‘जिरेनियम’च्या लागवडीतून सुगंधी तेल निर्मितीचा मराठवाड्यात प्रकल्प 

अनिल कदम
Sunday, 7 June 2020

देगलूर तालुक्यातील शहापूर येथे ‘जिरेनियम’ या पिकाची शेतकऱ्याने दोन एकरवर लागवड केली. जिरेनियम या सुगंधी वनस्पतीपासून तेल निर्मिती सुरू केल्याचा हा मराठवाड्यातील पहिलाच प्रयोग शहापूर (ता.देगलूर) येथील चिंतलवार बंधुंनी शेतीत केला असून प्रकल्प बघण्यासाठी मराठवाड्यासह तेलंगणा, कर्नाटक व आंध्र प्रदेशातील शेतकरी येथे येत आहेत. 

देगलूर ः कधी निसर्गाचा मारा, तर कधी मजुरांची वानवा, कोरडवाहू शेतीतील ऊन...सावलीच्या या खेळाला तालुक्यातील शेतकरी तसा वैतागलेलाच. गेल्या काही वर्षापासून नवीन पिढीने शेती कसायला जशी सुरुवात केली तसा त्यांचा शेतीकडे व्यापारी दृष्टीने बघण्याचा कलही वरचेवर वाढला. शेतीवर आधारित वाढती कुटुंब संख्या लक्षात घेता त्यांना तसे करणे गरजेचे वाटू लागले. जमिनीची पत, पाण्याची उपलब्धता, वातावरणातील बदल यानुसार शेतीत नवे प्रयोग करून शाश्वत उत्पन्नाची हमी देणाऱ्या पिकांची निवड करणे गरजेचे वाटू लागले. म्हणूनच शेतकरी गटाच्या माध्यमातून प्रगतशील शेतकरी अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील पन्नास-एक शेतकऱ्यांनी पेरू पीक घ्यायला सुरुवात केली.

शहापूर येथील चिंतलवार बंधूनी फळपिकांकडे न वळता जिरेनियम या सुगंधी वनस्पतीची लागवड केली. त्यातून तेल निर्मितीकडे वळत, शेतीतून शाश्‍वत उत्पन्नाच्या नवीन वाटा शोधण्याचा धाडसी प्रयोग केला, तो यशस्वीही झाला. वर्षअखेरीस तेल निर्मितीतुन व रोपवाटिकेतून त्यांना नऊ लाखाचे उत्पन्न दाेन एकरामधून मिळाले. बहुधा मराठवाड्यातील हा पहिलाच प्रयोग असल्याने कमी पाणी व लागवडीनंतर संरक्षण यासाठी ही फारसा खर्च न करता हे पिक घेता येत असल्याने तालुक्यासह तेलंगणा, कर्नाटकातील अनेक शेतकरी हे पीक बघण्यासाठी शहापूरला येत आहेत.

अशी केली लागवड....!
गेल्या वर्षी एप्रिलमध्ये दोन एकर शेतीत लागवडीपूर्वी नांगरणी, वखरणी करून सरी पद्धतीने चार बाय एक फूट अंतरावर जिरेनियमचे रोपे लावण्यात आली. त्यात शेणखतही टाकण्यात आले, त्याचा तणाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून दोन वेळेस खुरपणी करण्यात आली. जिरेनियम लागवडीनंतर सहा महिन्यात त्यावर तेल काढण्याची प्रक्रिया केली गेली. यासाठी त्यांनी तीन लाख खर्च करून एक मशीन ही उभारली. पहिल्या कापणीत १५ लिटर तेल निघाले. बाजार मूल्यानुसार हे तेल प्रतिलिटर बारा हजार पाचशे रुपये दराने विकले गेले. यातून त्यांना एक लाख ८७ हजार पाचशे रुपये मिळाले. त्यानंतर दर चार महिन्यानंतर हे पिक काढून त्यातून तेल काढण्याची प्रक्रिया केली जात आहे.

हेही वाचा - विद्यापीठाने तयार केली जिवाणू खते; जमिनीचा सुधारतो पोतही

संरक्षणाचा खर्च अल्प...!
जिरेनियम पिकाला वन्यप्राणी, पशुपक्षी यांच्यापासून काहीही धोका नाही. एखाद वेळेस बुरशीसारखा रोग पडला तर एखादी फवारणी केल्याने ते रोगमुक्त राहू शकते. जिरेनियमचे एक झाड घरासमोर लावले तर डासापासूनही आपल्याला मुक्ती मिळू शकते असे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.या तेलाचा वापर सौंदर्यप्रसाधने व औषधी निर्मितीसाठी होत असल्याने याला बाजारपेठेत चांगली मागणी आहे. एकूण मागणीच्या फक्त दहा टक्के उत्पादन भारतात होत असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात.

हेही वाचा - कचऱ्याचे डोंगर होणार भूईसपाट; आरोग्याचा प्रश्न लागणार मार्गी

सहा ते सात लाखाचा खर्च अपेक्षित
दोन एकर क्षेत्रावर करण्यात आलेल्या जिरेनियम पिकातून चितंलवार बंधूंना एका वर्षात ४२ लिटर तेलाचे उत्पादन झाले. त्यातून त्यांना सव्वापाच लाखाचे उत्पन्न मिळाले. सध्या त्यांना उत्पादनामध्ये मनोज पाटील हाेनवडजकर, इस्माईल भाई, धोंडीबा गायकवाड, मारुती जमादार यांचे सहकार्य मिळत आहे. काही दिवसांच्या अनुभवावरून पुढील वर्षात एक दाेन सहकाऱ्यांच्या मदतीने हे काम आपण करू शकतो असे मलन रेडी चितंलवार या शेतकऱ्याने सांगितले. सध्या असलेल्या मशिनरीमध्ये बदल करून अत्याधुनिक मशीन बसवली गेली तर मनुष्यबळाची फारशी गरजही भासणार नाही असे श्री.रेड्डी म्हणाले. यासाठी सहा ते सात लाखाचा खर्च अपेक्षित आहे.

गटशेतीसाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे
पारंपरिक पिके घेण्यापेक्षा शाश्वत उत्पन्न शेतीतून मिळविण्याच्या दृष्टीने जिरेनियम हा प्रयोग शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरू शकतो, कालपरत्वे आपण शेतीक्षेत्रात टिकाव धरण्यासाठी गटशेतीतून हा प्रयोग तालुक्यात करण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे.
- शिवाजीराव शिंदे, तालुका कृषी अधिकारी, देगलूर.

खर्चामध्ये बचत होणार
प्रारंभीच थोडीशी गुंतवणूक असली तरीही पुन्हा लागवड व इतर खर्चामध्ये बचत होणार असल्याने जिरेनियम हे पीक घेऊन शेतकऱ्यांनी स्वतःची आर्थिक उन्नती साधावी.
- विठ्ठल रेड्डी चिंतलवार, जिरेनियम उत्पादक, शहापूर. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aromatic oil production project in Marathwada from the cultivation of ‘Geranium’, nanded news