इथे मरणाचेही भय वाटे...अशी नांदेडला स्मशानभूमीची परिस्थिती...

अभय कुळकजाईकर
Monday, 14 September 2020

नांदेड शहरातील अनेक स्मशानभूमीत सध्या अंत्यविधीलाही अनंत अडचणी येत आहेत. स्मशानभूमींची अवस्था अतिशय वाईट झाली असून पाणी, विद्युत पुरवठा, स्वच्छता, साफसफाई अशा प्राथमिक सुविधाही तिथे मिळत नाहीत. त्यामुळे अंत्यविधीसाठी आलेल्या नातेवाईकांसह नागरिकांनी देखील संताप व्यक्त केला आहे. दुसरीकडे महापालिका प्रशासनासह पदाधिकारी आणि नगरसेवकांचेही या महत्वाच्या बाबींकडे दुर्लक्ष झाले आहे.  

नांदेड - कोरोना संसर्गामुळे झालेले मृत्यू त्याचबरोबर नैसर्गिक मृत्यूमुळे अंत्यविधी करण्यासाठी स्मशानभूमीत एकीकडे गर्दी वाढत असताना दुसरीकडे त्या ठिकाणी सोयी सुविधा नसल्यामुळे अंत्यविधीसाठी आलेल्या नातेवाईक आणि नागरिकांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. महापालिका प्रशासनासह पदाधिकारी आणि नगरसेवकांचेही याकडे दुर्लक्ष झाले आहे. 

नांदेड शहरामध्ये तरोडा खुर्द, तरोडा बुद्रुक तसेच सांगवी येथे स्मशानभूमी आहे. त्याचबरोबर नांदेड शहरात गोदावरी नदीकाठी गोवर्धन घाट, राम घाट, नगीना घाट, तारातीर्थ घाट, वसरणी घाट, जुना कौठा, सिडको आदी भागात स्मशानभूमी आहेत. लिंगायत समाजासाठी डंकीन येथे तर ख्रिश्चन समाजासाठी खडकपुरा भागात स्मशानभूमी आहे. तसेच मुस्लिम समाजासाठी नई आबादी, आसरानगर, करबला, दुलेशाह रहेमाननगर, गाडीपुरा या भागात कब्रस्थान आहे. मात्र, यातील अनेक स्मशानभूमीमध्ये सोयी, सुविधा उपलब्ध नसल्यामुळे अंत्यविधीसाठी अडचणी येत आहेत. 

हेही वाचा - Video- परभणी : आमदारांच्या घरासमोर सकल मराठा समाजाची निदर्शने
 

स्मशानभूमीची दुरवस्था

नांदेडमधील तरोडा खुर्द आणि बुद्रुक येथील स्मशानभूमी ग्रामपंचायत असल्यापासून आहेत. त्याचबरोबर सांगवी येथेही स्मशानभूमी आहे. पण या तिन्ही स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. गोदावरी नदीघाटावर गोवर्धन घाट वगळता इतर घाटांवर सोयीसुविधांचा अभाव आहे. गोवर्धन घाट येथे कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. त्यामुळे गर्दी वाढली आहे. या परिस्थितीबाबत पदाधिकारी व नगरसेवकांना माहिती देण्यात आली. त्याचबरोबर महापालिका प्रशासनालाही सांगण्यात आले. मात्र, त्यात फारसा बदल झाला नाही. त्यामुळे अंत्यविधीसाठी आलेले नातेवाईक आणि नागरिकांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे. 

किमान या हव्यात सुविधा... 
स्मशानभूमीत गेल्यावर अनेकवेळा काडेपेटीसुद्धा मिळत नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे अंत्यविधीसाठी लागणारे साहित्य त्याचबरोबर पाणीपुरवठा, स्वच्छता आणि साफसफाई, विद्युत पुरवठा, किमान एक तरी कर्मचारी, कामगार स्मशानभूमीत असायला हवा, अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे. त्याचबरोबर गेल्या अनेक वर्षापासून विद्युत दाहिनीची मागणी होत आहे. पण त्याला देखील अजून मुहुर्त लागला नाही. 

हेही वाचलेच पाहिजे - “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” अशी आहे मोहिम

आयुक्तांशी चर्चा करणार  
नांदेड शहरातील स्मशानभूमी संदर्भात मी स्वतः त्या त्या भागातील नागरिकांशी बोलून माहिती घेतली आहे. त्याचबरोबर अंत्यविधीसाठी गेलेल्या नातेवाईक, नागरिकांनी देखील माझ्याकडे तक्रारी, समस्या मांडल्या आहेत. याबाबत मी लवकरच सविस्तर माहिती आणि मागणीचे निवेदन घेऊन आयुक्तांशी चर्चा करणार आहे. 
- बालाजी कल्याणकर, आमदार, नांदेड.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bad condition of cemeteries in Nanded ..., Nanded news