जेईई - नीट परिक्षा पुढे ढकलण्यासाठी कॉँग्रेसचे नांदेडला आंदोलन

अभय कुळकजाईकर
Friday, 28 August 2020

देशभरात अजूनही कोरोना संसर्गाचे संकट असून त्याचा धोका कमी झालेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, म्हणून नीट व जेईईच्या परिक्षा पुढे ढकलण्याची मागणी करत कॉँग्रेस पक्षाच्या वतीने नांदेडला शुक्रवारी (ता. २८) आंदोलन करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात मागणीचे निवेदन माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, आमदार मोहन हंबर्डे, जिल्हाध्यक्ष गोविंद शिंदे नागेलीकर आदींच्या उपस्थितीत देण्यात आले. 

नांदेड - कोरोनाचे संकट अजूनही देश, जगावर आहे. त्याचा धोका कमी झालेला नाही. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी व विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून नीट व जेईईच्या परिक्षा पुढे ढकलण्याची मागणी करत कॉँग्रेस पक्षाच्या वतीने शुक्रवारी (ता. २८) आंदोलन करण्यात आले. तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. 

देशभरात अजूनही कोरोना संसर्गाचे संकट असून त्याचा धोका कमी झालेला नाही. अजूनही कोरोनाचे संक्रमण सुरुच असून दररोज हजारोंच्या संख्येने कोरोना रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, म्हणून नीट व जेईईच्या परिक्षा पुढे ढकलण्याची मागणी करत कॉँग्रेस पक्षाच्या वतीने नांदेडला शुक्रवारी आंदोलन करण्यात आले.  

हेही वाचा - दमदार पावसामुळे ‘या’ प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा... 
 

देशभरात परिस्थिती गंभीर
कोरोनावर मात करण्यासाठी गर्दी टाळणे, हा एक महत्वाचा उपाय सरकारनेच सुचविलेला आहे. गर्दीमुळे कोरोनाचे संक्रमण वाढवण्याची शक्यता लक्षात घेऊनच आपण गणेशोत्सव, दहीहंडी तसेच इतर सणही साधेपणाने साजरे केले. कुठेही गर्दी केली नाही. देशभरात आजही परिस्थिती गंभीर आहे. अशावेळी लाखो विद्यार्थ्यांना जेईई - नीट ची परिक्षा देण्यासाठी आग्रह करणे संयुक्तिक नाही. 

परिक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावा
परिक्षार्थींना परिक्षा केंद्रावर जाण्यासाठी वाहतुक व्यवस्थाही नाही. एका परिक्षा केंद्रात शेकडो विद्यार्थी परिक्षा घेण्यासाठी लागणारे शिक्षक व इतर शिक्षकेत्तर कर्मचारी एकत्र आल्यास कोरोना संक्रमण होण्याची भीती आहे. हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने लाखो विद्यार्थी, पालक व परिक्षेशी निगडीत इतर घटकांच्या आरोग्य व भवितव्याचा विचार करुन या परिक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी कॉँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. 

हेही वाचलेच पाहिजे - परभणी : जेईई- नीट परीक्षा पुढे ढकलण्यासाठी कॉग्रेस रस्त्यावर 

जिल्हाधिकारी कार्यालयात दिले निवेदन
कॉँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या तसेच नागरिकांच्या तीव्र भावना शासनापर्यंत पोहचवाव्यात, अशी विनंतीही निवेदनात करण्यात आली आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात मागणीचे निवेदन अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांना देण्यात आले. यावेळी माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, आमदार मोहन हंबर्डे, जिल्हाध्यक्ष गोविंद शिंदे नागेलीकर, प्रदेश सरचिटणीस बी. आर. कदम, महापौर दीक्षा धबाले, उपमहापौर सतिश देशमुख तरोडेकर, ॲड सुरेंद्र घोडजकर, डॉ. श्याम पाटील तेलंग, शमीम अब्दुल्ला, ॲड निलेश पावडे, विजय येवनकर, राजेश पावडे, रेखा पाटील, संदीप सोनकांबळे, पप्पू पाटील कोंढेकर, विठ्ठल पावडे, सुषमा थोरात आदींची उपस्थिती होती. 

विद्यार्थी, पालकांच्या भूमिकेशी सहमत - अशोक चव्हाण
कोरोनामुळे जगभरात आव्हान निर्माण झाले असून यात सर्व क्षेत्र ढवळून निघाले आहे. भारतात शैक्षणिक परिक्षांचा कालावधी आणि दोन महिन्यानंतर नवे शैक्षणिक वर्षे सुरु होण्याचा कालावधीत हा कोरोनाच्या चक्रात अडकल्याने विद्यार्थ्यांसह पालकांची मोठी गैरसोय झाली आहे. हा संसर्गजन्य आजार असल्याने शासनही यात अत्यंत सावध भुमिका घेत असून नीट व जेईईच्या परिक्षा पुढे ढकल्याव्यात, अशी होणारी मागणी रास्त असल्याची भुमिका पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी घेतली आहे. पालक म्हणून जे काळजीचे वातावरण आहे त्याच्याशी आम्ही सहमत आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress's agitation in Nanded to postpone the JEE - NEET exams, Nanded news