करणी, भानामती करणाऱ्यांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आव्हान

अभय कुळकजाईकर
Friday, 30 October 2020

नांदेड शहराला लागून असलेल्या बोंढार येथील नागरिक अंधश्रद्धेंना बळी पडत आहेत. करणी, भूत, भानामती याबाबतच्या अंधश्रद्धा दूर करण्यासाठी अंनिसने नागरिकांसाठी प्रबोधनाचा एक कार्यक्रम घ्यावा, अशी गावकऱ्यांनी विनंती केली व कार्यक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रमात करणी, भूतबाधा, भानामती यावर सम्राट हटकर यांनी माहिती दिली. तसेच करणी करण्याचा दावा करणाऱ्यांना व त्यावर तोडगे सांगणाऱ्यांना आव्हान केले.

नांदेड - नांदेड शहराला लागून असलेल्या नेरली जवळील बोंढार (ता. नांदेड) या गावी करणी, भानामतीचे प्रकार वाढले आणि त्यावर तोडगे काढणारे देवकरीन आणि देवकर अवतरले. तेथील काही जागरूक नागरिकांनी नांदेड येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संपर्क साधला. अंनिसने बोंढार येथे कार्यक्रम घेऊन करणी, भानामती करणाऱ्यांना आणि त्यावर तोडगा काढणाऱ्यांना आव्हान दिले.

बोंढार (ता. जि. नांदेड) आणि परिसरात आजारी पडलेल्या लोकांना तुम्हाला करणी केली आहे व ती दूर करण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागतील व त्यासाठी एवढा खर्च येईल, असे सांगून लोकांना वैद्यकीय उपचारापासून परावृत्त करून स्वतःची तुंबडी भरण्याचे उद्योग काही दिवसांपासून सुरु झाले. देवकरीन आणि देवकर सर्वच रोगांवर उपचार करतात. कोणताही रोग त्यांच्या आवाक्याबाहेर नाही. पायावर आलेली सूज कमी करण्यासाठी पेटी देणे व त्यासाठी पाचशे - हजार रुपये उकळणे, आजार दूर करण्यासाठी बकऱ्याचा बळी देण्यासाठी सांगणे, निरंक उपवास करायला सांगणे, ठराविक दिवशी, ठराविक ठिकाणी वाऱ्या करायला सांगणे, रक्तदाब असणाऱ्या व्यक्तीला त्यांच्या गोळ्या बंद करायला व वैद्यकीय उपचार थांबवायला सांगून स्वतः दिलेले गंडे, दोरे, ताईत वापरण्यास सांगणे, अशी काही उदाहरणे आहेत. तसेच मानसिक ताणतणावात असलेल्या व्यक्तींना भूत लागले आहे असे त्याच्या नातेवाईकांना सांगायचे. भूतबाधा दूर करण्यासाठी भूत लागलेल्या व्यक्तीला चार - पाच जणांकरवी जबरदस्ती धरून ठेवायचे आणि त्याच्या डोळ्यात झेंडूबाम घालणे किंवा लिंबू पिळणे असे अघोरी उपचार करण्याचे उद्योग सुरू असल्याची माहिती मिळाली. 

हेही वाचा - नांदेड : स्त्रियांवर होणाऱ्या हिंसेचे कारणीभूत घटक, वाचा सविस्तर

‘अंनिस’ ने दिली गावाला भेट
देवकरीन व देवकर असे उद्योग करत असल्याबाबतची माहिती बोंढार येथील काही जागरूक नागरिकांनी महाराष्ट्र अंनिस नांदेडचे जिल्हा कार्याध्यक्ष सम्राट हटकर यांना दिली. त्यांनी बोंढार गावाला भेट देऊन तेथील गावकरी, सरपंच, पोलिस पाटील यांच्याशी चर्चा केली. तसेच लिंबगाव पोलीस ठाण्यास भेट दिली. अशा प्रकारामुळे गावात भांडण-तंटे, मारामारीचे प्रकार घडू शकतात, असे पोलीस निरीक्षकांना सांगितले. पोलीस निरीक्षकांनी या संवेदनशील विषयाबाबतची दखल घेऊन ताबडतोब संबंधितांना समज दिली. तसेच सहकार्याचे आश्वासन दिले.

अंनिसचे २१ लाखाचे बक्षीस 
बोंढार येथील नागरिक अशा अंधश्रद्धेंना बळी पडत आहेत. करणी, भूत, भानामती याबाबतच्या अंधश्रद्धा दूर करण्यासाठी अंनिसने नागरिकांसाठी प्रबोधनाचा एक कार्यक्रम घ्यावा, अशी गावकऱ्यांनी विनंती केली व कार्यक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रमात करणी, भूतबाधा, भानामती यावर सम्राट हटकर यांनी माहिती दिली. तसेच करणी करण्याचा दावा करणाऱ्यांना व त्यावर तोडगे सांगणाऱ्यांना आव्हान केले. माझ्या डोक्यावरचे केस, अंगावरचा कपडा, पायाखालची माती काय पाहिजे असेल ते घेऊन जा व माझ्यावर करणी करून दाखवा तसेच अंनिसचे २१ लाखाचे बक्षीस सुद्धा मिळवा, असे आव्हान दिले. 

हेही वाचलेच पाहिजे - कनेरगाव येथील घरगुती गॅस टाकीच्या स्फोटात चाळीस हजाराचे नुकसान 

‘अंनिस’तर्फे बोंढारला गावकऱ्यांचे प्रबोधन
यावेळी श्री. हटकर यांनी चमत्कार सादरीकरण व त्यामागील विज्ञान सांगीतले. गरीब, कष्टकरी लोकांना रोजगार बुडवून शहरात जाऊन मोठी फीस देऊन वैद्यकीय उपचार घेणे नको वाटतो. गरिबी, अज्ञान आणि पैसा खर्च करण्याची ऐपत नसल्यामुळे असे गावठी इलाज त्यांना सोयीचे वाटतात. परंतु त्यांनी वैद्यकीय उपचार घेतले पाहिजेत, असे श्री. हटकर यांनी सांगितले. ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्याचे समूळ उच्चाटन कायदा २०१३’ या कायद्याचे पोस्टर प्रदर्शन आणि माहिती यावेळी देण्यात आली. 

कार्यक्रमासाठी यांनी घेतला पुढाकार
या कार्यक्रमामध्ये अंनिसचे जातीअंत प्रकल्प विभागाचे कार्यवाह प्रा. शिवाजी कांबळे व युवा कार्यवाह चित्ततोष करेवार यांचा सहभाग होता.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मारोतराव बागल होते. प्रमुख पाहुणे म्हणून पंजाबराव आढाव उपस्थित होते. मल्हारी बैकरे यांनी सूत्रसंचालन केले तर माधव भिसे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाचे आयोजन हनमंत वड्डे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी चांदु बागल, माधव वड्डे, विजय वड्डे, आनंदा वड्डे, चांदु बैकरे, गायकवाड व पवन सारडा यांनी प्रयत्न केले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Appeal of the Committee for the Elimination of Superstition, Nanded news