अमेरिकेत मृत्यू, नांदेडात हुंडाबळीचा गुन्हा, काय आहे प्रकरण वाचा सविस्तर...?

प्रल्हाद कांबळे
Wednesday, 19 August 2020

वीस लाख रुपयाची मागणी करुन एका विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ. त्यानंतर पिडीत विवाहितेचा अमेरिकेत उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.

नांदेड : पुणे येथे घेतलेल्या कार्यालयाच्या जागेचे पैसे देण्यासाठी माहेराहून वीस लाख रुपयाची मागणी करुन एका विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ. त्यानंतर पिडीत विवाहितेचा अमेरिकेत उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या प्रकरणात तब्बल १० महिण्यानी अखेर वजिराबाद पोलिस ठाण्यात ता. १४ आॅगस्ट रोजी सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अटक करण्याची मागणी पिडीत विवाहितेच्या पालकांनी केली आहे. 

शहराच्या पद्मजा सिटी परिसरात राहणाऱ्या एका व्यापाऱ्याने आपल्या मुलीचा विवाह मोठ्या थाटामाटात ता. सात फेब्रुवारी २०१९ रोजी कौठा परिसरातील ओम गार्डनमध्ये स्वप्नील प्रकाश कोसलगे याच्याशी लावून दिला. स्वप्नील कोसलगे हा अमेरिकेत नोकरी करतो. त्यामुळे एकुलत्या एक मुलीचा विवाह थाटामाटात केले. स्वप्नील कोसलगे हा शहराच्या शासकिय आयुर्वेद महाविद्यालयासमोर राहतो. लग्नानंतर विवाहितेला काही दिवस चांगले नांदवले. नंतरच्या काळात तुझ्या वडिलानी लग्नात हुंडा दिला नाही असे म्हणून शारिरीक व मानसिक छळ करणे सुरु केले. 

हेही वाचा महाआघाडीतील खासदार व आमदारामध्ये पाण्यावरुन कलगीतुरा, कुठे ते वाचा...?

अमेरिकेत मृत्यू, नांदेडात हुंडाबळीचा गुन्हा 

एवढेच नाही तर औषधी दुकान (मेडीकल) टाकण्यासाठी पाच लाख आणि पुणे येथे कार्यालयाच्या जागेसाठी वीस लाख अशी २५ लाखाची मागणी करुन तिचा छळ सुरुच ठेवला. सासरी होणारा त्रास तीने अपल्या माहेरी सांगितला. यावेळी तु त्या घरी नवीन आहेस, सासरची मंडळीचा स्वभाव समजेपर्यंत त्रास देतील. हा त्रास काही दिवस तुला सोसावा लागेल म्हणून तिचीच समजूत काढून परत पाठविले. त्यानंतर अमेरिकेतील शिकागोला जाण्यासाठी विमानप्रवासाचे भाडे वडिलाकडून आण म्हणूनही त्रास देणे सुरुच ठेवले. स्वप्नील व पिडीत विवाहिता हे दोघेजण ता. १७ मे २०१९ रोजी अमेरिकेला गेले. मात्र तिथे गेल्यानंतरही तिचा काही केल्या त्रास थांबत नव्हता. शेवटी पिडीत विवाहितेचा अमेरिकेत एका रुग्णालयात उपचार सुरु असताना ता. चार नोव्हेंबर २०१९ रोजी मृत्यू झाला. मृतदेह नांदेडला आणून अंत्यसंस्कार करण्यात आले. 

सासरची मंडळीना अटक करा 

पोटची मुलगी गेल्याने दारोदार भटकत तिच्या पालकांनी न्याय मिळावा व सासरच्या मंडळीना अटक व्हावी या हेतूने शेवटी दिगांबर बाबूराव लाभशेटवार यांनी वजिराबाद पोलिस ठाण्यात जावून फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी स्वप्नील प्रकाश कोसलगे, प्रकाश कोसलगे, छाया कोसलगे, सौरभ कोसलगे, दिलीप मनाठकर आणि अनिल मनाठकर गुन्हा दाखल केला. मात्र मरणास परावृत्त केल्याप्रकरणी कलम लावली नाही. अजूनही तिच्या सासरची मंडळी मोकाट असून मयताच्या वडिलानी बुधवारी (ता. १९) विशेष पोलिस महानिरीक्षकांची भेट घेऊन न्याय देण्याची मागणी केली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Death in America, Dowry in Nanded, what is the case Read in detail nanded news