विधायक : अखंड निःस्वार्थ सेवेची आठ वर्षे पूर्ण

प्रमोद चौधरी
शनिवार, 11 जुलै 2020

भुकेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी, रुग्णांना औषधी, अंध-अपंगांना अर्थसहाय्य, अनाथ तसेच गरीब कुटुंबातील कन्येचे कन्यादान करून पित्यांची भूमिका, आपदग्रस्तांना वस्तूस्वरूपात मदत, अशा एक नव्हे; अनेक सेवाकार्य अव्याहतपणे ''साईप्रसाद''च्या तीन हजारावरील नाथांकडून निःस्वार्थपणे सुरु आहे.

नांदेड : समाजातील विविध जाती-धर्मातील रंजल्या गांजलेल्यांना निःस्वार्थ भावनेने मदत करून त्यांना जगण्यासाठी आशेचा किरण दाखविणारा ‘साईप्रसाद’ प्रतिष्ठान. ११ जुलै २०१२ रोजी प्रतिष्ठानची स्थापना झाल्यापासून ‘साईप्रसाद’चे ‘नाथ’ अखंडित सेवा देत आहे.

रंजल्या गांजलेल्यांना जगण्यासाठी आशेचा किरण दाखविण्याच्या हेतूने ‘साईप्रसाद’ची स्थापना झाली. त्यात ना अध्यक्ष ना सचिव कुठलाही पदाधिकारी नाही. सेवाकार्यासाठी पैसा न घेता सेवा ही वस्तू स्वरूपात घेतली जाते. परिवारात सद्यस्थितीत महाराष्ट्रासह, विदेशात स्थाईक भारतीय नागरिक निःस्वार्थ भावनेने सहभागी होत आहेत.  २०१२ मध्ये लावलेल्या या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे. 

हेही वाचा - नांदेडला १२ ते २० जुलै दरम्यान संचारबंदी होणार लागू, काय आहेत नियम, अटी वाचा...

शासकीय रुग्णालयात अविरत सेवा
शहरातील गुरुगोविंदसिंग शासकीय रुग्णालयात खिचडी वाटपापासून सेवाकार्याला सुरुवात धाली असून, आठ वर्षांपासून ही सेवा अविरत सुरु आहे. सध्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात येणाऱ्या १२०० रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना दररोज सकाळी खिचडी व सायंकाळी भाजी,पोळी, वरण व भात दिला जातो. शिवाय दोन पाणी फिल्टर प्लांटही उभारण्यात आला असून, दररोज १२००० लिटर शुद्ध पाण्याचे मोफत वाटपही केले जाते. 

पूरपरिस्थितीतही मदतीचा हात
सांगली-कोल्हापूर येथील पूरपरिस्थितीमुळे हतबल झालेल्या कुटुंबाच्या मदतीसाठी साईप्रसादचे १५० ‘नाथ’ नांदेडहून चार दिवसासाठी गेले होते. संसारोपयोगी साहित्य, कपडे, अन्नधान्य, शैक्षणिक साहित्य देण्यासोबतच सुखवाडी (जि.सांगली) येथील प्रत्येक कुटुंबाला स्वच्छता व घर सावरण्यासाठी सहकार्य केले. सुखवाडीतील १५०० गावकऱ्यांना सकाळी चहा-नाश्‍ता, दुपारी व सायंकाळी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.

हे देखील वाचाच - विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्यासाठी पाठ्यपुस्तकांची फेररचना

लॉकडाउनमध्येही निःस्वार्थ सेवा
कोरोनाच्या भीषण संकट काळातही न घाबरता साईप्रसादने शासन परवानगी व निर्देशानुसार मदत कार्य केले. कोरोना वार्डातही मदत केली.  लॉकडाउन काळात अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली होती. अशा कुटुंबांना दोन महिने पुरेल एवढे अन्नधान्य कीटचे वाटप केले. गुरु गोविंदसिंग रुग्णालयातील १७ नर्सेसना २० हजार रुपयांची मदत केली. मिझोरम येथील मुलींना नागपूरपर्यंत जाण्यासाठी १५ हजार रुपयांची मदत केली. 

आठ वर्षात काय केले 

 1. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला-मुलींचे लग्न लावून देणे.२. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला स्वयंरोजगारासाठी मदत
 2. सामुहिक विवाहसोहळ्यातून आजवर ३०० जोडप्यांचे विवाह
 3. शासकीय रुग्णालयाला पाच लाख रुपयांचे साहित्य दिले
 4. रुग्णालय परिसरात झाडे लावून निसर्गरम्य वातावरण केले
 5. अनाथ मुले, आई-वडिल नसलेले, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील तसेच शहीद जवानांच्या मुलांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप
 6. दिवाळीमध्ये सैनिकांच्या घरी दीपोत्सव साजरा केला जातो
 7. आळंदी ते पंढरपूर वारीत शुद्ध पिण्याच्या पाण्याचे वाटप
 8. ‘एक पणती शहीदांसाठी’ उपक्रम
 9. लोहा, अर्धापूर, मुदखेड, उमरी, भोकर, नांदेड, हदगाव तालुक्यातील १२० सैनिक व कुटुंबियांचा सन्मान
 10. आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ मदत
 11. कोरोनाच्या महामारीमध्ये गरजवंतांना मदत
 12. कॅन्सरग्रस्त गरीब रुग्णांसाठी एक ते दीड लाखाची मदत
 13. गरीब कुटुंबातील मुला-मुलींसाठी अर्थसाह्य

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Completed Eight Years Of Uninterrupted Selfless Service Nanded News