भयंकरच : गुरुद्वाराचे ‘ते’ कर्मचारी फरारच, अहवाल मात्र कोरोना पॉझिटिव्ह  

शिवचरण वावळे
Saturday, 2 May 2020

‘त्या’ वीस कोरोना बाधीत सेवादार रुग्णास शोधण्यासाठी पोलिस निरीक्षक संदिप शिवले व अभिजीत फस्के यांच्या चमुस दिवसभर चांगलीच कसरत करावी लागली.

नांदेड : एकीकडे शहरात शनिवारी २० पॉझिटिव्ह रुग्ण निघाल्याच्या घटनेनंतर खळबळ उडाली होती. यातच आणखी भर पडली ती यातील काही ‘कोरोना’बाधित रुग्ण पळाल्याच्या चर्चेने. अखेर दिवसभरात शोधाशोध करत पंधरा जणांना ताब्यात घेण्यात आले तर पाच जण अजूनही फरार असल्याचेच रात्री उशिरापर्यंत समजते.

याबाबत मिळालेली माहिती अशी, पंजाबहुन परत आलेल्या तीन चालक व एका मदतनीस यास ‘कोरोना’ची बाधा झाल्याने गुरुवारी (ता.३०) एप्रिलला महापालिका आरोग्य विभाग खडबडुन जागा झाला आणि श्री गुरुद्वारा लंगर साहिब परिसरातील ९७ सेवादारांचे ‘स्वॅब’ चाचणीसाठी घेतले. परंतु, त्या सर्वांना अर्धवट माहितीच्या आधारे मोकळे सोडुन देण्यात आले. त्याच ९७ पैकी शनिवारी (ता.दोन) सकाळी २० जणास ‘कोरोना’ची लागण झाल्याचे उघडकीस आल्याने महापालिकेचा सावळा गोंधळ चव्हाट्यावर आला.

हेही वाचा - Nanded Breaking : गुरुद्वारा लंगर साहिब परिसरातील २० कर्मचारी पॉझिटिव्ह, रुग्णांची संख्या २६

यातील २० पैकी केवळ १५ कोरोना बाधीत व्यक्तींचेच संपूर्ण नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक अशी सविस्तर माहिती घेण्यात आली होती. तर त्यापैकी पाच व्यक्तींची आवश्यक माहिती महापालिका आरोग्य विभागाकडे उपलब्ध नव्हती. त्यामुळे ‘त्या’ वीस कोरोना बाधीत सेवादार रुग्णास शोधण्यासाठी पोलिस निरीक्षक संदिप शिवले व अभिजीत फस्के यांच्या चमुस दिवसभर चांगलीच कसरत करावी लागली. कोरोना चाचणीसाठी घेतलेल्या व नंतर अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर त्यांचा शोध लागत नसल्याने खुद्द जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर सकाळपासून श्री गुरुद्वारा लंगर साहिब परिसरात ठाण मांडुन बसले होते. तेव्हा कुठे दुपारपर्यंत अकरा जणांना शोधण्यात यश आले. त्यानंतर संध्याकाळी पुन्हा चार कोरोना बाधीत सेवादार व्यक्तींचा शोध पोलिस यंत्रणेस लागला.

हे देखील वाचाच - Video : नगीनाघाटसह गुरुद्वारा परिसर सील

पाच ‘कोरोना’ बाधीतांची अपूर्ण माहिती असल्याने त्यांना शोधता आले नसल्याचे सांगण्यात येत आहे. याविषयी कुणीही माहिती देण्यास तयार नाही. महापालिकेचे आरोग्य अधिकारी देखील फोनला किंवा मेसेजला रात्री अनेकदा संपर्क करुनही उत्तर देत नव्हते. तर जिल्हा शल्यचिकित्सक यांनी देखील ‘नो आयडीया’ म्हणून विषयाला बगल दिली. सध्या यातील सापडलेल्या पंधरा कोरोना बाधीत रुग्णांना यात्री निवासच्या बाजूस असलेल्या प्रकाश भवन येथे उपचारासाठी दाखल केले आहे.

१५ जणांना घेतले ताब्यात
लंगर साहिब गुरुद्वारामध्ये सेवादार म्हणून कार्यरत असलेल्या ९७ लोकांची ‘कोरोना’ चाचणी घेण्‍यात आली होती. त्यात शनिवारी सकाळी २० सेवादारांची (कर्मचारी) तपासणी पॉझिटिव्ह आली. परंतु, महापालिकेच्या आरोग्य विभागाने तपासणी केलेल्या रुग्णांचे पत्ते बरोबर न घेतल्याने बाधित पाच रुग्ण अजूनही सापडले नाहीत. शनिवारी दिवसभर अहवाल हाती पडताच पोलिस अधीक्षक मगर यांच्या आदेशावरून गुरुद्वारा परिसरात शोधमोहिम राबवून १५ कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले.
- संदीप शिवले, पोलिस निरीक्षक, वजिराबाद पोलिस ठाणे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Danger : `they' of the Grrudwara Employee are Absconding Nanded News