काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या छुप्या पाठिंब्यामुळेच शेतकरी विरोधी कायदे पारित- फारुख अहमद

प्रल्हाद कांबळे
Thursday, 17 December 2020

या कायद्याला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचा छुपा पाठिंबा असल्याचे सिद्ध होते. असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते फारुक अहमद यांनी नांदेड येथील पत्रकार परिषदेमध्ये केले.

नांदेड : केंद्र सरकारने पारित केलेले तिन्ही कायदे पारित होत असताना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभेतील सदस्य अनुपस्थित राहिले आणि त्यामुळेच राज्यसभेतील या ठरावाच्या बाजूचे समर्थन वाढले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभेतील सदस्यांची ही भूमिका म्हणजे शेतकरीविरोधी पारित झालेल्या या काळया कायद्यांना अप्रत्यक्ष समर्थन होय. यावरून या कायद्याला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचा छुपा पाठिंबा असल्याचे सिद्ध होते. असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते फारुक अहमद यांनी नांदेड येथील पत्रकार परिषदेमध्ये केले.

बुधवारी (ता. 16) डिसेंबर रोजी शेतकऱ्यांच्या सुरु असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्याच्या संदर्भाने उद्याच्या आंदोलनाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नांदेड येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांची भूमिका नेहमीच दुट्टपी राहिली असून दलित, आदिवासी व मुस्लिम समाजाच्या संदर्भाने या सरकारने अनेकदा अनेक कायदे जाचक स्वरुपातले पारित केले आहेत. त्याच धर्तीवर आता शेतकऱ्यांच्या विरुद्धही तीन काळे कायदे या सरकारने पारित करुन देशातील शेतकऱ्यांना अडचणीत आणले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे देशातील शेतकरी आधीच अडचणीत असताना व प्रसंगी तो मृत्यूला कवटाळत असताना सरकारने शेतकरी राजाला आधार देण्याऐवजी त्याच्या विरोधात जाचक कायद्याची निर्मिती केली आहे.

हेही वाचा परभणी : अखेर लोअर दूधनाच्या दोन्ही कालव्यातून टेलपर्यंत पाणी पोहोचले

या कायद्याला वरवर विरोध करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेतृत्वाने छुपा पाठिंबा दिला असल्याचे फारूक अहमद म्हणाले.
राज्यसभेत या कायद्याच्या समर्थनात मिळालेले बहुमत हे केवळ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभेचे सदस्य अनुपस्थित राहिल्यामुळे बहुमताने पारित झाले. त्यामुळे या पक्षाची भूमिका या काळ्या कायद्याच्या समर्थनार्थ असल्याचे सिद्ध करते.

वंचित बहुजन आघाडी या कायद्याच्या विरोधात सातत्याने रस्त्यावरील आंदोलन करत असून परवाच्या भारत बंदमध्ये वंचित बहुजन आघाडी मोठ्या ताकदीने सामील झाली. त्याचबरोबर ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशाने उद्या ता. 17 डिसेंबर रोजी राज्यभर जिल्हा कचरीसमोर या जाचक कायद्याविरोधात सांकेतिक आंदोलन करणार आहे. सरकारने शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द न केल्यास वंचित बहुजन आघाडी मोठे जन आंदोलन उभे करेल असा इशाराही फारुख अहमद यांनी दिला. या पत्रकार परिषदेला राज्य प्रवक्ते गोविंद दळवी महानगराध्यक्ष विठ्ठल गायकवाड महासचिव श्याम कांबळे यांची उपस्थिती होती.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anti-farmer laws passed due to covert support of Congress-NCP Farooq Ahmed nanded news