मराठवाड्याच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढण्याची अशोक चव्हाण यांची ग्वाही

अभय कुळकजाईकर
Friday, 22 January 2021

नांदेड - अर्धापूर (पूर्व वळण रस्ता) आसना नदीवरील जूना पूल व पोचमार्गाच्या दुरुस्ती व रुंदीकरणाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते आसना पुलालगत असलेल्या महादेव पिंपळगाव येथे शुक्रवारी (ता. २२) झाला.

नांदेड - युती सरकारने मागील पाच वर्षांत मराठवाड्याकडे दुर्लक्ष केल्याने मराठवाड्यात विकासाचा रथ थांबला. पण महाविकास आघाडीचे सरकार येताच मराठवाड्यात विकासकामांची गंगा वाहू लागली. नांदेड समृद्धी महामार्गाला जोडण्यासाठी सुमारे साडेसहा हजार कोटी रुपये महाविकास आघाडी सरकारने दिले आहेत. तर दोन हजार ७५५ कोटी रुपयांची विविध विकासकामे नांदेड जिल्ह्यात सुरु झाली आहेत. नांदेडसह मराठवाड्यावर झालेला विकासाचा अन्याय दूर करण्यासाठी आपण विकासाचा बॅकलॉग भरून काढणार असल्याची ग्वाही राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी (ता. २२) दिली. 

नांदेड - अर्धापूर (पूर्व वळण रस्ता) आसना नदीवरील जूना पूल व पोचमार्गाच्या दुरुस्ती व रुंदीकरणाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते आसना पुलालगत असलेल्या महादेव पिंपळगाव येथे झाला. यावेळी पंजाब येथील गुरुद्वाराचे संतबाबा सुखदेवसिंघजी, विधान परिषदेतील काँग्रेसचे प्रतोद आमदार अमर राजूरकर, माजी पालकमंत्री डी. पी. सावंत, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार मोहन हंबर्डे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, महापौर मोहिनी विजय येवनकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंद शिंदे नागेलीकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता कोकाटे, उपमहापौर मसूद अहेमद खान आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

हेही वाचा - धक्कादायक : पत्नीचा जाळुन खून करणाऱ्या पतीवर गुन्हा, वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथील घटना
 

विलासराव देशमुखांची आठवण
पालकमंत्री चव्हाण म्हणाले की, युती सरकारने नांदेडसाठी काहीच केले नाही. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असतांना आसना नदीवर नवीन पुल उभारण्यात आला. स्ट्रक्टरल आॅडीटमुळे जुना पुलाचा वापर बंद करण्यात आला. युतीने सरकारने या पुलाची दुरुस्ती करणे अपेक्षित होते. ते पाच वर्षांत युती सरकारला करता आलेले नाही. पण हे पुण्यांचे काम आपल्याच हातून व्हायचे होते, आणि ते होत आहे. नांदेडच्या वैभवात भर पाडणारा आसना नदीवरील जुन्या पुलाचे पुनःनिर्माण करता आले, याचे मला मोठे समाधान आहे, असेही ते म्हणाले. 

हेही वाचलेच पाहिजे - नांदेडमध्ये एका शेतकऱ्याची आत्महत्या तर दुसर्‍या घटनेत तलावात बुडून जावयाचा मृत्यू

टीका करण्याशिवाय भाजपचा उद्योग नाही
भाजपने गेली पाच वर्षे केवळ घोषणा व टीका करण्यापलीकडे काहीच केलेले नाही. हे जनतेने चांगलेच ओळखले होते. म्हणून परत येणार, परत येणार म्हणून ते परत आलेच नाहीत, असा टोलाही त्यांनी फडणवीस यांचे नाव न घेता भाजपला लगावला. भाजपच्या या बाष्कळपणामुळेच त्यांची सत्ता जाऊन महाविकास आघाडीचा जन्म झाला. विकासकामांचा मास्टर प्लान तयार असूनही कोरोनामुळे काहीच करता आले नाही. सरकारचे उत्पन्न घटल्याने विकासकामे करता आली नाहीत. पण आता हळूहळू सर्व सुरळीत होत आहे. म्हणून नवीन वर्षाच्या सुरवातीलाच नांदेडमध्ये दोन हजार ७५५ कोटी रुपयांची कामे सुरु केली आहेत, असेही श्री. चव्हाण यांनी सांगितले.

नांदेडच्या ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा

महाविकास आघाडीतील घटक पक्षांचा कार्यक्रम
खासदार चिखलीकर यांचे नाव न घेता ‘म्हणूनच ‘त्यांना’ बोलावले नाही’ असे सांगून श्री. चव्हाण म्हणाले की, कोणतेही काम मग ते न केलेले सुद्धा आपणच केल्याचे सांगत सुटतात. त्यामुळे लोकांमध्ये गैरसमज निर्माण होत असतो. आपण कष्टाने आणलेल्या कामांचा ऐनवेळी ‘त्यांनी’ श्रेय लाटू नये, म्हणून ‘त्यांना’ बोलावले नाही. त्यांना बोलावण्याची गरजच पडू नये, यासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी हा कार्यक्रम घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले. आमदार राजूरकर म्हणाले की, श्री. चव्हाण यांच्या दूरदृष्टीमुळेच नांदेड शहरात विकासाची गंगा वाहत आहे. त्यांच्यामुळेच नांदेड शहराचे भाग्य उजळले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अविनाश धोंडगे यांनी प्रास्ताविक केले. पुलाचे डिझाईन तयार करणारे सावर्जनिक बांधकाम विभागाचे अभियंता एम. आय. शेख यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. प्रारंभी श्री. चव्हाण यांच्या हस्ते आसना जुना पुलाच्या नवनिर्माणाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर आसना नदीवरील बंधाऱ्यावर जाऊन त्यांनी जलपूजन केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ashok Chavan's testimony to fill the backlog of development of Marathwada nanded news