Nanded Photo
Nanded Photo

Corona Virus : रेड झोनमधून आलेले नांदेडचे प्रवाशी थेट पोचले घरी 

नांदेड : देशात ‘लॉकडाउन’च्या घोषणेला ४४ दिवस झालेत. दरम्यान राज्यात विविध ठिकाणी अडकून पडलेले विद्यार्थी, परराज्यातील कामगार यांना घरी पाठवण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने मुभा दिली. शुक्रवारी (ता. आठ मे) सकाळी रेडझोन असलेल्या पुणे येथून संध्याकाळी नऊच्या सुमारास शहरात दाखल झालेल्या विद्यार्थ्यांसह जवळपास १३  इतर प्रवाशांची महापालिका आरोग्य विभागाने साधी तपासणीतर सोडाच विचारपुसही केली नाही. त्यामुळे महापालिकेचा आरोग्य विभाग अद्यापही झोपेतच असल्याचे गंभीर वास्तव समोर आले आहे.  

पुणे येथुन शुक्रवारी (ता. आठ) सकाळी एका खासगी मिनी ट्रायव्हल्स क्रमांक एम. एच. १२ क्यु ५५५४ या वाहनाने दोन महिला, एक मुलगी, सात व्यक्ती व तीन लहान मुले असे एकुण १३ प्रवाशी संध्याकाळी शहरात दाखल झाले. दरम्यान पुणे येथून निघण्यापूर्वी त्यांची आरोग्य चाचणी करण्यात आली. नांदेड शहरात दाखल झाल्यानंतर पुन्हा त्यांची आरोग्य चाचणी करणे गरजेचे होते. विशेषतछ रेडझोन मधून आलेल्या या प्रवाशांची तपासणी महापालिकेच्या आरोग्य विभागाने करणे गरजेचे होते. परंतु, हे सर्व प्रवाशांना कुणीही अडवले नसल्याने ते आपापल्या घरी पोचले. 
 
हेही वाचा- Nanded Breaking : जम्मुचे दोन यात्रेकरु पॉझिटिव्ह, रुग्णांची संख्या ४०

आम्ही शहरात येतोय काय करावे लागेल

रेडझोन मधून आलेल्या प्रवाशांना कुणीही विचारपूस केली नसल्याने महापालिका आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. या प्रवाशांपैकी एका विद्यार्थ्याने ‘सकाळ’शी संपर्क करुन आम्ही नांदेडात दाखल होत आहोत. पुढे काय करावे लागेल? अशी विचारणा केली होती.  तेव्हा तुम्ही सर्वजन तपासणी करुनच घरी जा असेही ‘सकाळ’च्या प्रतिनिधीनी त्यांना सल्ला दिला. परंतु रात्री कुठेच काही उघडे नसल्याने त्यांनी थेट घर गाठले व दुसऱ्या दिवशी शनिवारी (ता. नऊ) यातील चार जणांनी जंगमवाडी आरोग्य केंद्रात जाऊन पुण्याहून आल्याची माहिती दिली. तेव्हा त्यांची तपासणी करुन त्यांच्या हातावर होम क्वॉरंटाईनचा शिक्का मारण्यात आला.

अद्याप दोन फरारच

विशेष म्हणजे नांदेडात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असताना व महापालिकेच्या आरोग्य विभागाने गुरुद्वारा परीसरातील ९७ जणांचे स्वॅब घेऊन त्यांची अर्धवट माहिती घेऊन त्यांना सोडले होते. त्यातील २० जण कोरोना बाधीत निघाल्यानंतर महापालिकेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला होता. २० कोरोनाबाधितांपैकी चार जण फरार झाले. त्यापैकी दोघांना शोधण्यात पोलिसांना यश आले असले तरी, अद्याप दोन फरारच आहेत.  

महापालिकेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

यापूर्वी पंजाबहून यात्रेकरूंना सोडुन परतलेल्या २३ वाहन चालकांना शहराबाहेर थांबवून त्यांची चाचणी करण्यात आली होती. त्यातील तीन चालकांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर राजस्थान (कोटा) येथुन परतलेल्या विद्यार्थ्यांना रात्रभर थांबवुन दुसऱ्या दिवशी त्यांची आरोग्य चाचणी करुन त्यांना घरी सोडुन देण्यात आले होते. तशी खबरदारी पुणे येथुन आलेल्‍या त्या प्रवाशांच्या बाबतीत का दाखवली नाही?  हा मोठा प्रश्न नांदेडकरांना पडला आहे. या चार विद्यार्थ्यांप्रमाणेच इतरांनीही स्वतः रुग्णालयात जावून तपासणी करुन घेण्याची गरज आहे. महापालिकेचा आरोग्य विभाग त्या सर्वांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करणार का? की त्यांना वाऱ्यावर सोडणार? असा प्रश्‍न उपस्थित होतो आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com