esakal | नायगाव बाजार समितीचा निर्णय : शेतकऱ्यांची आर्थिक लुट थांबणार
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

बाजार समितीच्या या निर्णयाने व्यापाऱ्यांच्या बाबतीत विश्वासाचे वातावरण निर्माण होवून आवकही वाढणार आहे. व्यापारी शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लुट करत असल्याच्या तक्रारी वाढल्याने शेतकऱ्यांच्या हितासाठी हा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. 

नायगाव बाजार समितीचा निर्णय : शेतकऱ्यांची आर्थिक लुट थांबणार

sakal_logo
By
प्रभाकर लखपत्रेवार

नायगाव ( जिल्हा नांदेड) : बाजार समितीच्या यार्डात विक्रीसाठी आलेला शेतमालाचे वजन प्लेट काट्यावर करुनच संबंधित आडत दुकानात नेण्याचा निर्णय काल ता. १० रोजी नायगाव बाजार समितीने घेतला आहे. बाजार समितीच्या या निर्णयाने व्यापाऱ्यांच्या बाबतीत विश्वासाचे वातावरण निर्माण होवून आवकही वाढणार आहे. व्यापारी शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लुट करत असल्याच्या तक्रारी वाढल्याने शेतकऱ्यांच्या हितासाठी हा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. 

कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ हा शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेला असतो. त्यातच शेतमाल कमी दराने खरेदी करण्याबरोबरच विक्रीसाठी आणल्यावर व्यापारी मापात पाप करत असल्याच्या नेहमीच तक्रारी होत आहेत. यंदा तर निसर्गाने मारलेच आहे व्यापारी तारतील असे वाटत होते पण परिसरातील व्यापारी मापात पाप करुन शेतकऱ्यांची आर्थिक लुट करत असल्याची ओरड होत आहे. मात्र याबाबत नायगाव बाजार समितीकडे कुणीही लेखी अथवा तोंडी तक्रार दिलेली नाही. तरीही बाजार समितीचे सभापती माजी आमदार वसंत चव्हाण यांनी ता. १० रोजी व्यापाऱ्यांच्या उपस्थितीत एक बैठक घेतली. 

हेही वाचा - श्री रेणुकादेवीचा नवरात्र उत्सव भाविकांनी घरीच साजरा करावा- विश्वस्त 

शेतकऱ्यांचा माल व्यापाऱ्यांनी प्लेट काट्यावर वजन करुन खरेदी करावा

घेतलेल्या बैठकीत कार्यक्षेत्राच्या बाहेरील व्यापारी मापात पाप करत असल्याच्या तक्रारीचा उहापोह झाला त्यामुळे व्यापाऱ्यांच्या बाबतीत शेतकऱ्यात अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र नायगाव बाजार समितीच्या यार्डात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये व्यापार व आवक वाढण्यासाठी नवीन काय करता येईल यावर चर्चा झाली. यावेळी बाजार समितीचे सचिव संजय कदम यांनी शेतकऱ्यांचा माल व्यापाऱ्यांनी प्लेट काट्यावर वजन करुन खरेदी करावा अशा सुचना केल्या.  उपस्थित व्यापाऱ्यानी  होकार दिला त्यामुळे बाजार समितीच्या यार्डात विक्रीसाठी आलेला शेतमालाचे प्लेट काट्यावर वजन झाल्यानंतरच त्याचा लिलाल करण्याचे निश्चित करण्यात आले. 

बाजार समितीच्या या धोरणात्मक निर्णयामुळे बाजार समितीकडे मालाची तर आवक वाढणारच आहे पण मापात पाप करत असल्याच्या आरोपाला ब्रेक लागून शेतकऱ्यांना दरही चांगला मिळणार आहे.

येथे क्लिक करा४ हजारापेक्षा अधिक बाधितांची कोरोनावर मात, शनिवारी १३० जण पॉझिटिव्ह; जिल्हाभरात चौघांचा मृत्यू

शेतकऱ्यांनी विश्वासाने यार्डात विक्रीसाठी शेतमाल आणावा. 

बाजार समितीने शेतकऱ्यांच्या हितासाठी हा निर्णय घेतला असून. विक्रीसाठी येणाऱ्या शेतीमालाची बाजार समिती प्लेट काट्यावर मोफत वजन करुन देणार आहे. व्यापाऱ्यांच्या उपस्थितीत घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी आज ता. १२ पासून करण्यात येणार असून परिसरातील शेतकऱ्यांनी विश्वासाने यार्डात विक्रीसाठी शेतमाल आणावा. 

- माजी आ‌मदार वसंत चव्हाण, सभापती.

संपादन - प्रल्हाद कांबळे