esakal | माहुरात धाडसी चोरी; महालक्ष्मीचे दागिने लंपास 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

महालक्ष्मीसाठी बनविण्यात आलेले सोने व चांदीच्या दागिन्यांसह बावीस हजार रोख रकमेची चोरी केल्याची घटना रविवारी (ता. २०) रात्री घडली आहे.

माहुरात धाडसी चोरी; महालक्ष्मीचे दागिने लंपास 

sakal_logo
By
बालाजी कोंडे

माहूर (जिल्हा हिंगोली) : माहूर शहरातील ब्राह्मणगल्लीतील अमोल भाऊराव दुधे यांच्या घराच्या मागील बाजूने भिंत फोडून अज्ञात चोरट्यांनी महालक्ष्मीसाठी बनविण्यात आलेले सोने व चांदीच्या दागिन्यांसह बावीस हजार रोख रकमेची चोरी केल्याची घटना रविवारी (ता. २०) रात्री घडली आहे. यावेळी माहूर पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

रविवारी (ता. २०) रात्री दहा वाजताच्या सुमारास घरातील मंडळी रात्रीचे जेवण आटोपून झोपी गेली असता पहाटे चार वाजताच्या सुमारास अमोल दुधे यांची पत्नी या नेहमीप्रमाणे कामाकरिता उठल्या असताना घराच्या मागच्या खोलीचे दार उघडण्याचा प्रयत्न केला. दरवाजा उघडला जात नसल्याने घरातील लोकांनी घराच्या मागील बाजूस जाऊन पाहणी केली असता, मातीच्या भिंतीला मोठे भगदाड पडलेले दिसले. तिथेच महालक्ष्मीचे साहित्य ठेवलेली पेटी व घरातील इतर सामान अस्ताव्यस्त अवस्थेत पडलेले दिसल्याने चोरी झाल्याचे लक्षात आले. तत्काळ पोलिस ठाणे गाठून महालक्ष्मीसाठी बनविण्यात आलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम मिळून अशी एकूण बावीस हजार रुपयांची चोरी झाल्याची तक्रार देण्यात आली. या तक्रारीवरुन माहूर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हेही वाचा -  हे रंग तुम्हाला भुरळ घालताहेत...तर सावधान...!

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू

नांदेड : नांदेड जिल्ह्यात 23 सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजेपासून ते ता. सात ऑक्टोंबरच्या मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात शनिवार 23 सप्टेंबर 2020 चे 06.00 वाजेपासून ते दिनांक 07 ऑक्टोंबर 2020 चे मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. 

आदेशातून यांना सुट 

हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही. अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त व्यक्ती जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.  

संपादन - प्रल्हाद कांबळे