esakal | धर्माबाद कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपचा झेंडा; रामचंद्र बन्नाळीकर बिनविरोध
sakal

बोलून बातमी शोधा

धर्माबाद कृउबा समिती सभापती

धर्माबाद कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपचा झेंडा; रामचंद्र बन्नाळीकर बिनविरोध

sakal_logo
By
सुरेश घाळे

धर्माबाद ( जिल्हा नांदेड ) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदाची निवडणूक गुरुवारी (ता. २७) पार पडली असून भाजपचे तालुकाध्यक्ष रामचंद्र पाटील बन्नाळीकर यांची धर्माबाद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवड झाली आहे. स्वर्गीय बाबा पाटील बन्नाळीकर हे बाजार समितीचे पहिले सभापती होते. तर त्यांचे चिरंजीव रामचंद्र पाटील बन्नाळीकर यांना ८३ वर्षांनंतर माजी आमदार बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांच्या कठोर परिश्रमातून सभापती होण्याचा बहुमान मिळाला आहे.

धर्माबाद कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेशराव पाटील करखेलीकर यांनी ठरल्याप्रमाणे दोन वर्ष सभापती पद भूषविले. माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर व माजी आमदार बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांच्या उपस्थितीत बाजार समितीच्या सभापती पदी दोन वर्ष गणेशराव पाटील करखेलीकर व तीन वर्ष रामचंद्र पाटील बन्नाळीकर राहतील, असे पूर्वी ठरविण्यात आले होते. ठरल्याप्रमाणे गणेशराव पाटील करखेलीकर यांनी दोन वर्ष सभापती पद भूषविले. व त्यांच्या कार्यकाळात उल्लेखनीय कामगिरी करून धर्माबाद बाजार समितीचे नाव मराठवाड्यात लौकीक केले आहे. व दोन वर्ष सभापती पदाचे कार्यकाळ पूर्ण होताच, गणेशराव पाटील करखेलीकर यांनी सभापती पदाचा राजीनामा देऊन दोन्ही नेत्यांचा मान राखून प्रामाणिकपणा दाखविल्यामुळे सध्या तालुक्यातील जनतेत ते चर्चेत आहेत.

हेही वाचा - लक्षद्वीपमध्ये आंदोलनं सुरु असून लोकांमध्ये प्रचंड राग आहे

तसेच दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी माजी आमदार बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांनी रामचंद्र पाटील बन्नाळीकर यांना सभापती करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले. गुरूवारी बाजार समितीच्या सभापती पदाची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली असून सभापती पदी भाजपाचे तालुकाध्यक्ष रामचंद्र पाटील बन्नाळीकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. सदरील निवड प्रक्रिया पूर्ण होताच निवडणूक निर्णय अधिकारी ए. आर. कांबळे यांनी रामचंद्र पाटील बन्नाळीकर यांची बिनविरोध निवड झाली असल्याचे जाहीर केल्यामुळे माजी आमदार बापूसाहेब देशमुख गोरठेकर समर्थक व भाजपाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते तसेच तालुक्यातील शेतकरी, मजूरदार, हमालमापाडी बांधवांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

रामचंद्र पाटील बन्नाळीकर यांची सभापती पदी बिनविरोध निवड होताच, त्यांनी व सर्व संचलकांनी बाजार समितीच्या आवारात असलेल्या स्वर्गीय बाबा पाटील बन्नाळीकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आहे. सभापती रामचंद्र पाटील बन्नाळीकर यांचा व्यापारी, शेतकरी, मजूरदार, हमाल मापाडी, भाजपाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, सर्व संचालक व कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले आहे. माजी आमदार बापूसाहेब देशमुख गोरठेकर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यत बाजार समितीच्या परीसरात तळ ठोकून बसले होते.

यावेळी कैलास गोरठेकर, शिरीष गोरठेकर, उमरीचे उपनगराध्यक्ष प्रविण सारडा, गणेश गाडे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र पोतगंटीवार, माजी सभापती गणेशराव पाटील करखेलीकर, माजी उपनगराध्यक्ष मौगला गौड, नगरसेवक रमेश पाटील बाळापुरकर, रामचंद्र पाटील बाळापुरकर, माजी नगराध्यक्ष विश्वनाथराव पाटील बन्नाळीकर, अमित मुंदडा, गोविंद पाटील सोनटक्के, मन्मथ अप्पा स्वामी, शिवराज भाऊ मोकलीकर, श्यामसुंदर झंवर, आबासाहेब पाटील बन्नाळीकर, साईनाथ पुजरवाड, बिरप्पा मदनूरकर, देविदास बिपटवार, मधू पाटील, बिजू पाटील, प्रविण पाटील बन्नाळीकर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image
go to top