दिलासादायक : नांदेडवरुन विशेष रेल्वेने एक हजार परप्रांतीय मजूर बिहारकडे रवाना

सकाळ वृत्तसेवा
Monday, 25 May 2020

बुधवारी (ता. १३) दुपारी  विशेष श्रमीक रेल्वेने त्यांची बिहारकडे रवानगी करण्यात आली. या गाडीला अरारीया, खगारीया आणि गया येथे थांबे देण्यात येणार आहेत. 

नांदेड : पोटाची खळगी भरण्यासाठी हाताला मिळेल ते काम व आपल्या कौशल्यातून कुटुंबाची व स्वत:ची उपजिविका करणारे हजारो उत्तर भारतीय कामगार नांदेड जिल्ह्याच्या विविध भागात वास्तव्यास होते. मात्र लॉकडाउनमध्ये त्यांच्या हातचे काम गेले आणि त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. जिल्हा प्रशासनाने त्यांची व्यवस्था मंगल कार्यालय व काही कॅम्पमध्ये केली होती. बुधवारी (ता. १३) दुपारी  विशेष श्रमीक रेल्वेने त्यांची बिहारकडे रवानगी करण्यात आली. या गाडीला अरारीया, खगारीया आणि गया येथे थांबे देण्यात येणार आहेत.

परंतु चौथा लॉकडाउन सुरु झाल्याने बिहारमधील जवळपास एक हजार २३ कामगारांना त्यांच्या मुळ गावी पाठवायचा निर्णय घेऊन त्यांना सोमवारी (ता. २५) दुपारी श्रमीक रेल्वेने हजुर साहिब नांदेडहून बिहारकडे रवाना करण्यात आले. मायभूमीत जाण्यासाठी आतूर झालेल्या कामगारांनी रात्रीपासूनच रेल्वेस्थानक परिसरात गर्दी केली होती. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी चोख पोलिस बंदोबस्त तैणात करण्यात आला आहे. 

हेही वाचा व पहा : Video - पालकमंत्री अशोक चव्हाण उपचारासाठी मुंबईला रवाना...
 

बिहारमधील एक हजार २३ कामगार रवाना झाले

कोरोना या आजाराचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी संबंध जगभरात लॉकडाउन करण्यात आले आहे. त्या संबंधाने भारतातही चौथे लॉकडाउन सुरू झाले आहे. आता १८ मेपासून लॉकडाउनचा चौथा टप्पा असल्याने परप्रांतीय कामागार व नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. मात्र या नागरिकांनी घाबरुन न जाता प्रशासनाच्या सुचनांचे पालन करुन सहकार्य करावे. परप्रांतीय कामगारांना कुठलीच अडचण येणार नाही याची दक्षता जिल्हा प्रशासनाने घेतली असून त्यांच्या राहण्याची व खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात आली होती. बिहारमधील एक हजार २३ कामगार जिल्ह्याच्या विविध भागात कामाला होते. त्यात महिला, लहान बालकांचा समावेश होता. काहींचे तर अख्खे कुटुंबच पोटाची खळगी भरण्यासाठी आले होते.
 
जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन 

वाढते लॉकडाउन लक्षात घेता अनेक कामगारांनी आपले गाव जवळ केले. काही पायी तर काही मिळेल त्या वाहनांने पोहचले. मात्र काहींना क्वारंटाईन केल्याने ते येथेच अडकून पडले होते. त्या कामागारांसाठी रेल्वे बोर्ड, महाराष्ट्र सरकार आणि उत्तरप्रदेश सरकारमध्ये बोलणी होऊन अखेर अडकलेल्या कामगारांना आपल्या मायभूमीत जाण्याची संधी मिळाली. सर्वजण आनंदाने बुधवारी रेल्वेस्थानकावर गर्दी करत होते. तसेच जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन करत होते. 

जिल्हाधिकारी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी हजर 

जिल्हाधिकारी डॉ. विपीन, पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर, दक्षिण मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक उपेंद्रसिंग, महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांच्यासह आदी अधिकारी व कर्मचारी यांनी या सर्व उत्तर भारतीय नागरिकांची गैरसोय होणार नाही याची खबरदारी घेत होते.   

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Comfortable: One thousant d foreign workers left Nanded for Bihar by special train