महिला कल्याण संगठन यांची भूमिका अत्यंत महत्वपूर्ण आहे. याकरिता महिला कल्याण संगठनच्या नांदेड विभागाच्या अध्यक्षा मनजीत कौर यांचे उपिंदरसिंघ यांनी अभिनंदन केले.

येथे क्लिक करामास्कनिर्मितीतून गरजू महिलांना मिळतोय रोजगार, कसा? ते वाचाच

आरपीएचे पथसंचलन

यानंतर रेल्वे प्रोटेक्शन फोर्सच्या जवानांनी परेड सादर केली. सादर केलेल्या परेडचे उपिंदर सिंघ यांनी निरीक्षण केले. या प्रसंगी आर.पी.एफमधील श्वान पथकातर्फे विविध प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. उपस्थितांनी त्यांची उत्स्फूर्त पणे दाद दिली. श्रीमती मनजीत कौर यांनी स्वतंत्रता दिना निमित्त आयोजित विविध स्पर्धेच्या विजेत्यांना तसेच कोरोना काळात उत्कृष्ट सेवा दिलेल्या अधिकारी- कर्मचारी यांचे पारितोषिके देऊन अभिनंदन केले. तसेच विविध शालेय परीक्षेत ज्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या पाल्यांनी उत्कृष्ठ प्रदर्शन केले त्यांनाही या प्रसंगी बक्षिस देऊन गौरविले गेले. 

यांची होती उपस्थिती

अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक नागभूषण राव यांनी महाव्यवस्थापक गजानन माल्या यांचा संदेश वाचून दाखविला. या प्रसंगी श्रीनिवास, दिवाकर बाबू, श्री श्रीधर, श्री स्वामी, विनू देव सचिन यांच्यासह विभागीय सुरक्षा आयुक्त आणि इतर रेल्वे अधिकारी, कर्मचारी आणि रेल्वे परिवारातील विविध व्यक्ती उपस्थित होत्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Advise Railway Officers and Staff to Face Corona with Courage - DRM Upinder Singh nanded news