५६ दिवसानंतर सचखंड आणि लंगरसाहेब झोनमुक्त: गुरुद्वाराचे दर्शन खुले

प्रल्हाद कांबळे
रविवार, 28 जून 2020

अखेर ५६ दिवसानंतर गुरुद्वारा तख्त सचखंड हजूर साहेब परिसर भोवतालचा कन्टेनमेंट झोन आणि गुरुद्वारा श्री लंगर साहेब येथील झोन हटवण्यात आले

नांदेड : कोरोनाच्या वाढत्या प्रार्दूरभावामुळे सचखंड गुरूद्वारा व लंगरसाहेब परिसर कन्टेनमेन्ट झोन जाहीर करण्यात आला होता. जिल्हा प्रशासनाना अखेर ५६ दिवसानंतर गुरुद्वारा तख्त सचखंड हजूर साहेब परिसर भोवतालचा कन्टेनमेंट झोन आणि गुरुद्वारा श्री लंगर साहेब येथील झोन हटवण्यात आले. शनिवार (ता. २७) जून रोजी महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्या सहीने कन्टेनमेंट झोन उठवल्या विषयी परिपत्रक काढण्यात आले. 

आदेश प्राप्त झाल्यानंतर आता गुरुद्वारा गेट नंबर एकचा मुख्य प्रवेशद्वार मार्ग मोकळा करण्यात आला. आणि भाविकांना दर्शनासाठी मार्ग मोकळा झाला. शनिवारी सायंकाळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने, उपायुक्त अजितपालसिंघ संधू यांनी गुरुद्वारा परिसर येथे भेट देऊन वरिष्ठ सहायक अधीक्षक रणजीतसिंघ चिरागिया यांच्याशी चर्चा केली. याप्रसंगी श्री चिरागिया यांचे सत्कार करून त्यांना प्रशासकीय अधिकाऱ्यांनी गुरुद्वारा बोर्ड प्रशासनाचे आभार व्यक्त करणारे एक मानपत्र प्रदान केले. वरील सन्मानपत्र अध्यक्ष भूपिंदरसिंघ मिनहास यांचे नावे असून बोर्डाचे आभार मानले गेले आहे.

 हेही वाचा -  महावितरणच्या संवाद मेळाव्यात काय घडले ?...वाचा

लंगर साहेबच्या दोन्ही संताच्या सेवेचा उल्लेख

तसेच गुरुद्वारा श्री लंगर साहेबचे मुख्य जत्थेदार संतबाबा नरेंदरसिंघजी कारसेवावाले आणि संतबाबा बलविंदरसिंघजी यांच्या नावाने गुरुद्वारा लंगरसाहेब तर्फे देण्यात आलेल्या सेवांचा उल्लेख करून आभार मानले गेले आहे. वरील आभार व सन्मानपत्र लंगर साहेबकडे प्रदान करून आभार व्यक्त करण्यात आले. 

गुरुद्वारा बोर्डाने मानले प्रशासनाचे आभार

मागील ५६ दिवसांपासून गुरुद्वारा सचखंड हजूर साहेब आणि गुरुद्वारा श्री लंगर साहेब परिसर कन्टेनमेंट झोन परिपत्रक काढून बंद करण्यात आले होते. जवळपास दोन महीने हा परिसर बंद ठेवल्यामुळे शीख समाजात चांगलीच नाराजगी वाढत होती. शेवटी शनिवारी (ता. २७) गुरुद्वाराचा कन्टेनमेंट हटवण्यात आल्यामुळे गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष स. भूपिंदरसिंघ मिनहास, उपाध्यक्ष स. गुरविंदरसिंघ बावा, सचिव स. रवीन्द्र सिंघ बुंगई, बोर्डाचे सर्व सदस्य, अधीक्षक स. गुरविंदर सिंघ वाधवा यांनी समाधान व्यक्त केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After 56 days, Sachkhand and Langarsaheb Zone Free: Darshan of Gurudwara opened nanded news