
धनंजय मुंडे यांच्या बाबतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने ठोस भूमिका घ्यावी. धनंजय मुंडे यांच्याविषयी आमच्या मनात कुठलाही द्वेष नाही. मात्र, त्यांच्यामुळे राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाची प्रतिमा मलीन होत आहे.
नांदेड ः पूर्वीच्या मराठवाडा विद्यापीठास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यासाठी उभारलेल्या नामांतर लढ्यात नांदेडच्या कार्यकर्त्यांचे सर्वात मोठे योगदान राहिले आहे. अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदार आठवले यांनी दिली. दरम्यान, औरंगाबादचे संभाजीनगर नाव करण्याच्या मुद्यावरून आता महाआघाडीतून कॉँग्रेस बाहेर पडावे, आम्ही सत्ता स्थापन करण्यासाठी तयार आहोत, असेही त्यांनी सांगितले.
नांदेडला कामगार मेळावा आणि बिलोली येथील दिव्यांग मुलीवर झालेल्या सामुहिक अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली आहे. त्यानंतर पिडीत कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना मदत करण्यासाठी सोमवारी (ता. १८) केंद्रीय मंत्री रामदास आठवले नांदेडला आले होते. त्यावेळी नियोजन भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
हेही वाचा- माता न तूं वैरिणी, चार दिवसाच्या ‘नकोशी’ला हॉटेलसमोर फेकून आईचे पलायन
नामांतराला आमचा विरोध नाही
महाविकास आघाडीत असलेल्या शिवसेनेनी औरंगाबादचे संभाजीनगर आणि औरंगाबाद विमानतळाचे नाव बदलण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. नामांतराला आमचा विरोध नाही. विमानतळाचे नाव बदलायचे असेल, तर एलोरा किंवा आजिंठा असे नामकरण करावे. शिवसेना मुंबईच्या सेंट्रल रेल्वे स्थानकाचे देखील नामातंर करण्याचा प्रयत्न करत आहे. मुंबई रेल्वे स्थानकास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे, अशी सुचना देखील त्यांनी केली. नामांतराला आमचा विरोध नसला, तरी कॉँग्रेसचा प्रखर विरोध आहे. शिवसेनेच्या मुखपत्रातुन औरंगाबादचा संभाजीनगर असा नामोल्लेख केला जातोय ते चुकीचे आहे. या मुद्यावर आता महाआघाडीतून कॉँग्रेसने बाहेर पडावे. भाजप सत्ता स्थापनेसाठी तयारच आहे, असेही श्री. आठवले यांनी सांगितले.
पीडित मुलीच्या कुटुंबियांना साडेचार लाख रुपयाचा धनादेश
बिलोली येथील मातंग समाजाच्या दिव्यांग मुलीवर सामुहिक अत्याचार करुन तिची हत्या करण्याचा प्रकार हा दुर्देवी आणि मानवतेला काळीमा फासणारा आहे. पीडित मुलीच्या कुटुंबियांना केंद्र सरकारमार्फत साडेचार लाख रुपयाचा धनादेश दिला सोबतच रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या वतीने पन्नास हजाराची मदत करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
भविष्यात कायदे मागे घेण्याची प्रथा पडेल
केंद्राने पारित केलेल्या शेतकरी कायदा हा चांगला असून, या कायद्याविरोधात एकही शेतकरी नाही. कायद्याचा विरोध करणारे शेतकरी संघटनेचे नेते असून, कायदा रद्द करण्यासाठी आग्रह धरला जात आहे. मात्र, अशा पद्धतीने कायदे मागे घेतल्यास भविष्यात कायदे मागे घेण्याची प्रथा पडेल, अशी भीती देखील मंत्री श्री. आठवले यांनी व्यक्त केली. यावेळी मंत्री श्री आठवले यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना मनमोकळेपणे उत्तरे दिली.
येथे क्लिक करा - नांदेड ते होटल सायकलिंग करीत डॉ. विपीन यांनी दिला पर्यावरण वृद्धीबरोबरच निरोगी आरोग्याचा संदेश
मुंडे प्रकरणावरुन राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाची प्रतिमा मलीन
धनंजय मुंडे यांच्या बाबतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने ठोस भूमिका घ्यावी. धनंजय मुंडे यांच्याविषयी आमच्या मनात कुठलाही द्वेष नाही. मात्र, त्यांच्यामुळे राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाची प्रतिमा मलीन होत आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणूकीत शिवसेनेला सत्तेवरुन खाली खेचायचे आहे. त्यासाठी आम्ही तयारी करत असून आम्ही १२० जागा जिंकू तसेच भाजपचा महापौर झाल्यास उपमहापौर हा आमच्याच पक्षाचा असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.