
जिल्हाधिकाऱ्यांनी या कामाच्या चौकशीचे आदेश देताच संबंधित अधिकारी व ठेकेदाराने शनिवारी (ता. २३) रातोरात या रस्त्यावर मुरूम टाकून आपण बोगस काम केलोत हे सिद्ध करून दाखवले आहे.
बिलोली (जिल्हा नांदेड) : मालगुजारी तलावाच्या रस्त्यावर मुरुन न टाकताच लघू पाटबंधारे विभागाच्या नायगाव शाखेतील अधिकारी व ठेकेदाराने संगणमत करुन सहा लाखाचे बोगस बिल उचलले या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यासाठी बिलोलीचे नगराध्यक्ष मारुती पटाईत यांनी चार दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण आरंभिले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी या कामाच्या चौकशीचे आदेश देताच संबंधित अधिकारी व ठेकेदाराने शनिवारी (ता. २३) रातोरात या रस्त्यावर मुरूम टाकून आपण बोगस काम केलोत हे सिद्ध करून दाखवले आहे.
बिलोली शहराच्या पश्चिम बाजूस असलेल्या मालगुजारी तलावात निकृष्ट दर्जाची कामे करून बोगस बिल उचलल्याची तक्रार नगराध्यक्ष मारुती पटाईत यांनी केली होती. मागणी मान्य होत नसल्यामुळे श्री पटाईत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण आरंभिले होते. उपोषणाची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी या कामाच्या चौकशीचा अहवाल दहा दिवसात सादर करण्याचे आदेश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला. मात्र अधिकारी चौकशीला येण्यापूर्वीच नायगाव लघुपाटबंधारे विभागाचे अधिकारी व ठेकेदाराने संगनमत करून रातोरात या तलावाच्या काठावर मुरूम टाकून चमत्कार घडून दाखवला. त्यांची ही चतुराई त्यांच्या अंगलट आली असून रविवारी जिल्हाधिकार्यांच्या आदेशान्वये बिलोलीच्या तहसीलदारांच्या माध्यमातून मंडळ अधिकारी तोटावार यांनी मुरूम टाकलेल्या रस्त्याचा पंचनामा केला आहे.
बिलोली शहरातील नागरिकांसाठी अत्यंत मोलाच्या असलेल्या मालगुजारी तलावातील पाणीसाठवण क्षमता वाढवावी व तलावाखाली असलेली जमीन सुपीक करून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करावी यासाठी शहरातील काही ग्रामस्थांसह नगरपालिकेने पुढाकार घेतला आहे. ग्रामस्थांच्या पाठपुराव्यामुळे मालगुजारी तलावातील सांडवा, गाईडवाॅल बांधकाम करणे, तलावाच्या कठड्यावर मातीकाम करून मुरूम टाकणे, या व अन्य कामासाठी तब्बल १९ लाख २८ हजार ४५० रुपयास प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. लघु पाटबंधारे विभागामार्फत त्यात आलेली ही निविदा एका ठेकेदाराकडे सोपविण्यात आली. २५ जुलै २०१९ रोजी कार्यारंभ आदेश देऊन दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. पहिल्याच टप्प्यात जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी न करताच आपला ११ लाख ५१ हजार ४१३ रुपयाचे धावते देयक आदा करून निकृष्ट काम करणाऱ्या गुत्तेदार यांचे पाठराखण केली.
तलावा नजीक असलेल्या अनेक शेतकऱ्यांनी तलाव दुरुस्तीचे काम होत असल्याचा आनंद व्यक्त केला. मात्र सदर काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्याची बाब नगराध्यक्ष मारुती पटाईत यांनी केलेल्या तक्रारीतून उघड झाली आहे. लघुपाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी कंत्राटदारांची आर्थिक तडजोडी करून बोगस कामे झालेली असतानाही देयके अदा केल्याचे उघड झाले आहे.
शासनाकडून तलावाच्या दुरुस्तीसाठी निधी आला मात्र जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे शहरातील शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यामुळे हा विषय जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडे मांडून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास भाग पाडणार असल्याचे नगराध्यक्ष मारुती पटाईत यांनी यावेळी सांगितले. सर्वच दोषींवर कारवाई करा... मालगुजारी तलावाचे बोगस कामे करून हे प्रकरण झाकून टाकण्यासाठी प्रयत्न करणारे पाटबंधारे विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसह ठेकेदाराची चौकशी व्हावी एवढा मोठा अपराध रस्ता करताना शासनाचे पगार घेणारे अधिकारी ह्या प्रकरणाला पाठीशी घालतात कसे त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागण नगराध्यक्ष पटाईत यांनी केली आहे.
संपादन- प्रल्हाद कांबळे