प्रेयसीला जाळणारा आरोपी देगलूर पोलिसांच्या ताब्यात

अनिल कदम
Sunday, 15 November 2020


तालुक्यातील एका टोकाला असणारे व तेलंगणा सीमेलगत असणाऱ्या शेळगाव (नरसिंह) येथील भिन्न जातीय युवक-युवतींचे सुत जुळले. त्यानंतर त्यांनी रोजगाराच्या निमित्ताने पुणे गाठले. तेथे त्यांचा संसार सुरू असताना असे काय घडले की ते दीपावलीच्या निमित्ताने गावाकडे जाण्याचा बहाणा करून मोटरसायकलवर निघाले. या वेळी प्रेयसीला घेऊन निघालेल्या युवकाने शनिवारी (ता.१४) रोजीच्या पहाटे बीड तालुक्यातील येळंब घाटात नेकनुर जवळ तिच्यावर ऍसिड व पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता.
 

देगलूर, (जि. नांदेड) ः तालुक्यातील एका टोकाला असणारे व तेलंगणा सीमेलगत असणाऱ्या शेळगाव (नरसिंह) येथील भिन्न जातीय युवक-युवतींचे सुत जुळले. त्यानंतर त्यांनी रोजगाराच्या निमित्ताने पुणे गाठले. तेथे त्यांचा संसार सुरू असताना असे काय घडले की ते दीपावलीच्या निमित्ताने गावाकडे जाण्याचा बहाणा करून मोटरसायकलवर निघाले. या वेळी प्रेयसीला घेऊन निघालेल्या युवकाने शनिवारी (ता.१४) रोजीच्या पहाटे बीड तालुक्यातील येळंब घाटात नेकनुर जवळ तिच्यावर ऍसिड व पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता.
या घटनेत पीडित युवती ४८ टक्के जळाली. जवळपास आठ तास रस्त्यावर तडफडत असताना वाहन धारकांच्या मदतीने तिला बीड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान रविवारी (ता.१५) रोजी तिचा मृत्यू झाला. त्यानंतर ही घटना समाज माध्यमांसमोर येताच राज्यासह देशात खळबळ उडाली. 

उपचारादरम्यान तिचा मृत्यू 
आरोपीने प्रेयसीला जाळल्यानंतर तिचा त्यामध्ये मृत्यू होईल या हेतूने (ता.१४) च्या पहाटे त्याने मोटरसायकलवर देगलूर तालुक्यातील शेळगाव (नरसिंह) हे स्वतःचे गाव गाठले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याचे समजताच (ता.१५) रोजी तो गावातून पसार झाला. ही घटना तत्काळ बीड पोलिसांनी देगलूर पोलिसांना कळविली. पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे अप्पर पोलिस अधीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली देगलूर पोलिसांचे पथक डीवायएसपी रमेश सरोदे, पोलिस निरीक्षक भगवानराव धबडगे यांच्या नियोजनाखाली तपासकामी कामाला लागले. 

हेही वाचा - ​ पालकमंत्र्यांना वेळ मिळेना..धरणे शंभर टक्के भरली, पण नियोजनचा अभाव, ऊस व रब्बीच्या पेरण्या लांबल्या. 

बीड पोलिसांच्या ताब्यात देण्याची कार्यवाही केली जाणार 
देगलूर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली. या वेळी आरोपी इतरत्र पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला बिलोली तालुक्यातील आदमपूर फाटा येथील जय मल्हार धाब्यावर पकडून ताब्यात घेतले. जिल्हा पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अप्पर पोलिस अधीक्षक निलेश मोरे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तपासाबाबत योग्य त्या सूचना देगलूर पोलिसांना करताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली त्यामुळे आरोपीला तत्काळ अटक करण्यात यश आले. पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अप्पर पोलिस अधीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी अविनाश राजुरे रा. शेलगाव (नरसिंह) याला बीड पोलिसांच्या ताब्यात देण्याची कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक भगवान धबडगे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. 

शेळगाव (नृसिंह) येथे स्मशान शांतता 
आरोपी व पिडीता एकाच गावातीलच भिन्न समाजातील असल्याने व यापूर्वी अशा घटनेचा कधी दुरान्वयेही संबंध नसणाऱ्या प्रगतीशील शेळगाव मात्र या घटनेने सुन्न झाले असून गावकरी या प्रकरणावर भाष्य करायला तयार नाहीत. सध्या गावात स्मशान शांतता दिसून येत आहे.

संपादन - स्वप्निल गायकवाड
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deglur Police Arrest Accused Of Burning Girlfriend, Nanded News