बुद्ध पौर्णिमा : बुद्धविचार म्हणजे अहिंसेचा- शांतीचा

file photo
file photo

नांदेड : ‘भारतातील कोट्यवधी हिंदू धर्मियांनी तसेच जगभरातील अनेक मानवतावादी, विज्ञानवादी लोकांनी गौतम बुद्धाचे अनुयायीत्व पत्करले. यासर्व बुद्ध अनुयायांची एकूण लोकसंख्या ही २.३ अब्जावर आहे. म्हणजेच तथागत गौतम बुद्ध हे जगात सर्वाधिक अनुयायी असलेले, सर्वात प्रभावशाली धर्म संस्थापक, तत्त्वज्ञ आहेत. जगातील पहिल्या १०० अत्यंत महान विश्व मानवांमध्ये बुद्ध प्रथम स्थानी आहेत.’ विकिपीडियावरील ही माहिती मी प्रथम जेव्हा कधी वाचली असेल त्यावेळी मला यात फारसे आश्चर्य वाटले नाही. मात्र वर्तमान जगातल्या सार्वत्रिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मी जेव्हा ही माहिती पुन्हा पुन्हा वाचतो आहे, त्यावेळी मात्र ही घटना मला अभूतपूर्व वाटते आहे. 
 
सुमारे अडीच हजाराहून अधिक वर्षापूर्वी जगाच्या इतिहासात गौतम बुद्धासारखा एखादा महान तत्त्वज्ञ होऊन गेला आहे. हे अविश्वसनीय वाटावे अशा काळामध्ये आपण आहोत. ही अविश्वसनीयता आपल्यात का निर्माण झाली याची चर्चा इथे अपेक्षित नाही; परंतु बौद्ध धर्माच्या तत्त्वज्ञानाची अपरिहार्यता मात्र सर्वांना जाणवू लागली आहे. आज जग ज्या भीषण अशा हिंसेच्या, युद्धाच्या आणि क्रौर्याच्या सीमेवर उभे आहे ते पाहता मानवी संवेदनेचाच अंत झाला आहे की काय असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. जगातले कोणतेही राष्ट्र आज स्थिर आणि शांत नाही, सुरक्षित नाही. राष्ट्रांतर्गत वाहणाऱ्या विद्वेषाच्या, धर्म आणि जातीच्या अहर्निश लाटा तर आहेतच; पण माणसामाणसातली वैर भावनासुद्धा भयंकर टोकदार झाली आहे. हे का नि कसे घडले ? याची तार्किक उत्तरे देता येणे कठीण असले तरी मानवी महत्त्वाकांक्षा हे त्यामागचे मुख्य कारण मानता येईल. या महत्त्वाकांक्षेच्या पोटात अनेक पैलू आहेत. म्हणजे उच्चनिचता, प्रतिष्ठा, श्रेष्ठता, लिंगभावासह जात, धर्म ,वंश आणि प्रदेश या सर्वच बाबी त्यात अंतर्भूत आहेत. 

मानवी इतिहासात युद्ध ही काही नवीन घटना नाही

या सर्व घटकांचा वेळोवेळी स्फोट होतो आणि संपूर्ण जगावर एक अनिश्चिततेची, अस्तित्त्वाची भयावह सावली पडते. मानवी इतिहासात युद्ध ही काही नवीन घटना नाही. युद्धाचा इतिहास हा अत्यंत भयावह राहिला आहे. त्यांचे भलेबुरे परिणाम आजही अनेक राष्ट्रे भोगत आहेत. क्षणार्धात संपूर्ण मानव जातीला नष्ट करू शकेल अशी सामग्री आज बहुतेक देशात आहे. या सामग्रीच्या धाकावर संपूर्ण जग वेठीस धरले गेले आहे. या संरक्षण सिद्धतेतून आणि स्वत:चे वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या लढाईतून कळत नकळत आपण मानवतेची हत्या करत आहोत ही बाबही फारसी महत्त्वाची उरलेली नाही. इतकी निष्ठुरता, हिंस्रता आणि असंवेदनशीलता आमच्यात कशी निर्माण झाली? मानवी नात्यापेक्षा भौगोलिक सीमारेषा प्रतिष्ठेच्या का ठरत गेल्या? स्वत: मानवी बाँब बनून एखाद्या विशिष्ट समूहाला, सैन्याला नेस्तनाबूत करण्याची कोणती मानसिक शक्ती आपल्यात भिनत गेली? हे आणि असे असंख्य प्रश्न आपल्यासमोर, जगासमोर आज आहेत. मात्र या प्रश्नांचे काहीएक उत्तर आपल्याकडे आहे की नाही?  

बुद्धविचार म्हणजे अहिंसेचा - शांतीचा विचार
 
यापार्श्वभूमीवर प्रारंभीचे अवतरण मला खूप महत्त्वाचे वाटते, ते यासाठी की एखाद्या महापुरुषाच्या विचारांचे अनुयायी बनणे या घटनेला अनेक अर्थ आहेत. जगातील २.३ अब्ज लोक जर तथागत गौतम बुद्धाचे अनुयायी आहेत असे जर आपण मानले तर याचा अर्थ असा आहे की प्रचंड मोठ्या लोकसंख्येने बुद्धविचार समजून घेतला आहे. मग तरीही ही असंवेदनशीलता आमच्यात कशी?  बुद्धविचार म्हणजे मानवतावादी विचार. बुद्धविचार म्हणजे अहिंसेचा - शांतीचा विचार. बुद्धविचार म्हणजे करुणेचा विचार. बुद्धविचार म्हणजे विज्ञानाचा विचार. बुद्धविचार म्हणजे सत्याचा विचार. मग हा विचार वर्तमान पार्श्वभूमीवर किती अपरिहार्य आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. आज संपूर्ण जग भय – असुरक्षितता आणि अस्थिरतेच्या उंबरठ्यावर उभे असताना बुद्धविचाराचे पुनर्वाचन करणे, परिशीलन करणे आणि आपल्या वर्तनव्यवहारात तो खोलवर रुजवणे ही गोष्ट खूप निकडीची वाटते.
 
तत्कालीन धर्मपंथांना फोल ठरवले

केवळ युद्धजन्य वर्तमानाच्या पार्श्वभूमीवर नव्हे; तर मनामनातील अहंता, अंधश्रद्धा, पारंपरिक स्वरूपाच्या प्रतिगामी चालीरीती, धर्म- अधर्माचे आणि खोट्या पावित्र्याचे स्तोम यासारख्या पार्श्वभूमीवरही हा विचार अत्यंत महत्त्वाचा आहे. बुद्ध हा एक असा विचार आहे जो तुमच्यातल्या असहिष्णुतेचा नाश करतो. हा विचार एवढा विशाल आहे की, त्याने हिंसायुक्त यज्ञ संस्थेला निरर्थक तर ठरवलेच पण विषमतावादी विचारांना अप्रमाण ठरवले. तत्कालीन धर्मपंथांना फोल ठरवले. आचार आणि विचाराच्या शुद्धतेला महत्त्व दिले म्हणूनच जगभरातल्या तत्त्ववेत्यांनी बुद्ध धर्माला श्रेष्ठ ठरवले. अशा काही तत्त्ववेत्त्यांचे प्रातिनिधिक विचार आधी मुद्दामच लक्षात घेऊ या.

जगभरातल्या महान विचारवंतांचे तथागत गौतम बुद्ध आणि बुद्ध तत्त्वज्ञानाबद्दल

‘बौद्ध धर्माइतका दुसऱ्या कोणत्याही धर्मात ज्ञानाच्या श्रेष्ठत्वावर आणि अज्ञानाच्या हीनतेवर भर देण्यात आला नाही.’ ( ई. जे. मिल्स.)
‘शाक्यमुनी गौतम बुद्धांखेरीज संपूर्ण मानवजातीत येशू ख्रिस्तांएवढा थोर पुरुष दुसरा झाला नाही.’  (रेनन)
‘जगातल्या सर्व धर्म संस्थापकात भगवान बुद्ध हेच फक्त असे थोर होते की, जे आपली मुक्ति साध्य करण्याच्या मानवी सामर्थ्याचा स्वाभाविक मोठेपणा बरोबर ओळखू शकले. मानवतेची योग्यता उंचावण्याच्या कर्तृत्वात जर खऱ्या थोर माणसाचे मोठेपण सामावले असेल तर खरा थोर असा तथागताशिवाय दुसरा कोण असू शकेल ?’ (ड्वाईट गोडार्ड)   
‘बौद्ध धर्म हा भारतीय संस्कृतीचाच एक भाग आहे. तो केवळ धर्म नसून तो एक महान सामाजिक सिद्धांत आहे.’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर 
‘गौतम बुद्धानंतर त्यांच्या जवळपास जाऊ शकेल असा महामानव जगाने किंवा भारताने आजपर्यंत निर्माण केला नाही’  ओशो- रजनीश 
‘बुद्धांचा हजारावा अंश माझ्यात असता तर मी स्वत:ला धन्य समजलो असतो’ विवेकानंद 
‘आधुनिक विज्ञान हे बौद्ध धर्मातील अनित्यता आणि अनात्मवादाच्या सिद्धांताचे प्रतिध्वनी होय.’ डॉ. रंजन रॉय 

जागतिक ऐक्याचा धर्म म्हणून बौद्ध धर्माकडे पाहिले गेले

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या निर्मितीपूर्वी बुद्ध तत्त्वज्ञानाचा सखोल आणि प्रदीर्घ अभ्यास केला होता. याचे प्रतिबिंब आपल्याला घटनेत दिसतेच. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्विकार करून या धर्माला जणू पुनरुज्जीवित केले आहे. चातुर्वण्यव्यवस्था आणि जातीभेद नाकारणारा जागतिक ऐक्याचा धर्म म्हणून बौद्ध धर्माकडे पाहिले गेले आहे. ‘बुद्धाचे तत्त्वज्ञान हाच जगाला एकमेव आधार आहे, त्याचा जेवढा प्रचार होईल तेवढे जग युद्धापासून दूर आणि शांततेच्या जवळ जाईल. मानवतेचे संपूर्ण संरक्षण करण्यासाठी भारतालाच काय, पण साऱ्या जगाला शेवटी बुद्ध तत्त्वज्ञानाची कास धरावी लागेल’ हे डॉ. आंबेडकरांचे विधान आजच्या संदर्भात किती महत्त्वाचे आहे, हे आपण समजू शकतो. कोलाहल, अशांतता, संशय, भिती ही या काळाची वैशिष्ट्य आहेत. ती का आणि कशी आकाराला आली? हा स्वतंत्र संशोधनाचा विषय होऊ शकेल. परंतु या सगळ्या विकारांवर मत करायची असेल तर बुद्धविचार / तत्त्वज्ञान निर्विवाद मान्य करावा लागेल. 

दु:खमुक्तीचा एक नवा मार्ग बुद्धाने जगाला दिला

‘असे काय आहे या तत्त्वज्ञानात ?’ असे म्हणून हा विषय निकाली काढता येऊ शकेलही, पण तसे करणे ही मोठी दुर्दैवी बाब ठरू शकेल. ‘अतृप्ती हे कोणत्याही दु:खाचं मूळ आहे’, हा विचार खूप साधा आणि वरवरचा वाटतो, पण बुद्धांनी मानवी आयुष्यातल्या दु:खाचं विश्लेषण करून मानवी स्वभाव हाच दु:खाला कारण कसे ठरतो हे सांगितले. दु:खमुक्तीचा एक नवा मार्ग बुद्धाने जगाला दिला. एवढेच नाही तर अशा खूप सहज वाटणाऱ्या उपदेशातूनही त्यांनी जे तत्त्वचिंतन समोर ठेवले ते अपूर्वच म्हणायला हवे. ‘पापकर्म करू नका, लोभ आणि तृष्णा यांना वशीभूत होऊ नका, कोणालाही क्लेश देऊ नका, द्वेष करू नका, क्रोध करू नका, वैरभाव विसरा, सूज्ञ, न्यायी आणि सुसंगत व्हा, विवेकहीन विचारहीन होऊ नका, प्रमादाच्या आहारी जाऊ नका, उच्च जीवनस्तरावर नाही तर श्रेष्ठ सांस्कृतिक जीवनावर सुख अवलंबून आहे, सम्यक मार्ग हा सुखाचा मार्ग आहे’ - बुद्धांची ही वचने जर मानवी समुदायाने आचरणात आणली तर जगात शांतता नांदेल हे सत्य आपल्याला नाकारता येईल काय ?

मानवजातीला दिलेला सर्वात उज्ज्वल प्रकाश म्हणजे बुद्ध

‘भारतभूमीने मानवजातीला दिलेला सर्वात उज्ज्वल प्रकाश म्हणजे बुद्ध, हे ऐतिहासिक सत्य कोणत्याही कसोटीवर तपासले, तरी अबाधितच राहते’ हे विचारवंत आ. ह. साळुंखे यांचे मत मला खूप महत्त्वाचे वाटते. पण त्याचवेळी ‘भारतामधील विशिष्ट प्रकारच्या सामाजिक, सांस्कृतिक परिस्थितीमुळे लोकांच्या मनात कडवे पूर्वगृह तयार झाले आहेत. असंख्य लोक तथागतांच्या विचारांकडे स्वत:च्या दृष्टीने पाहायलाच तयार नाहीत.’ (आ. ह. साळुंखे: २०१४)  हेही लक्षात घ्यायला हवे. 
एखादा विचार हा आपल्या परंपरेतला असूनही तो न स्वीकारणे किंवा त्याविषयी आकस बाळगणे, द्वेष करणे, पूर्वग्रहांच्या भिंगातूनच त्याकडे बघणे या सगळ्या बाबींमुळे आपली प्रचंड मोठी सांस्कृतिक आणि सामाजिक हानी झाली आहे. आपल्या मनातल्या नकारात्मक धारणांमुळे बुद्धविचार ग्रंथाच्या बाहेर येवू शकला नाही, हे दुर्दैवच ! 

बुद्ध तत्त्वज्ञान ही काळाची अनिवार्य गरज 
 
(बुद्धिप्रामाण्य, शील, करुणा, मैत्री आणि सर्वसामान्यांचे हित, सुख या संकल्पनावर आधारलेला निरीश्वरवादी धम्म बुद्धाने स्थापन केला जो माणसामाणसातल्या सदाचारावर भर देतो. बुद्धाचे समग्र तत्त्वज्ञान हे सामाजिक न्यायाच्या संकल्पनेवर उभे आहे. समाजातील सर्व घटकांना आपले वाटणारे हे तत्त्वज्ञान खऱ्या अर्थाने लोकशाहीवादी आहे. वर्तमान काळातील सार्वत्रिक प्रश्न आणि आव्हानांच्या पार्श्वभूमीवर बुद्ध तत्त्वज्ञान ही काळाची अनिवार्य गरज आहे. माणसातील हिंस्रता, क्रूरता अधिक तीव्र होत आहे. नैराश्य, भय त्याची पाठ सोडत नाहीत. विविध स्वरूपांच्या भौतिक, मानसिक महात्त्वाकांक्षानी तो पछाडला गेला आहे. त्याचे व्यक्तिगत आणि कौटुंबिक स्वास्थ्यही दुरावले आहे. अशावेळी अहिंसेचे प्रेषित असलेल्या गौतम बुद्धाचे विचार जागतिक शांततेसाठी एक महत्त्वाचा मार्ग ठरू शकतात. मानवजातीच्या विकासाचा, कल्याणाचा मार्ग या विचारातच सामावलेला आहे. 

◾️ पी. विठ्ठल ( लेखक - संचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास संकुल, स्वा.रा.ती.म. विद्यापीठ, नांदेड)
p_vitthal@rediffmail.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com