
दुधड- वाळकेवाडी भागात जंगल चांगल्याप्रकारे आहे. शेजारी तेलंगणा राज्याची सीमा असून या भागात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार वाढला आहे
हिमायतनगर (जिल्हा नांदेड) : तालुक्यातील दुधड- वाळकेवाडी शिवारात बिबट्याचा मुक्त संचार वाढला असून आखाड्यावर बांधलेल्या एका गायीवर हल्ला करुण ठार केले आहे. ही घटना ता. १४ च्या राञी घडली.
दुधड- वाळकेवाडी भागात जंगल चांगल्याप्रकारे आहे. शेजारी तेलंगणा राज्याची सीमा असून या भागात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार वाढला आहे. या अगोदर या भागात म्हैस व गायीवर हल्ला करुन ठार केल्याच्या घटना ताज्या असतांना ता. १४ रोजी रात्री पुन्हा एकदा एका गायीला बिबट्याने भक्ष केले आहे.
हेही वाचा - विधायक : दिव्यांग आजीबाईला मिळाला वाॅकर स्टॅण्ड; बेरोजगार दिव्यांग संघर्ष समीतीचा पुढाकार
दुधड येथील कृष्णा लक्ष्मण सूर्यवंशी यांनी आपल्या शेत सर्वे न. १२० आखाड्यावर गाय इतर जनावरे बांधून ठेवली होती. ता. १४ च्या राञी बिबट्याने पुन्हा एकदा आपण या भागात असल्याचा प्रत्यय आणून दिला आहे. सध्या रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी शेतीत जात आहेत. या भागात राञीची लाईट असल्याने शेतकर्यांना राञीला पाणी द्यावे लागत आहे. या भागात बिबट्याने मुक्काम ठोकला असल्याने शेतकर्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे. या बिबट्याने गायीचा पाठीमागचा बराचसा भाग भक्षण केला असल्याने तो बिबट्याच असल्याचे त्याच्या हल्ला करण्याच्या पद्धती वरून दिसून येत असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या तरी या भागात नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. ता. १५ रोजी सकाळी वनपरिक्षेञ अधिकारी संध्या डोके यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल श्री. कोलते यांनी पंचनामा केला आहे. वनविभागाने या बाबीची गंभीर दखल घेऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा. अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
संपादन- प्रल्हाद कांबळे