फुलवळ येथील ‘त्या’ क्रूर घटनेचा अद्यापही तपास लागेना

धोंडीबा बोरगावे
शुक्रवार, 22 मे 2020

‘त्या’ क्रूर घटनेच्या मुळाशी जाऊन लवकरात लवकर पत्ता काढून आरोपीला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी प्रथमतः आरोग्य विभागाचे प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्र, अंगणवाडी केंद्र यांच्याकडे आपला मोर्चा वळवावा अशी मागणी जनसामान्यांतून होत आहे.

फुलवळ (जि.नांदेड) : फुलवळच्या (ता.कंधार) शिवारात निष्पाप नवजात बालकाला अज्ञात व्यक्तीने टाकून तो फरार झालेल्या घटनेला जवळ जवळ आठवडा झाला. तरीही अद्याप ‘त्या’ निर्दयी आरोपीचा कसलाच थांग पत्ता पोलिसांच्या हाती लागला नसल्याने रोजच वेगवेगळ्या चर्चेला उधाण येत आहे. 

ता.१३ मे रोजी फुलवळ येथून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गापासून काही मीटर अंतरावर एम.आय.डी.सी.च्या जवळच असलेल्या शेतात सकाळच्या प्रहरी कोण्या अज्ञात व्यक्तीने नुकतेच आईच्या उदरी जन्म घेऊन किमान चार, पाच दिवसाचे नवजात बालकाला फेकून देण्यात आले होते. घटना स्थळाची एकंदरीत सत्य परिस्थिती पाहता असे लक्षात येते की, ते निर्दयी कृत्य करणाऱ्या व्यक्तीचेही मन काही वेळासाठी भांबावून गेले असावे.

हेही वाचा - कोरोना : बिलोली, मुखेडचे ‘ते’ बाधित बाहेरचे प्रवासी

म्हणूनच त्याला त्या बाळाला जिवंत मारण्याची हिम्मत झाली नसावी. त्याने त्या बाळाच्या संपूर्ण शरीराभोवती काळ्या मातीचा ढिगारा लावला; परंतु बाळाचे तोंड मात्र त्याने उघडे ठेवले व शेवटच्या क्षणी त्या निर्दयी आरोपीच्या मनात काही तरी विचार बदलला आणि त्याने त्या बाळाला जिवंतपणे सोडून दिले.  

मातृत्वाला व माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या दुर्दैवी घटनेला घडून जवळपास आठवडा होऊन गेला. परंतु त्या निष्ठुर आरोपीचा पोलिसांना अद्यापही थांगपत्ता लागलेला नाही. पोलिसांना या घटनेच्या तपास कमी आरोग्य विभाग आणि अंगणवाडी विभाग हे फार महत्त्वाचे ठरणार आहे. कारण सध्याच्या काळात कोणतीही स्त्री गरोदर असताना प्रथम तिला अंगणवाडी सेविकेकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे.

हे देखील वाचाच - लॉकडाउन, तरीही बँकेला 6 कोटी 90 लाखाचा निव्वळ नफा

त्यानंतरच महिला एकात्मिक बाल विकास विभागाच्या वतीने त्यांना अनेक सुविधा पुरवल्या जातात. गरोदर मातेचे आरोग्य निरोगी राहावे व विविध लसीकरण घेण्यासाठी त्या गरोदर मातांना आरोग्य विभागाकडेही नाव नोंदणी करावी लागते. दर महिन्याला पोषण आहार अंगणवाडीच्या वतीने त्यांना दिला जातो. त्यामुळे सदर घटनेचा तपास काढण्यासाठी या दोन्ही विभागाची पोलिसांना खूप मोठी मदत होईल.
 
असा करावा तपास
तालुक्यातील सर्वच आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्राची व अंगणवाडीची गरोदर माताची नाव नोंदणी केलेली यादी हस्तगत केली आणि गेली १५ दिवसात कुठे किती महिलांच्या प्रसूती झाल्या त्यांच्या नोंदी खरच आहेत का? असतील तर त्या नवजात बालकाच्या रक्त व अन्य तपासण्या करून त्याचे आणि या प्रसूती झालेल्या महिलांचे रिपोर्टमध्ये काही साम्य आहे का? आयाच्या हाती प्रसूती (बाळांतीन) झालेल्या कोणी गरोदर माता आहेत का? याचा तपास काढला तर बरेच काही हाती लागू शकते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Brutal Incident At Phulwal Is Yet To Be Investigated Nanded News