Bharat Jodo Yatra : सर्वसामान्यांमध्ये आशेचा किरण... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded

Bharat Jodo Yatra : सर्वसामान्यांमध्ये आशेचा किरण...

नांदेड : भारत जोडो यात्रा सोमवारपासून ते शुक्रवारपर्यंत नांदेड जिल्ह्यात पाच दिवस होती. उत्साहात यात्रेचे आणि राहुल गांधी यांचे स्वागत करण्यात आले. या यात्रेत सर्वसामान्यांनी दिलेला प्रतिसाद हा वाखाणण्याजोगा होता. यात्रेने उत्साह वाढवला असून सर्वसामान्यांमध्ये आपल्या समस्या सुटतील, असा आशेचा किरण दिसून आला. त्यामुळे आता आगामी काळात कॉँग्रेसची त्याचबरोबर नेते राहुल गांधी, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि त्यांच्यासोबतच्या नेतेमंडळींची देखील जबाबदारी वाढली आहे.

कन्याकुमारीपासून ते काश्मीर अशी भारत जोडो यात्रा खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाली असून महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर पाच दिवसांनी आता शुक्रवारी हिंगोली जिल्ह्यात यात्रेने प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे नेते, पदाधिकारी, साहित्यिक, वकीलांपासून ते सर्वसामान्य नागरिक यात्रेत सहभागी झाले होते. जिल्ह्यात देगलूरपासून यात्रेचे मोठ्या उत्साहात आणि हजारोंच्या संख्येने स्वागत करण्यात आले. कॉँग्रेससह इतर पक्षांचे तसेच संघटनांचे पदाधिकारीही सहभागी झाले होते.

राजकारणापेक्षा जास्त समाजकारण करणारा त्याचबरोबर पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र असल्यामुळे अनेकजण त्यात सहभागी झाल्यामुळे यात्रा गर्दीने फुलून गेली होती. गेल्या जवळपास आठ वर्षापासून भारतीय जनता पक्षाची सत्ता केंद्रात आहे. मात्र, अनेक बाबतीत सर्वसामान्यांच्या पदरी निराशा आली आहे. त्याचबरोबर गेल्या दोन वर्षातील कोरोना काळही अतिशय कठीण होता. त्यामुळे सामान्य जनतेसाठी हा कठीणच काळ आहे.

केंद्रातील भाजपचे सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या अनेक आश्वासनांची पूर्तता अजूनही झाली नसल्यामुळे आता ही आश्वासने सर्वसामान्य जनतेला खोटी वाटायला लागली आहेत.त्यातच कॉँग्रेस आणि राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या भारत जोडो यात्रेने सर्वसामान्यांना जवळ करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातून त्यांना आता आशेचा किरण दिसू लागला आहे.

मात्र, त्याचबरोबर कॉँग्रेसची आता आणखी जबाबदारीही वाढली आहे. त्यामुळे आगामी काळात सर्वसामान्यांच्या मागण्या आणि समस्यांकडे काळजीपूर्वक लक्ष देऊन त्या पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. असे झाले नाही तर पुन्हा एकदा ही यात्रा फक्त ‘इव्हेंट’ आणि राजकीय जुमलेबाजी म्हणून ठरू नये, एवढी अपेक्षाही सर्वसामान्यांकडून होत आहे.

सर्वेश हातणेला दिला संगणक

राहुल गांधी यांच्यासोबत विद्यार्थी सर्वेक्ष हातणे हा गुरूवारी सहभागी झाला होता. त्याच्यासोबत त्याचा भाऊ आणि बहिण होते. सॉफ्टवेअर इंजिनिअर बनण्याची इच्छा त्याने गांधी यांच्याकडे व्यक्त केली. त्यांनी तु संगणक पाहिला का? असे विचारल्यावर तो निराश झाला. त्यानंतर त्यांनी त्यांच्याकडील लॅपटॉप दाखवला. ही माहिती गांधी यांनी नंतर सभेत सांगितली. दुसऱ्या दिवशी यात्रेत त्याला संगणक भेट देण्यात आला. संगणक मिळाल्यामुळे सर्वेशच्या आनंदाला पारावार उरला नव्हता.